प्रथेप्रमाणे नोव्हेंबर महिन्याच्या पहिल्या मंगळवारी अमेरिकेत निवडणुका पार पडतील. डेमोक्रॅटिक पक्षाकडून कमला हॅरिस, तर रिपब्लिकन पक्षाकडून डोनाल्ड ट्रम्प यांच्यातील चुरस दिवसेंदिवस वाढताना दिसते. मतदार चाचण्यांमध्येही दोन्ही उमेदवारांमध्ये चढाओढ असून अमेरिकेतील निवडणुकांची उत्कंठा शिगेला पोहोचली आहे.
अमेरिकेतल्या अध्यक्षीय निवडणुका अवघ्या दोन आठवड्यांवर आल्या आहेत. ज्यांना दि. 5 नोव्हेंबरला मतदान करता येणार नाही, त्यांच्यासाठी नियोजित मतदान केंद्रांवर तसेच, पत्राद्वारे मतदान सुरू झाले आहे. आतापर्यंत 15 टक्के मतदारांनी त्यात सहभाग घेतला असून, आणखी 26 टक्के पात्र मतदार निवडणुकांच्या दिवसापूर्वीच आपला मतदानाचा हक्क बजावतील, असा अंदाज आहे. 2020 सालाप्रमाणेच, याही निवडणुका अत्यंत चुरशीच्या आहेत. अध्यक्ष जो बायडन यांनी दोन महिन्यांपूर्वी शर्यतीतून माघार घेतल्यानंतर उपाध्यक्ष कमला हॅरिस यांना घाईघाईत अध्यक्षपदाच्या उमेदवार म्हणून नेमण्यात आले. बायडन यांच्याशी लढण्याची रणनीती बनवलेल्या ट्रम्प यांच्या प्रचारयंत्रणेसाठी कमला हॅरिस यांच्याशी कशा प्रकारे लढावे, याबाबत गोंधळ असल्यामुळे कमला हॅरिस यांनी अल्पावधीतच मोठी आघाडी घेतली. जवळपास प्रत्येक मतदार चाचणीमध्ये कमला हॅरिस ट्रम्प यांच्यापेक्षा चार ते पाच टक्क्यांनी पुढे गेल्याचे दिसत होते. कमला हॅरिस यांनी अवघ्या तीन महिन्यांत एक अब्ज डॉलर्स निवडणूक निधी जमवला, जो डोनाल्ड ट्रम्प यांनी मिळवलेल्या निधीच्या दुप्पट होता. पण, गेल्या महिन्याभरात कमला हॅरिस यांच्या लोकप्रियतेला ओहोटी लागायला सुरूवात झाली. या आठवड्यात पहिल्यांदाच काही चाचण्यांनी ट्रम्प यांनी कमला हॅरिस यांना मागे टाकल्याचे स्पष्ट केले आहे. अर्थातच हा फरक एक टक्के मतांचा आहे. कोणत्याही मतदार चाचणीचे निकाल सुमारे तीन टक्क्यांच्या फरकाने चुकू शकतात. त्यामुळे अमेरिकेच्या अध्यक्षपदाची निवडणूक अत्यंत उत्कंठावर्धक अवस्थेत पोहोचली आहे. कमला हॅरिस लोकांसाठी अपरिचित असल्याचा त्यांना फायदा होत होता. आता कमला हॅरिस यांना आपल्याच भूतकाळाशी लढावे लागत आहे.
