मुंबई : बेलापूर विधानसभा मतदारसंघात मनसेने गजानन काळे यांना उमेदवारी दिली आहे. तर त्यांच्याविरोधात भाजपच्या मंदा म्हात्रे आणि शरद पवार गटाचे संदीप नाईक रिंगणात आहेत. त्यामुळे बेलापूरमध्ये यंदा तिरंगी लढत होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
मंगळवारी रात्री शिवसेना आणि मनसेने आपली ४५ उमेदवारांची यादी जाहीर केली. दुसरीकडे, भाजपचे नवी मुंबईचे जिल्हाध्यक्ष संदीप नाईक यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटात प्रवेश केला. संदीप नाईक हे माजी मंत्री गणेश नाईक यांचे पुत्र आहेत. संदीप नाईक हे बेलापूर विधानसभेतून निवडणूक लढवण्यास इच्छूक असल्याचे सांगण्यात येत आहे. परंतू, भाजपने मंदा म्हात्रेंना तिकीट दिल्याने ते नाराज होते. त्यामुळे त्यांनी तुतारी हाती घेण्याचा निर्णय घेतला.
संदीप नाईक यांना शरद पवार गटाकडून बेलापूर विधानसभा मतदारसंघाचे तिकीट मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. दरम्यान, बेलापूरमध्ये भाजपच्या मंदा म्हात्रे, मनसेचे गजानन काळे आणि शरद पवार गटाचे संदीप नाईक यांच्यात लढत होणार आहे. याठिकाणी मंदा म्हात्रे या गेली दोन टर्म निवडून आल्या आहेत. यावेळी बेलापूरमध्ये कोण बाजी मारणार, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.