डोंबिवलीनगरीचे साहित्य आणि कलाक्षेत्रात अमूल्य योगदान. याच योगदानात खारीचा वाटा उचलणारी संस्था म्हणजे, ‘काव्य रसिक मंडळ, डोंबिवली.’ गेली 57 वर्षे अविरतपणे कला, कविता आणि साहित्याची जपणूक करणार्या राज्यातीलच नव्हे, तर देशातील सर्वात जुनी संस्था म्हणून ओळखल्या जाणार्या या संस्थेचा परिचय करुन देणारा हा लेख...
1966 साली मुकुंदराव देशपांडे, चित्तरंजन घोटीकर आणि चंद्रकांत भोसेकर या त्रयीने ‘काव्य रसिक मंडळा’ची स्थापना केली. मंडळाचे 1990 हे रौप्य, तर 2015-16 हे सुवर्ण महोत्सवी वर्षही उत्साहात साजरे झाले. बघता बघता या संस्थेने आता आपल्या षष्ठीपूर्तीकडे वाटचाल सुरु केली आहे. स्थापनेपासून विविध साहित्यिक आणि कवींनी काळानुरूप या संस्थेचा परिचय अवघ्या महाराष्ट्राला करुन दिला आहे. साहित्यिक प्रभाकर अत्रे, ना. ज. जाईल, प्रा. पद्माकर मराठे यांनी प्रारंभीच्या काळात संस्थेचा परिचय राज्याला करुन दिला. द. भा. धामणस्कर यांसारख्या प्रतिभावान कवीमुळे मंडळाला साहित्य दरबारी प्रतिष्ठा लाभली.
प्रवीण दवणे, राजीव तांबे, अशोक बागवे, महेश केळुसकर, नारायण लाळे, श्रीकांत कोरे, अरुण म्हात्रे, अशोक नायगावकर, निरंजन उजगरे, हेमंत दिवटे, संदेश ढगे, राजीव जोशी अशा तरुण आणि ताज्या दमाच्या कवींच्या सहभागाने मंडळ अधिकच सशक्त होत गेले. डॉ. प्रल्हाद देशपांडे, प्रमोद पाब्रेकर, प्रवीण दामले, अमिता कोकाटे, सुलभा कोरे या उत्साही कवी-कार्यकर्त्यांनी व. शं. खानवेलकर आणि अनिल साठ्ये यांच्या मार्गदर्शनाखाली संस्था घराघरांत पोहोचवली. मंडळाच्या वार्षिक संमेलनाच्या निमित्ताने मराठीतील सर्व नामवंत कवींनी या व्यासपीठाला सुशोभित केले. कुसुमाग्रजांपासून ते कवी ग्रेस आणि इंदिरा संतांपासून नारायण सुर्वे, कवी अनिलांपासून ते सोपानदेव चौधरी, महानोर तसेच बा. भ. बोरकर, शांता शेळके यांसारखे मान्यवर तसेच अरुणा ढेरे, नीरजा, संजय चौधरी, दासू वैद्य, फ. मु. शिंदे, म. भा. चव्हाण तसेच, अलीकडच्या काळात वैभव जोशी, राधा भावे, खलील मोमीन, जयश्री हरि जोशी, ए. के. शेख असे सारे थोर कवी डोंबिवलीकर रसिकांना या संस्थेमुळे प्रत्यक्ष ऐकायला मिळाले. आजही या सार्या आठवणी नवीन लिहिणार्यांना ऊर्जा, प्रेरणा देतात.
मंडळाने रसिकांना लीला शहा, अंजली सावले, सुलोचना घोटीकर अशा अनेक गुणवंत कवींच्या कलेच्या रसास्वादाची संधी मिळवून दिली. 1990 सालच्या काव्यरसिक मंडळाच्या रौप्यमहोत्सवात डॉ. प्रल्हाद देशपांडे यांच्या अध्यक्षतेखाली धामणस्कर यांनी संमेलनाध्यक्षपद स्वीकारले आणि या कवींचा सन्मान म्हणून मंगेश पाडगांवकर, शंकर वैद्य, ना. धो. महानोर, डहाके यांसारखे मराठीतील तब्बल 25 मान्यवर कवी एका व्यासपीठावर एकत्र आले.