जो बायडन अध्यक्ष झाल्यावर ‘कोविड-19’च्या संकटावर मात करण्यासाठी तिजोरीची दारे सताड उघडण्यात आली. याच काळात चीनने कडकडीत लॉकडाऊन पाळल्यामुळे पुरवठा साखळ्या विस्कळीत झाल्या. त्यामुळे अमेरिकन लोकांच्या हातात पैसा खुळखुळत असला, तरी महागाईत प्रचंड प्रमाणात वाढ झाली. ती रोखण्यासाठी अमेरिकेच्या ‘फेड’ने व्याजदरांत मोठ्या प्रमाणावर वाढ केली. त्यामुळे सामान्य अमेरिकन लोकांसाठी व्याजदर दहा टक्क्यांवर पोहोचला. याच काळात अमेरिकेने मानवाधिकारांच्या नावावर सौदी अरेबियाला सावत्रपणाची वागणूक दिली. युक्रेन युद्धामुळे रशियावर निर्बंध घातले आणि पर्यावरणवादी दबावगटामुळे अमेरिकेतील शेल तेलाच्या उत्खननावर मर्यादा लादल्या. त्यामुळे पेट्रोल आणि डिझेलच्या किमती मोठ्या प्रमाणावर वाढल्या. परिस्थिती नियंत्रणात आणायची, तर वेगाने उपाययोजना करायची गरज होती. पण, अमेरिकेतील दुभंगलेल्या लोकशाहीमुळे ते शक्य नाही. रिपब्लिकन आणि डेमोक्रॅटिक पक्षांमध्ये पराकोटीचा द्वेष निर्माण झाला आहे. बायडन प्रशासनाच्या पहिल्या दोन वर्षांमध्ये अमेरिकेतील सिनेटमध्ये रिपब्लिकन पक्षाचे, तर प्रतिनिधीगृहामध्ये डेमोक्रॅटिक पक्षाचे बहुमत होते. 2022 सालच्या निवडणुकीत दोन्ही पक्षांनी आदलाबदली केली. सिनेट डेमोक्रॅटिक पक्षाकडे तर प्रतिनिधीगृह रिपब्लिकन पक्षाकडे गेले. या वर्षी पुन्हा एकदा अदलाबदली होईल, अशी चिन्हे आहेत. अमेरिकेत अध्यक्ष कोणतेही निर्णय घेऊ शकत असले, तरी त्यासाठी आर्थिक तरतूद करायची, तर संबंधित विधेयके दोन्ही सभागृहात मंजूर व्हावे लागतात.
अमेरिकेतील राजकीय साठमारीत अनेक महत्त्वाची विधेयके अडकली. यात दोन्ही पक्षांची चूक असली, तरी बायडन कोंडी फोडण्यात आलेल्या अपयशाचे धनी झाले. त्यावर उपाय म्हणून बायडन प्रशासनाने मोठ्या प्रमाणावर तेल उत्खनन करण्याचे परवाने दिले. सौदी अरेबियाशी संबंध सुधारले. रशियातून तेलाच्या आयातीवर निर्बंध लादताना भारत आणि चीन यांनी रशियन तेलाच्या आयातीतून बनवलेले पेट्रोलजन्य पदार्थांच्या आयातीकडे दुर्लक्ष केले. त्यातून आपली मानवाधिकार आणि पर्यावरणाविषयीची काळजीही राजकीय असल्याचे स्पष्ट झाले. तीच गोष्ट इस्रायल आणि ‘हमास’मधील युद्धाबाबतही लागू पडते. आपल्या पाच दशकांच्या राजकीय कारकिर्दीत बायडन यांनी सदैव इस्रायलची पाठराखण केली आहे. अमेरिका आणि इस्रायल यांच्यातील मैत्रीचा धागा अतिशय भक्कम आहे. अमेरिकेतील वाढता मुस्लीम आणि अतिडावा वर्ग मुख्यतः डेमोक्रॅटिक पक्षाला मतदान करतो. त्यांचे लांगुलचालन करण्यासाठी कमला हॅरिस यांनी युद्ध थांबवण्याबद्दल काही सूचक वक्तव्ये केली. तेव्हा असा अंदाज होता की, हे युद्ध आता अनिर्णित अवस्थेकडे जात आहे. पण, प्रत्यक्षात मात्र त्याला वेगळीच कलाटणी मिळाली. इस्रायलने ‘हमास’चे राजकीय प्रमुख इस्माइल हानिया यांची इराणची राजधानी तेहरानमध्ये हत्या घडवून आणली. ‘हिजबुल्ला’चा प्रमुख हसन नसराल्ला आणि त्याच्या दोन उत्तराधिकार्यांचीही लेबनॉनमध्ये हत्या घडवून आणली. याच काळात लेबेनॉनमध्ये ‘हिजबुल्ला’च्या महत्त्वाच्या अधिकार्यांना संदेशवहनासाठी दिलेल्या पेजर तसेच, वॉकीटॉकीमध्ये स्फोट होऊन त्यापैकी अनेक जण लढण्याच्या परिस्थितीत राहिले नाहीत. दि. 17 ऑक्टोबरला इस्रायलने दि. 7 ऑक्टोबर 2023च्या हल्ल्यांसाठी जबाबदार असलेल्या ‘हमास’चा लष्कर प्रमुख याह्या सिनवर यास ठार मारले.
