मुंबई (विशेष प्रतिनिधी) : (VHP Margadarshak Mandal Baithak) विश्व हिंदू परिषदेच्या केंद्रीय मार्गदर्शक मंडळाची दोन दिवसीय बैठक सध्या दिल्लीत सुरू आहे. बैठकीत विहिंपचे केंद्रीय महामंत्री बजरंगलाल बांगरा यांनी हिंदू धर्मापासून विचलित झालेल्या लोकांची घरवापसी, कुटुंब आणि सामाजिक क्षेत्रात धार्मिकता आणि मूल्ये रुजवण्यासाठी सामाजिक सलोखा आणि कौटुंबिक प्रबोधन या विषयांवर पूज्य संतांसमोर परिषदेचा प्रस्ताव मांडला.
या बैठकीला दीडशेहून अधिक संतगण आणि विहिंपच्या तीन क्षेत्रातील केंद्रीय मार्गदर्शक मंडळाचे सदस्य उपस्थित आहेत. या बैठकीत विश्व हिंदू परिषदेचे केंद्रीय अधिकारीसुद्धा सहभागी झाले आहेत. मलुक पीठाधीश्वर पूज्य अग्रदेवाचार्य श्री स्वामी राजेंद्र देवाचार्य यांच्या अध्यक्षतेखाली विश्व जागृती मिशन मुख्यालय, आनंदधाम आश्रम येथे ही बैठक होत आहे.
हे वाचलंत का? : भारतमाता पूजनाने संघाच्या अ.भा. कार्यकारी मंडल बैठकीला सुरुवात
बैठकीच्या उद्घाटन सत्रात वक्त्यांनी हिंदू समाजासमोरील आव्हाने उपस्थितांसमोर मांडली. विश्व जागृती मिशनचे संस्थापक प्रमुख पूज्य श्री सुधांशूजी महाराज यांनी सर्वप्रथम भारत देश आणि सनातन हिंदू धर्म तोडण्याच्या षड्यंत्राबद्दल चिंता व्यक्त केली आणि वैदिक सनातनी संस्कृतीची पुनर्स्थापना करण्यावर भर दिला. लोक महाराजश्रींनी धार्मिक संस्थांसोबत होत असलेल्या आंतरराष्ट्रीय षडयंत्राविरुद्ध सामूहिक आवाज उठवण्याचे आवाहन केले.
जुना पीठाधिश्वर आचार्य महामंडलेश्वर स्वामी अवधेशानंद महाराज म्हणाले की, आपल्या कुटुंबांच्या विघटनामुळे आपण पाश्चात्य जगाच्या षड्यंत्राचे बळी ठरत आहोत. त्यासाठी आपली भाषा, खाद्य, संस्कृती, सण-उत्सव, उपासना इत्यादींशी संबंधित परंपरांबद्दल पुन्हा जागरूक व्हायला हवे. या बैठकीत उपस्थित असलेल्या सर्व भागातील मार्गदर्शक मंडळाचे प्रतिनिधी त्यांच्या क्षेत्रानुसार हिंदू समाजासमोरील सध्याच्या आव्हानांवर तयार केलेल्या अहवालावर चर्चा करतील. बैठकीत मांडलेल्या सर्व विषयांवर विचारमंथन झाल्यानंतर सर्व सहभागी प्रतिनिधी निर्णायक कृती आराखडा प्रस्ताव पारित करतील.
कृती आराखड्याच्या दृष्टीने मध्यवर्ती मार्गदर्शक मंडळाशी संबंधित अशा ९ बैठका विश्व हिंदू परिषदेतर्फे संपूर्ण भारतभर आयोजित केल्या जात आहेत. आनंदधाम आश्रमाच्या बैठकीत इंद्रप्रस्थ, मेरठ आणि जयपूर प्रांतांच्या संघटनेच्या दृष्टीनं स्थापन झालेल्या १२ प्रांतांच्या विश्व हिंदू परिषदेच्या केंद्रीय मार्गदर्शक मंडळाचे प्रतिनिधी आणि प्रमुख संत सहभागी होत आहेत. अखिल भारतीय संत समितिचे महामंत्री जितेंद्रानंद सरस्वती, विहिंपचे केंद्रीय संगटन महामंत्री मिलिंद परांडे, सह-संगठन महामंत्री विनायक राव देशपांडे आणि केन्द्रीय मंत्री प्रवक्ता व धर्माचार्य संपर्क प्रमुख अशोक तिवारी उपस्थित होते.