चंदेरी दुनियेतील एक लाईटमॅन ते कॅमेर्यामागचा जादूगार अर्थात, ‘सिनेमॅटोग्राफर’ हा प्रवास लॉरेन्स डिकोना, यांनी कसा केला, याविषयी...
'चंदेरी दुनिया’ अर्थात चित्रपटसृष्टी प्रत्येक माणसासाठी स्वप्नवत असते. एकदा तरी मोठ्या पडद्यावरच्या कलाकारांच्या यादीत आपलं नाव असावं, अशी प्रत्येक होतकरु कलाकाराची ही प्रामाणिक इच्छा असते. अशीच स्वप्न आणि इच्छा मनाशी बाळगूनच छायाचित्रकार लॉरेन्स डिकोना यांनी देखील, मनोरंजनसृष्टीत आपलं नशीब आजमावण्याचा निर्णय घेतला होता.
लॉरेन्स यांचा जन्म मुंबईमध्येच झाला. मुंबईतील गोरेगाव इथे त्यांचं बालपण गेलं. गोरेगावमध्येच लॉरेन्स यांनी शालेय शिक्षण पूर्ण केलं. त्यानंतर महाविद्यालयीन शिक्षणासाठी त्यांनी चर्चगेट गाठले. सिद्धार्थ महाविद्यालयात पुढील शिक्षण पूर्ण केले. पुढे इतर कोणत्याही क्षेत्रात शिकून ते नोकरी करु शकले असते. पण, त्यांना कला क्षेत्र साद घालत होतं. त्यामुळे कलेत आपण प्रावीण्य मिळवून, तिथे आपलं नाव कमवावे, या उद्देशाने लॉरेन्स यांनी मनोरंजनसृष्टीची वाट धरली. लॉरेन्स यांनी सुरूवात ‘लाईटमॅन’ म्हणून केली. खरं तर त्यांचे वडीलदेखील याच क्षेत्रात ‘लाईटमॅन’ होते. पण, ज्यावेळी लॉरेन्स यांनी काम करण्यास सुरूवात केली, त्यावेळी वडिलांनी या क्षेत्रातून निवृत्ती घेतली होती. मुळात चित्रपटसृष्टीत काम करायचे असल्यास, संयम अंगी असणे अतिशय महत्त्वाचे असते. हाच संयम सहा वर्ष लॉरेन्स यांनी ठेवला. छायाचित्रकार म्हणून आपलं नाव लोकांसमोर आणण्यापूर्वी, ‘लाईटमॅन’ म्हणून सहा वर्ष कामं केलं.
चित्रपसृष्टीत कोणत्याही क्षेत्रात काम करायचं असेल, तर त्याचं शिक्षण घेणं फार महत्त्वाचं आहे. पण, लॉरेन्स यांनी छायाचित्रकार होण्यासाठी आवश्यक शिक्षण घेतलं नाही. कारण, त्यांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत होता. ज्यावेळी ‘लाईटमॅन’ म्हणून लॉरेन्स यांनी काम करण्यास सुरूवात केली, तेव्हा वडिलांनी नोकरीला राम राम केला होता. त्यामुळे घराची आर्थिक जबाबदारी लॉरेन्स यांच्या खांद्यावर होती. घरातील लहान अपत्य असूनही मोठी बहीण, आई ,वडील असं चौघांचं कुटुंब लॉरेन्स यांनी सांभाळलं आणि सोबतच आपलं स्वप्न पूर्ण करण्याचा त्यांचा प्रवास सुरुच ठेवला होता.
लॉरेन्स यांचा प्रवास खडतर होता. पण, नशीबाने त्यांना ‘लाईटमॅन’ म्हणून पहिलीच कामाची संधी मिळाली ती ‘देवदास’ या चित्रपटासाठी. त्यानंतर बर्याच प्रोजेक्टवर काम केल्यानंतर, लॉरेन्स यांनी हातात कॅमेरा घेतला. ’कॅमेरा अटेंडंट’ म्हणून काम करताना त्यांनी, ‘मुन्नाभाई एम.बी.बी.एस’, ‘लगे रहो मुन्नाभाई’, ‘रंग दे बसंती’ हे चित्रपट आपल्या हातातील कला आणि कॅमेर्याने त्यांनी टिपले. पुढे त्यांनी ती साहाय्यक छायाचित्रकार म्हणून आपली ओळख निर्माण करण्याकड पाऊले वळवली. साहाय्यक छायाचित्रकार म्हणून काम करताना त्यांनी पहिला चित्रपट केला, ‘ओय लक्की लक्की ओय’, त्यानंतर ‘बॉस’, ‘ब्ल्यु’, ‘लेकर हम दिवाना दिल’, ‘मटरु की बिजली का मन डोला’ या चित्रपटांना साहाय्य केलं. अनेक वर्षांचा अनुभव गाठीशी घेऊन, लॉरेन्स यांनी स्वतंत्रपणे छायाचित्रकार म्हणून कारकीर्दीची सुरुवात केली.