दरम्यानच्या काळात इराणने इस्रायलवर 200 दीर्घ पल्ल्याच्या क्षेपणास्त्रांचा मारा केला, तर ‘हिजबुल्ला’ने थेट इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांच्या खासगी निवासस्थानाजवळ ड्रोनचा हल्ला केला. हे दोन्ही हल्ले निष्फळ ठरले असले, तरी आता इस्रायल इराण आणि ‘हिजबुल्ला’ला प्रत्युत्तर देणार हे उघड आहे. असे झाल्यास पुन्हा एकदा अमेरिकेला इस्रायलच्या पाठी भक्कमपणे उभे राहावे लागेल. त्यामुळे कमला हॅरिस यांचे आपण इस्रायलच्या बाबतीत बायडनपेक्षा वेगळे आहोत, हे आश्वासन हवेतल्या हवेत विरुन गेले. अरब-अमेरिकन मतदार ट्रम्प यांना मतदान करण्याची शक्यता कमी असली तरी, त्यांचे मतदानाचे प्रमाण कमी असेल, असा अंदाज आहे. कमला हॅरिस यांना बेकायदेशीर स्थलांतराचा प्रश्न सर्वाधिक त्रासदायक ठरणार आहे. ‘कोविड-19’चे संकट आणि त्यानंतर आलेल्या युद्ध, यादवी आणि आर्थिक संकटांमुळे आशिया, आफ्रिका तसेच, दक्षिण अमेरिकेतून युरोप आणि अमेरिकेत बेकायदेशीर स्थलांतराचे प्रमाण प्रचंड मोठ्या प्रमाणावर वाढले आहे. अमेरिका आणि मेक्सिको दरम्यान 3 हजार, 145 किमी सीमा असून, अनेक ठिकाणी त्या सीमेला कुंपण नाही. ते ओलांडणे अवघड असले तरी, मेक्सिकोतील गुन्हेगार अमलीपदार्थ तसेच, मानवी तस्करीत गुंतलेल्या टोळ्या लोकांना पैसे घेऊन अमेरिकेत पोहोचवण्याचे काम करतात. ट्रम्प अध्यक्ष असताना त्यांनी सीमेवर भिंत बांधायला तसेच, बेकायदेशीररित्या आलेल्या कुटुंबीयांना त्यांच्या मुलांपासून वेगळे ठेवायला सुरूवात केली. तेव्हा अमेरिकेतील डाव्या आणि पुरोगामी वर्गाने त्यांच्यावर सडकून टीका केली.
कमला हॅरिस मेक्सिकोशी सीमा असलेल्या कॅलिफोर्निया राज्याच्या अॅटर्नी जनरल तसेच सिनेटर होत्या. त्यावेळी त्यांनी घेतलेल्या उदारमतवादी भूमिका आज त्यांच्यासाठी त्रासदायक ठरत आहेत. अमेरिकेत लाखो लोक बेकायदेशीररित्या शिरले असून, त्यांच्यामुळे अमेरिकेतल्या श्रमजीवी लोकांचे रोजगार जात आहेत. ट्रम्प यांनी बेकायदेशीर शहरातील लोकांनी पाळलेले कुत्रे आणि मांजरे मारून खातात, असे आरोप केले आहेत. ते अतिरंजित असले तरी हा मुद्दा लोकांच्या मनावर बिंबवण्यात यशस्वी झाले आहेत. या मुद्द्याचा सर्वाधिक प्रभाव कृष्णवर्णिय पुरुषांवर होत असून, पारंपारिकदृष्ट्या ते डेमोक्रॅटिक पक्षाचे मतदार आहेत. ट्रम्प यांच्या हत्येचे दोन प्रयत्न अयशस्वी ठरल्यामुळे त्यांच्याबद्दल सहानुभूती वाढली आहे. 2020 सालच्या अध्यक्षीय निवडणुकीत अमेरिकेतील एकही मोठा माध्यम समूह ट्रम्प यांच्या बाजूने नव्हता. या निवडणुकीतही अमेरिकेतील नामवंत वर्तमानपत्रे आणि वृत्तवाहिन्या ट्रम्प यांच्या विरोधात असल्या तरी, सर्वाधिक बघितल्या जाणार्या ‘फॉक्स’ वृत्तवाहिनीने ट्रम्प यांची बाजू उचलून धरली आहे.
अमेरिकेतल्या अध्यक्षीय निवडणुका या 50 राज्य आणि राजधानी वॉशिंग्टनमधील निवडणुकांची गोळाबेरीज असतात. कमला हॅरिस यांना0 ट्रम्पपेक्षा जास्त मतदान होणार असले तरी, आजच्या घडीला चुरशीची निवडणूक असलेल्या राज्यांमधील त्यांची आघाडी कमी होताना दिसत आहे. पुढील दोन आठवड्यांतील प्रत्येक दिवस महत्त्वाचा असून, त्यात काय होते त्यावर अध्यक्षीय निवडणुकीचे भवितव्य ठरणार आहे.