‘काव्य रसिक मंडळा’च्या रौप्यमहोत्सवाच्या उत्तरार्धात या मंडळाची धुरा सुलभा कोरे, हेमंत राजाराम, अंजली बापट, जान्हवी शिराळकर, अनसुया कुंभार, प्राची गडकरी, माधव बेहेरे, श्रीपाद पुराणिक आणि अनेक कवीमित्रांनी समर्थपणे सांभाळली. त्यानंतर अलीकडच्या काही वर्षांत प्रवीण दामले, जयंत कुलकर्णी आदींच्या मार्गदर्शनाखाली आनंद पेंढारकर, मुकुंद कुलकर्णी, शिरीष देशपांडे, प्रसाद टिळक, हेमंत राजाराम, श्रीकांत कुलकर्णी, कौस्तुभ आपटे, वैभवी भिडे, गोविंद नाईक, अलका असेरकर, मृणाल केळकर, मंजिरी देशमुख आणि डॉ. प्रमोद बेजकर अशी अनेक गुणी कवीमंडळी मंडळाच्या उत्कर्षासाठी आजही झपाटून काम करीत आहेत. बाळ बेंडखळे, शरद कुलकर्णी, अमिता चक्रदेव, अमिता कोकाटे, स्नेहल शेवडे अशा अनुभवी सदस्यांची साथ होतीच. मंडळाने आजवर अनेक उपक्रम राबवत कलेचा आलेख उंचावत ठेवला आहे. ‘काव्य रसिक मंडळा’कडून राबविण्यात आलेले उपक्रम खालीलप्रमाणे :
अनेक मान्यवर कवींचे कवितांचे कार्यक्रम
शालेय विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी स्पर्धांचे आयोजन
नवीन छापून आलेल्या कविता, गझल संग्रहांना पारितोषिके देणे.
सन 2016 पासून आजपर्यंत अतिशय उत्तम उत्साहाने आणि प्रतिसादाने ‘एक रात्र कवितेची’ हा उपक्रम दरवर्षी राबविला जात आहे. सुवर्ण महोत्सवी वर्षाच्या अध्यक्षपदी असताना कवी अशोक नायगावकर यांनी हा उपक्रम सुचविला होता.
कोविड काळातही व्हॉट्सअॅपमार्फत गझलेचे, तसेच वृत्तबद्ध कवितेचे मार्गदर्शन येथील मान्यवर कवी गझलकार जयंत कुलकर्णी, योगेश वैद्य, हेमंत राजाराम, आनंद पेंढारकर हे नवोदित कवींना करत होते. काव्यलेखनाचा दर्जा सुधारावा हा त्यामागचा प्रयत्न होता.
नवोदित कवींना प्रोत्साहन म्हणून त्यांचे मासिक सभेत कार्यक्रम घेतले जातात.
महिला दिनाचे औचित्य साधून एलआयसी, डोंबिवली शाखेत माजी अध्यक्षा वैदेही जोशींच्या समन्वयाने कवींचा कार्यक्रम.
‘काव्य रसिक मंडळ, डोंबिवली’ आणि ‘डोंबिवली ग्रंथसंग्रहालय, डोंबिवली (प.)’ यांच्या संयुक्त विद्यमानाने ‘युवा साहित्य अकादमी पुरस्कार’प्राप्त विशाखा विश्वनाथ हिचा सत्कार जुलै 2023 मध्ये करण्यात आला.
डोंबिवली येथील ‘पै. फ्रेंड्स लायब्ररी’मध्ये ज्येष्ठ कविवर्य द. भा. धामणस्कर यांच्या नावाने कवितांच्या पुस्तकाचे वेगळे दालन 2023 मध्ये स्थापन करण्यात आले असून जुन्या-नव्या अशा अनेक कवितासंग्रहांना आपण तिथे भेट देऊ शकता. याचे उद्घाटन सुप्रसिद्ध कवी किरण येले यांच्या हस्ते करण्यात आले.
मंडळाच्या विद्यमान कार्याध्यक्ष सम्राज्ञी उटगेकर यांनी सदर माहिती संकलनासाठी मोलाचे सहकार्य केले आहे.
चालू वर्षातील विद्यमान कार्यकारिणी
अध्यक्ष : उज्ज्वला लुकतुके,
कार्याध्यक्ष : स्वाती भाट्ये, सम्राज्ञी उटगीकर,
सचिव : दया घोंगे, उपसचिव : सानिका गोडसे,
खजिनदार : मेघना पाटील,
उपखजिनदार : संदीप मर्ढेकर,
सल्लागार : विजय जोशी, वैदेही जोशी,
सदस्य : निशा काळे, प्रज्ञा कुलकर्णी