श्रद्धांजली सभा की ????

    19-Oct-2024   
Total Views |
professor g n saibaba tribute meeting
 

प्राध्यापक जी.एन. साईबाबा याचा हैदराबादच्या इस्पितळामध्ये, दि. 12 ऑक्टोबर रोजी मृत्यू झाला. जी.एन.साईबाबाचा मृत्यू नाही तर खून झाला आणि तो भारतीय प्रशासन व्यवस्थेने केला असे म्हणत, काही संस्था, तथाकथित विचारवंत ‘मुंबई रायझेझ सेव्ह डेमोक्रसी’ संस्थेअंतर्गत एकत्र येऊन, त्यांनी जी.एन.साईबाबा श्रद्धांजली सभा आयोजित केली. ही लाल सलामची सभा पाहून एकच वाटले ते म्हणजे, देशात आणि राज्यातही सध्याचे देशप्रेमी सरकार सत्तेत असणे आणि पुन्हा पुन्हा येणे किती गरजेचे आहे. या प्रकरणावर तपशीलवार विवेचनात्मक आढावा घेणारा हा लेख...

”साई मेला नाही त्याला मारले. इंडियन स्टेटनी त्याचा थंड डोक्याने खून केला.” साई म्हणजे जी.एन.साईबाबा कसा 90 टक्के अपंग होता, कसा चांगला होता, कसा गरिब, दलित आदिवासींसाठी लढणारा होता, असे ते म्हणत होते. साईच्या मृत्यूच्या विरोधात आपण सगळ्यांनी एकत्र यायला पाहिजे. तसेच, आता तर देशाचे काही खरे नाही. सो कॉल्ड हिंदुत्व आणि राष्ट्रीयत्व एकत्र आले आहे. आता काय करायचे? एकंदर भारत सरकार प्रशासन किती वाईट आहे, याची होता होईल तितकी उजळणी हे सगळे वक्ते फर्ड्या इंग्रजीत करत होते. ‘मुंबई रायझेझ टु सेव्ह डेमोक्रसी’ या संस्थेने, जी.एन.साईबाबासाठी बाँबे प्रेस क्लबमध्ये श्रद्धांजली सभा आयोजित केली होती. श्रद्धांजली म्हटले की दुख असे एक समिकरण असते. पण इथे श्रद्धांजली ऐवजी, कम्युन्स्टिांच्या स्नेहसंमेलनाचा कार्यक्रम जास्त वाटत होता. भिमा कोरेगावच्या घटनेनंतर 40 संस्था एकत्र आल्या आणि त्यांनी ही ‘मुंबई रायझेझ टु सेव्ह डेमोक्रसी’ संघटना स्थापन केली, असे सूत्रसंचालन करणार्‍या महिलेने सांगितले. आता या 40 संस्थाचे प्रतिनिधी तिथे असतील की नसतील माहिती नाही. मात्र, उपस्थित सगळे जण कॉम्रेड आणि लाल सलामचे भक्त होते, हे मात्र खरे.
तर जी.एन.साईबाबा विविध आजारांनी मेला या सत्याला नाकारून, हे लोक त्याच्या मृत्यूला भारत सरकारला कारणीभूत ठरवत होते. भारत सरकारचा उल्लेख ते इंडियन स्टेट असे करत होते. अ‍ॅड. मिहीर देसाई, ‘इंडिया आफ्टर नक्षलबारी अन्फिनिश्ट हिस्ट्री’ या पुस्तकाचा लेखक आणि जी.एन.साईबाबाशी संबंधित असलेला, बर्नारर्ड डिमेलो यांनी श्रद्धांजली सभेत भाषण केले. जी.एन.त्यात साईबाबा निर्दोष होता, त्याला उगीचच तुरूंगात टाकले, असे या दोघांनी रेटून सांगितले. एकंदर श्रद्धांजली सभेचा सूर असाच होता. नाही म्हणायला
 
