उमरचा उमाळा

    23-Oct-2024   
Total Views |
 
Umar Khalid
 
उमर खालिद... २०२०च्या ‘सीएए’ आणि ‘एनआरसी’विरोधी दिल्लीतील शाहीनबाग आंदोलनामागचा एक चेहरा. ‘जेएनयुचा विद्यार्थी नेता’ म्हणून मिरवणार्‍या उमर खालिदवर दिल्लीत हिंसाचार आणि दंगली भडकाविण्यासारखे गंभीर आरोप आहेत. अमेरिकेचे तत्कालीन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे भारत दौर्‍यावर असतानाही, खालिदने अशीच भडकाऊ विधाने केली होती आणि त्यानंतरच दिल्लीत दंगली उसळल्या होत्या.
 
 
उमर खालिद... २०२०च्या ‘सीएए’ आणि ‘एनआरसी’विरोधी दिल्लीतील शाहीनबाग आंदोलनामागचा एक चेहरा. ‘जेएनयुचा विद्यार्थी नेता’ म्हणून मिरवणार्‍या उमर खालिदवर दिल्लीत हिंसाचार आणि दंगली भडकाविण्यासारखे गंभीर आरोप आहेत. अमेरिकेचे तत्कालीन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे भारत दौर्‍यावर असतानाही, खालिदने अशीच भडकाऊ विधाने केली होती आणि त्यानंतरच दिल्लीत दंगली उसळल्या होत्या. परिणामी, ‘युएपीए’च्या आरोपाखाली २०२० पासून खालिद तिहार तुरुंगातच खितपत असून, वेळोवेळी न्यायालयाने त्याला जामीन नाकारला आणि खालिदच्या दिल्ली दंगलीतील संशयास्पद भूमिकेवरही शिक्कामोर्तब केले. पण, तरीही काही विद्यार्थी संघटना आणि पुरोगामी मंडळींनी खालिदला जामीन मिळावा, त्याला न्याय मिळावा, म्हणून मोहीम हाती घेतली आहे. सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड आणि राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना खालिदच्या सुटकेसाठी तब्बल एक लाख ई-मेल्स पाठविले जाणार आहेत. ‘ऑल इंडिया स्टुडंट असोसिएशन’ आणि अन्य काही विद्यार्थी संघटनांनी खालिदच्या न्याय-हक्कांसाठी चालवलेला हा सगळा खटाटोप! एवढेच नाही, तर ‘एक्स’सह अन्य समाजमाध्यमांवरही खालिदच्या सुटकेसाठी ‘हॅशटॅग्ज’ वापरणे, त्याच्या समर्थनार्थ पोस्ट्सचा रतीब घालणे वगैरे प्रकारही सध्या जोरदार सुरु आहेत. याच मोहिमेअंतर्गत एकट्या बंगळुरुमधून असे हजारो ई-मेल्स पाठविण्यात आले. खालिदला जामीन मिळावा, त्याच्यावरील आरोपांचे पुनरावलोकन करावे आणि २०२०च्या दंगलींची निष्पक्ष चौकशी व्हावी, अशा मागण्याही या मोहिमेअंतर्गत केल्या जात आहेत. त्यामुळे उमर खालिद हा कुणी महान विद्यार्थीनेता असून, त्याला चक्क ब्रिटिशांविरोधात लढणार्‍या स्वातंत्र्यसेनानीचा दर्जा वगैरे देऊन, तरुणांची माथी भडकाविण्याचे प्रकार सध्या समाजमाध्यमांवर जोरात सुरु आहेत. त्याला तरुणाईही दुर्दैवाने बळी पडताना दिसते.
 
२०२० साली दिल्लीत उसळलेल्या दंगलीमध्ये ५० जणांना आपले प्राण गमवावे लागले होते. एवढेच नाही, तर खालिद आणि दंगलीचा आरोप असलेला ‘आप’चा माजी नगररसेवक ताहीर हुसेन याचेही लागेबांधे उघडकीस आले. त्यामुळे आगामी दिल्ली विधानसभेच्या निवडणुकांपूर्वी उमरसाठीचा हा उमाळा राजधानीला अशांत करण्याचे नवे षड्यंत्र तर नाही ना, हे पाहावे लागेल.
 
 
ठाकरेंना उतरती कळा...
 
