कोस्टल रोड बांधताना कोळी बांधवांची साद

वरळीच्या आमदाराची मंत्री असून कोळीबांधवांकडे पाठ

    25-Oct-2024
Total Views |

worli
मुंबई, दि.२५ : मुंबई सागरी किनारा रस्ता प्रकल्प हा मुंबई महानगरपालिकेचा एक महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे. या प्रकल्पाचा एक मोठा टप्पा पूर्ण होऊन लाखो मुंबईकर या मार्गावरून जलद प्रवासाचा आनंद घेत आहेत. मात्र हा प्रकल्प बांधत असताना वरळीच्या क्लिव्हलँड बंदर भागातील स्थानिक मच्छिमार आणि कोळी बांधवांनी या रोडला विरोध केल्यामुळे हा प्रकल्प वादाच्या भोवऱ्यात अडकला होता. या कोळी बांधवानी सत्तेत असणाऱ्या स्थानिक आमदार आदित्य ठाकरे यांच्याशी सतत भेटीचा पाठपुरावा केला. मात्र, ठाकरे सरकारमध्ये पर्यावरण मंत्री असणाऱ्या आदित्य ठाकरे यांनी कोळी बांधवांकडे सपशेल पाठ फिरविली. अखेर डिसेंबर,२०२२ला राज्यात सत्तेत आलेल्या फडणवीस-शिंदे सरकारने या कोळीबांधवांच्या मागण्या मान्य केल्या.
वरळीच्या क्लिव्हलँड बंदर भागात स्थानिक आमदार आदित्य ठाकरे यांनी प्रत्यक्ष ठिकाणी भेट देऊन आमच्या मागण्या काय आहेत ते जाणून घ्यावे आणि त्यावर निर्णय द्यावा, अशी सर्वसामान्य वरळीतील कोळी बांधवांची इच्छा होती. या प्रकल्पात बांधल्या जाणाऱ्या खांबांपैकी २ खांबांमधील अंतर हे १२० मीटर असावे अशी मागणी होती. परंतु, पर्यावरण मंत्री पदाच्या अडीच वर्षांच्या कार्यकाळात आदित्य ठाकरेंना या भागाकडे फिरकायला देखील वेळ मिळाला नाही. सरतेशेवटी स्थानिकांसह कोळी समाजाने आंदोलनाचे हत्यार हाती घेत प्रकल्पाचे काम बंद पाडण्याची भूमिका घेत प्रशासनाला काम करू दिले नव्हते. प्रकल्प कित्येक महिने ठप्प राहिला. मात्र तत्कालीन ठाकरे सरकार आणि मुंबई महापालिका प्रशासनाने सकारात्मक भूमिका न घेता हे अंतर ६० मीटर ठेवण्याचा निर्णय कायम ठेवला. मात्र, राज्यात सत्तांतर होताच डिसेंबर,२०२२ला फडणवीस-शिंदे सरकराने या कोळीबांधवांशी बैठक घेत त्यांची ही मागणी मान्य केली. नव्याने सत्तेत आलेल्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसह उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी घेतलेल्या भूमिकेमुळेच हा प्रश्न मार्गी लागल्याची भावना स्थानिकांनी व्यक्त केली. मागणी मान्य करण्यात आल्याने प्रकल्पग्रस्तांनी सरकारचे आभार व्यक्त केले. इतकेच नाहीतर कोळीवाड्यात भव्य कार्यक्रमाचे आयोजन केले.
आमदार आदित्य ठाकरेंना अल्टिमेटम
वरळीतील कोळीबांधवांच्या मान्य करणाऱ्या फडणवीस-शिंदे सरकारच्या सत्कार समारंभावर उबाठा गटाचे खासदार संजय राऊत यांनी टीका केली. या टिकेवरून नाराज झालेल्या वरळीतील कोळी समाजाने आदित्य ठाकरेंना इशारा देत केलेली बॅनरबाजी चर्चेचा विषय ठरली. या बॅनरमध्ये वरळीकरांनी म्हटले की, 'आदित्य ठाकरे आणि संजय राऊत यांचा जाहीर निषेध..! ज्यांनी आमची कामे केली म्हणून आम्ही त्यांचा जाहिर सत्कार ठेवला तर आपण कोळी वाड्याच्या कार्यक्रमला पाठ फिरवलीत. आम्ही कोळी बांधव कधीच पाठ फिरवत नाही. तुम्ही तर कोळीवाड्यांसाठी आणि वरळीकरांसाठी काहीही केलं नाहीत पण ज्या फडणवीस शिंदेनी केले त्यांच्या सत्कारावर टीका करून आमच्या जखमेवर मीठ चोळण्याचे काम तुम्ही करत आहात. आमच्या जखमेवर मीठ चोळण्याचा प्रयत्न करणाऱ्या ठाकरे गटाला येत्या निवडणुकीत त्याचा हिशेब चुकता करावा लागणार आहे. धोक्याचा खरा बावटा आता आदित्य ठाकरेंसाठी दाखवला जात असून त्यांनी येत्या काळात सावध राहावे,' असा सूचक इशारा वरळीतील कोळी बांधवानी दिला होता.