मुंबई (विशेष प्रतिनिधी) : (Prayagraj Murti Chor News) उत्तर प्रदेशातील प्रयागराज जिल्ह्यातील एका चोरट्याने मंदिरातून चोरलेली मूर्ती पुन्हा मंदिरात आणून ठेवल्याचे समोर आले आहे. मंगळवारी स्वतः त्या चोराने मूर्ती आणली तेव्हा त्यासोबत माफीची चिठ्ठीदेखील लिहिली होती. त्यात त्याने चोरीनंतर सतत पडणारी भयानक स्वप्न आणि दुर्दैवी घटना यांचा उल्लेख केला आहे, ज्यामुळे चोरलेली मूर्ती पुन्हा मंदिरात आणून सोडणे चोरास भाग पडले.
हे वाचलंत का? : श्याम मानव विरोधात फौजदारी गुन्हा दाखल होणार?
मिळालेल्या माहितीनुसार, प्रयागराज येथील गौघाट परिसरात खसला नावाचे आश्रम आहे. या आश्रमातील मंदिराच्या गर्भगृहात सुमारे १०० वर्षे जुनी राधा-कृष्णाची अष्टधातूची मूर्ती आहे. ती मूर्ती या चोरट्याने सोमवारी मंदिरातून चोरली. मंदिराचे महंत जयराम दास यांनी याबाबत पोलिसांत तक्रार केली असता पोलिसांनी गुन्हा दाखल करून चोरट्याचा शोध सुरू केला. परंतु चोरट्याने मंगळवारी पहाटे ती मूर्ती परत मंदिराजवळ आणून ठेवली आणि त्यासोबत माफीचे पत्रदेखील ठेवले.
सदर माफीनाम्यात त्याने आपली कृती अज्ञानाची बाब असल्याचे म्हटले आहे. “माझ्याकडून मोठी चूक झाली. चोरीच्या दिवसानंतर मला भयानक स्वप्न पडत आहेत. माझ्या मुलाची प्रकृतीही बिघडली आहे. थोड्या पैशांसाठी मी हे पाऊल उचलले जे चूकीचे आहे. मूर्ती विकण्यासाठी मी खूप छेडछाड केली. माझ्या चुकीबद्दल माफी मागून मी मूर्ती पुन्हा मंदिरात सोडत आहे. मी तुम्हाला विनंती करतो की माझी चूक माफ करा आणि देवाला पुन्हा मंदिरात बसवा. आमच्या मुलांना क्षमा करा आणि तुमची मूर्ती स्वीकारा.” मूर्ती परत आल्याने सध्या आश्रमात आनंदाचे वातावरण आहे. जलाभिषेक व इतर धार्मिक विधी करून मूर्तीची पुनर्स्थापना करण्यात आली. या प्रकरणाची माहिती पोलिसांनाही देण्यात आली असून पोलीस कायदेशीर कारवाई करत आहेत.