दोन वर्षांपूर्वी एकनाथ शिंदे आणि शिवसेनेच्या ४० आमदारांच्या बंडानंतर उद्धव ठाकरे यांची मुख्यमंत्रिपदाची खुर्ची तर गेलीच, पण पक्षप्रमुख म्हणूनही त्यांच्या नेतृत्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले. ठाकरे एकाकी पडले. अगदी त्वेषाने त्यांनी शिवसेनेच्या पुनर्बांधणीचा आणि राखेतून फिनिक्स पक्ष्याप्रमाणे भरारी वगैरे घेण्याची भाषा केली. आपला पक्ष फुटला, संघटना संपली म्हणून ठाकरेंनी सहानुभूती लाटण्याचाही केविलवाणा प्रयत्न केला. ‘सोडून गेले ते कावळे, राहिले ते मावळे’ अशी टोमणेबाजी करुन ठाकरेंनी एकीकडे आपल्याला कुणाची गरज नाही, असे भासवण्याचा प्रयत्न केला, तर दुसरीकडे शिवसेनेशी वैचारिकदृष्ट्या दुरान्वयेही संबंध नसणार्‍या संधीसाधू उपर्‍यांना ‘मातोश्री’ने प्रवेश दिला. अगदी सुषमा अंधारेसारख्या हिंदुत्वद्वेष्ट्यांनाही ठाकरेंनी जवळ केले. अशा निरुपयोगी व्यक्ती म्हणू नका की संघटना म्हणू नका, जो जो येईल, तो तो आपला, असे ‘मागेल त्याला मिठी’ धोरणच जणू ठाकरेंनी अवलंबिले.
 
प्रकाश आंबेडकरांच्या ‘वंचित बहुजन आघाडी’सोबतही उद्धव ठाकरेंनी अशीच आघाडी घोषित केली. महाविकास आघाडीमध्ये ‘वंचित’लाही सन्मानजनक स्थान मिळवून देण्याचे आश्वासनही ठाकरेंनी दिले. दलित मते यानिमित्ताने आपल्या पारड्यात पडतील, अशी ठाकरेंची स्वार्थी अपेक्षा. पण, तेही गणित फिस्कटले आणि आंबेडकरांनी ठाकरेंना ‘जय महाराष्ट्र’ करीत आघाडी तोडलीच. तीच गत ‘संभाजी ब्रिगेड’बाबतची. ऑगस्ट २०२२ मध्ये ठाकरे आणि ‘संभाजी ब्रिगेड’ने आघाडी घोषित केली. आगामी निवडणुका एकत्र लढण्याच्या आणाभाकाही घेतल्या. ‘संभाजी ब्रिगेड’च्या म्हणण्यानुसार, त्यांनी मविआला लोकसभा निवडणुकीत सहकार्यही केले. पण, आता विधानसभेच्या निवडणुकीत ‘संभाजी ब्रिगेड’च्या तोंडालाही ठाकरेंनी पाने पुसली. त्यामुळे ‘वंचित बहुजन आघाडी’ असेल, ‘संभाजी ब्रिगेड’ किंवा ठाकरेंना सोडचिठ्ठी देणारे पोहरादेवीचे महंत सुनील महाराज, यांपैकी कुणाचाही विश्वास ठाकरेंना टिकवता आला नाही. जागावाटपात सन्मानजनक भागीदारीचा मित्रांना शब्द द्यायचा आणि नंतर त्यांची बोळवण करायची, अशी ही ठाकरेंची स्वार्थी मैत्री. त्यामुळे ठाकरे आपली उरलीसुरली विश्वासार्हताही आता गमावून बसले आहेत, हेच सिद्ध व्हावे.

विजय कुलकर्णी

 एम.सी.जे पर्यंत शिक्षण. सध्या ‘मुंबई तरुण भारत’मध्ये मुख्य उपसंपादक (फीचर्स) या पदावर कार्यरत. मुंबईतील बीएमएम महाविद्यालयांमध्ये पत्रकारितेतील विषयांसाठी व्हिजिटिंग फॅक्लटी म्हणून कार्यरत. चालू घडामोडी, सामाजिक विषय, युवा पिढीला आवडेल असे लेखन आणि वृत्तपत्रातील मांडणी आणि सजावटीमध्ये विशेष रुची