हम देखंगेे लाजमी है
के हम भी देखेंगे
बस ताज उछाले जायेंगे
सब तख्त गिराये जाऐंगे
हे पाकिस्तानी कवीचे गीत ‘द काश्मीर फाईल्स’ सिनेमामध्ये, नक्षली समर्थकांना गाताना आपण पाहिलेच होते. तर हे गीत राष्ट्रगीत असल्याच्या अविभार्वात, या श्रद्धांजली सभेत एका युवतीने गायले. बसलेल्या सगळ्यांनीच या गीतावर भक्तीभावाने ठेकाही धरला होता. त्यानंतर लाल भडक शर्ट घातलेल्या एका तरूणाने, भिमा कोरेगावच्या हिंसासंदर्भात तुरूंगात असलेल्या कैद्यांची मनोगते या श्रद्धांजली सभेत वाचून दाखवली. अर्थात या सगळ्या कैद्यांनी जी.एन.साईबाबाचे गुणगाण करून, भारत सरकारला गुन्हेगार ठरवले होते. तुरूंगातूनही आपण क्रांतीची स्वप्न पाहतो असे म्हटले होते. तर अशा श्रद्धांजली सभेत वय वर्षे 90 ते 60 पर्यंतचे, 50 ते 60 आंग्लाळलेले स्त्री-पुरूष बसले होते. डाव्या विचारांच्या कोणत्याही कार्यक्रमाला याच वयाचा गट अपेक्षित असतो म्हणा. त्यातही अनेक कार्यक्रमांमध्ये, मागासवर्गीय समाजाच्या आठ-दहा तरूण तरूणींना बोलावलेले असतेच असते. ते मग डफलीवर ‘जय भीम जय भीम’ म्हणत, लाल सलाम करत राहतात, पण या कार्यक्रमाला ते दिसले नाहीत. उलट 16 ते 18 वर्षाची झब्बा कुर्ता घातलेली आणि लाल सोनेरी केस रंगवलेली, चार-पाच तरूण मुले दिसली. ही अशी मुले मुस्लीम वस्तीत प्रामुख्याने आढळतात. म्हणजे आता टारगेट ग्रुप बदलला असल्यचे जाणवते. लाल भडक शर्ट घातलेली आणि अगदी कन्हैया कुमारसारखे केशभूषा दाढी वगैरे राखलेले, चार-पाच तरूणही होते. दोन शीख बांधवही होते. सगळ्या देशाचा भार आपल्यावर आहे आणि आपण सारेकाही उलथवून नवे राज्य साकारणार, असा एकूणच या सगळयांचा अविर्भाव होता. एका कोपर्‍यात ‘फ्रि उमर खलिद’ लिहिलेला आणि त्याचा फोटो असलेला बोर्डसदृष्य पेपर लावला होता. जी.एन.साईबाबाच्या श्रद्धांजली सभेत ‘भारत तेरे तुकडे होंगे हजार। इशाअल्लाह इशाअल्लाह’ म्हणणार्‍या उमर खलिदचा फोटो का असेल? जी.एन.साईबाबा, तसेच भिमा कोरेगावचे नाव बळेच घेऊन एकत्र आलेल्या, या ‘मुंबई रायझेझ सेव्ह डेमोक्रसी’ संस्थेचा या मागचा उद्देश काय होता? भारताचे तुकडे व्हावे अशी इच्छा असणारा उमर खलिद हा त्यांच्यासाठी हिरो आहे का? काय म्हणू शकतो? कारण उमर खलिदचाच साथीदार कन्हैयाकुमार सध्या, काँग्रेसपक्षाचा आघाडीचा नेता आणि हिरो झालाय.

