भारतमाता पूजनाने संघाच्या अ.भा. कार्यकारी मंडल बैठकीला सुरुवात
25-Oct-2024
Total Views |
मुंबई (विशेष प्रतिनिधी) : (RSS Karyakari Mandal Baithak) राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या अखिल भारतीय कार्यकारी मंडल बैठकीला शुक्रवार, दि. २५ ऑक्टोबर रोजी मथुरा येथे सुरुवात झाली. गऊ ग्राम परखम येथील दीनदयाल उपाध्याय गौ विज्ञान आणि संशोधन केंद्राच्या नवधा सभागृहात ही दोन दिवसीय बैठक संपन्न होत आहे. सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत आणि सरकार्यवाह दत्तात्रेय होसबळे यांच्या उपस्थितीत भारत माता पूजनाने बैठकीचा शुभारंभ करण्यात आला.
सर्वप्रथम नुकतेच दिवंगत झालेले जयपूरचे पूज्य राघवाचार्य महाराज, प्रसिद्ध उद्योगपती पद्मविभूषण रतन टाटा, पश्चिम बंगालचे माजी मुख्यमंत्री बुद्धदेव भट्टाचार्य, ईनाडू व रामोजी फिल्म सिटीचे संस्थापक रामोजी राव, कम्युनिस्ट नेते सीताराम येचुरी, माजी परराष्ट्र मंत्री के. नटवर सिंह, बिहारचे माजी उपमुख्यमंत्री सुशील मोदी, ॲडमिरल (निवृत्त) रामदास आणि इतर प्रमुख व्यक्तींना श्रद्धांजली वाहण्यात आली.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अखिल भारतीय सह-प्रचार प्रमुख नरेंद्र कुमार यांनी सांगितले की, २६ ऑक्टोबर रोजी संध्याकाळी ६.१५ वाजता बैठकीचा समारोप होईल. या बैठकीत सरसंघचालकांनी विजयादशमीच्या पवित्र सणावर मांडलेल्या विचारांवर सर्वसमावेशक चर्चा होईल आणि त्यांच्या भाषणात नमूद केलेले महत्त्वाचे विषय तसेच सध्या देशात सुरू असलेल्या समकालीन समस्यांचा पाठपुरावा करण्याची योजना आहे. यासोबतच बैठकीत वार्षिक योजनेचा आढावा आणि संघकार्याच्या विस्ताराचा तपशीलही घेतला जाणार आहे.
बैठकीत संघाच्या शताब्दी वर्षात कार्य विस्ताराच्या आराखड्यासह आतापर्यंत केलेल्या कामाचा आढावा आणि पंचपरिवर्तन समाजापर्यंत नेण्याबाबत चर्चा होणार आहे. या बैठकीत सर्व सहा सह-सरकार्यवाह, अ.भा.कार्यकारिणी सदस्य, संघाच्या सर्व ४६ प्रांतातील संघचालक, सहसंघचालक, कार्यवाह आणि प्रचारक यांच्यासह एकूण ३९३ कार्यकर्ते सहभागी झाले आहेत. तसेच जम्मू-काश्मीर, केरळ, अरुणाचल प्रदेश, मणिपूर, त्रिपुरा इत्यादी प्रांतातीलही कार्यकर्ते उपस्थित आहेत.