‘लाईटमॅन’ क्षेत्रात काम केल्यानंतर पुढील वाटचालीची सुरूवात करत असताना, लॉरेन्स यांच्याकडे पैसे नव्हते. पण तरीही त्यांनी जिद्दीने या क्षेत्रात पुढे जाण्याचा निर्णय घेत, तो निर्णय यशस्वीरित्या पूर्ण केला. शिवाय आपले नाव अधिकाधिक लोकांपर्यंत आणि या क्षेत्रातील दिग्गजांपर्यंत पोहोचावे, यासाठी काहीवेळा फुकटातही काम केले आहे. मात्र, लॉरेन्स यांच्या जीवनात एक वेळ अशी देखील आली की, ज्यावेळी त्यांना हे क्षेत्र सोडून दुसरी नोकरी करण्याचा विचार देखील आला होता. कारण, ज्यावेळी ते साहाय्यक म्हणून काम करत होते, तेव्हा त्यांना नाव, प्रसिद्धी आणि पैसे मिळत होते. मात्र, स्वतंत्रपणे काम करण्यास सुरूवात केल्यानंतर ,क्षेत्रातून ‘तू एकट्याने काय काम केलं आहेस ते दाखव’ याची विचारणा होते असे. साहाय्यक म्हणून काम केल्यामुळे त्यांनी त्यांची कला दाखवली नव्हती आणि परिणामी स्वतंत्रपणे प्रोजेक्ट मिळवणं लॉरेन्स यांना कठीण गेलं. परंतु, कॅमेर्याशिवाय आपला उद्देशच नाही आहे, हे ठाऊक असल्यामुळे त्यांनी स्वत:च विश्व तयार केले. त्यानंतर पहिलाच चित्रपट केला, बोनी कपूर यांची निर्मिती असलेला ‘लालबागची राणी’. पुढे मग लॉरेन्स यांनी स्वतंत्रपणे छायाचित्रिकरण करताना ‘झोंबिवली’, ‘टाईमपास 3’, ‘उनाड’ हे चित्रपट केले.
आनंदाची बाब म्हणजे ‘उनाड’ या चित्रपटासाठी त्यांना ‘फिल्मफेअर पुरस्कार’ देखील मिळाला आहे. मात्र, या चित्रपटाचे चित्रीकरण करताना लॉरेन्स यांचा जीवदेखील जाऊ शकला असता. कारण, कोकणात या चित्रपटाचं चित्रीकरण करण्यात आलं. आणि लॉरेन्स यांच्यासाठी आयडियल चित्रपट ‘लाईफ ऑफ पाय’ होता. त्यात जशी बोट आणि निसर्गरम्य वातावरण दाखवलं होतं, तसंच लॉरेन्स यांना ’उनाड’मध्ये दाखवायचं होतं. त्यानुसार समुद्रात बोट घेऊन त्यात चित्रीकरण करत असताना वादळ आलं होतं आणि त्यात बोट उलटून त्यांचा जीव गेला असता. पण जीवाची पर्वा न करता त्यांनी तो चित्रपट पूर्ण केला आणि त्याच चित्रपटासाठी त्यांना पुरस्कार देखील मिळाला. त्यामुळे आपल्या कामावर प्रेम, निष्ठा आणि स्वत:वर विश्वास असला की, कोणतीही गोष्ट अशक्य नसते, हे लॉरेन्स यांनी आत्मसात केले आणि आज छायाचित्रकार म्हणून नावारुपास आले. ‘दै. मुंबई तरुण भारत’कडून लॉरेन्स यांना त्यांच्या पुढील सर्व वाटचालीसाठी शुभेच्छा!