असो, जी.एन.साईबाबाच्या जीवनाचा मागोवा घेतला, तर जी माहिती मिळते ती अशी की, ’अखिल भारतीय पीपल्स रेजिस्टेंस फोरम’ तसेच, फोरम ‘अगेंस्ट वॉर ऑन पिपल’ या सारख्या फोरमच्या माध्यमातून, जी.एन.साईबाबाने नेहमीच सरकारी अभियान योजनांना विरोध केला. हा विरोध करण्याचा उद्देश काय असेल? शोषण किंवा दडपशाहीच्या विरोधात तो आवाज उठवायचा असे म्हणावे, तर जी.एन.साईबाबा याने भारतीय संसदेवर हल्ला करणार्‍या अफजल गुरूला सजा होऊ नये, यासाठी प्रयत्न केले होते. संसदेवर हल्ला करणारा अफजल गुरू हा काय दलित आणि गरीब होता? छत्तीसगड, झारखंड, तेलंगणा, ओडिशा आणि महाराष्ट्राच्या काही भागात नक्षल्यांनी अपरिमीत हिंसा केली. भारत सरकारविरोधात युद्धच पुकारले. नक्षल्याविरोधात भारत सरकारने ‘सलवा जुडूम’ आणि ‘ऑपरेशन ग्रीन हन्ट’ कार्यान्वीत केले. त्यावेळी जी.एन.साईबाबाने आंतराष्ट्रीय स्तरावर, या दोन्ही अभियानाला विरोध केला. खरे तर या अभियानांमुळे नक्षलग्रस्त परिसर नक्षलमुक्त होणार होता. गरीब आदिवासी खर्‍या अर्थाने सुरक्षित होणार होते. पण जी.एन.साईबाबाने या अभियानाला विरोध करून, कोणाची बाजू घेतील होती?
 
2010 साली जान मरडल नावाचा एक आंतरराष्ट्रीय स्तरावरचा, अतिशय विखारी विचार असणारा कम्युनिस्टवादी भारतात आला होता. भारतात ‘माओवादी’ संस्थेला बंदी आहे. पण मरडल भारतात आला, तर तो थेट गेला छत्तीसगढच्या नक्षलग्रस्त परिसरात. त्याने माओवादी नक्षल्यांच्या मुलाखती घेतल्या. गोरगरिब आदिवासी आणि भारतीय प्रशासनावर हिंसक हल्ले करणार्‍या नक्षल्यांनी, त्याच्या केसालाही धक्का लावला नाही. तर या मरडल आणि नक्षल्यांची भेटीचे नियोजन जी.एन.साईबाबाने केले, असाही आरोप जी.एन.साईबाबावर होता. या जान मरडलच्या दिल्लीतील भाषणाचा एक उतारा पाहा, तो म्हणाला होता की, ”भारतीय राज्य यंत्रणेद्वारे भारताच्या लोकांविरोधात युद्ध सुरू आहे. आम्ही हे युद्ध थांबवू इच्छितो. मी आणि विदेशातील भारताचे अनेक मित्र, या भयंकर युद्धामध्ये भारताच्या लोकांसोबत आंतरराष्ट्रीय एकजूटता आंदोलन आयोजित करण्याचा प्रयास करत आहोत.” तर असा हा जान मरडल पीएन साईबाबाचा खास होता.

2014 साली जी.एन.साईबाबाला प्रतिबंधीत संघटनांशी संबंध आणि युपीए कायद्याअंतर्गत अटक करण्यात आली. त्यावेळी या जान मरडलने आंतरराष्ट्रीय स्तरावर वकिलांची फौज तयार करून , जी.एन.साईबाबाची सुटका करण्यासाठी भारत देशावर आंतरराष्ट्रीय दडपण आणण्याचे मनसुबे उघड उघड बोलनू दाखवले, तसा प्रयत्नही केला.

यावर भारतीय राजकीय आणि समाजअभ्यासकाचे मत आहे की, हे सगळे का चालले होते? तर 2014 साली देशात भाजपचे हिंदुत्ववादी सरकार आले होते. रा.स्व.संघाचे स्वयंसेवक नरेंद्र मोदी हे पंतप्रधान झाले होते. महाराष्ट्रातही भाजपची सत्ता होती. कम्युनिस्ट विचारधारेला घरघर लागणे सुरू झाले होते. अशावेळी भारतात अस्थिरता कशी आणता येईल? यासाठीचे हे आंतरराष्ट्रीय प्रयत्न असावेत. त्यानंतर पुलाखालून बरेच पाणी गेले, मार्च 2024 साली जी.एन.साईबाबा पुराव्याअभावी सुटला. सुटल्यानंतर तो आजारीच होता. दहा दिवस तो इस्पितळामध्ये उपचार घेत होता. पण दि. 12 ऑक्टोबर 2024 रोजी त्याचा मृत्यु झाला. आता तो निरोगी होता आणि अचानक त्याचा मृत्यु झाला असेही म्हणू शकत नाही. कारण, जी.एन.साईबाबाचे समर्थन करणार्‍या अ‍ॅड. मिहीर देसाईच्या म्हणण्यानुसार, ”2018 सालापासूनच जी.एन.साईबाबाला आरोग्याचा त्रास होता.”

पुन्हा श्रद्धांजली सभेकडे वळू. ‘सेव्ह डेमोक्रसीच्या नावाखाली चाललेल्या कार्यक्रमात, प्रत्येक वक्त्याचे भारत सरकारला प्रशासनाला दोष देणे सुरू होते. हे सगळे ऐकून डोक उठले. त्यामुळे त्यांनीच लावलेल्या पुस्तकांच्या स्टॉलवर गेले. पुस्तकांवर नजर टाकली, तर लेनीन-मार्क्सची आणि काही मार्क्सवादी लेखकांची पुस्तके तिथे विक्रीला. मी विचारले ’भिमा कोरेगावनंतर एकत्रित आलेल्या संस्थाचा कार्यक्रम आहे. मग डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे पुस्तक नाही का?’ यावर बाजूला उभे असलेले युवक युवती म्हणाले, ”अ‍ॅक्चुली! यावर स्टॉलवरचा अतियश निरूपद्रवी दिसणारा युवक भक्तीभावाने म्हणाला ”मॅडम डॉ. आंबेडकराच्या विचारांमध्ये काही दोष आहेत. त्यामुळे डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचे विचार पटत नाहीत. डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या नजरेत स्टेट हिरो आहे. ते सांगतात की, स्टेटच्या सत्तेत जा. पण आम्हाला हे मान्य नाही. आम्हाला ही व्यवस्थाच नको. आम्हाला हे सगळ पालटवायच आहे.” तो असे म्हणत असतानाच, एका वक्त्याचे भाषण संपत होते. भाषण संपले म्हणून लाल सलाम आणि जय भीमचा नारा तिथले लोक देत होते. मनात आले की, या *** लोकांना डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे विचार पटत नाहीत. त्या विचारांमध्ये दोष आढळतो.

मग लाल सलामसोबत डॉ. बाबासाहेबांचे नाव का घेत होते? बाबासाहेबांचे नाव घेतले की, बाबासाहेबांना मानणारा समाज आपल्यासोबत येईल अशी त्यांना भाबडी आशा असते. ते तसा प्रयत्नही करतात मात्र, देशप्रेमी समाजप्रेमी सरकार केंद्रात आणि राज्यातही आहे. त्यामुळे त्यांना यश येत नाही. त्यामुळे महाराष्ट्रात लाल सलाम समर्थक सरकार यावे, म्हणून हे सगळे पुन्हा प्रयत्न करतीलच. त्यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे, संविधानाचे आणि लोकशाहीचे नाव वापरतीलच. या श्रद्धांजली सभेत ते तसे दिसलेच. त्यामुळे येणार्‍या निवडणुकीसाठी मुंबईने नव्हे, महाराष्ट्राने सावध राहायला हवे. या अनुषंगाने डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाचा वापर करणार्‍या या सगळ्यांचा निषेध! आणि भारत माझा देश आहे, असे आपण करोडो भारतीय म्हणत असतो. मात्र या जी.एन.साईबाबाच्या श्रद्धांजली सभेत ही जी चार टाळकी भारत स्टेट, भारत स्टेट म्हणून, देशाच्या व्यवस्थेलाच गुन्हेगार ठरवत होते, त्यांचाही जाहीर निषेध!


9594969638

योगिता साळवी

एम.ए. समाजशास्त्र. सध्या मुंबई तरुण भारत  येथे वार्ताहर-उपसंपादक पदावर कार्यरत. राजकीय कार्यकर्ता म्हणून प्रदीर्घ अनुभव. विविध सामाजिक प्रश्‍नांच्या अभ्यासाची आवड व लिखाण. वस्त्यांचे वास्तव हे मुंबई तरुण भारतमधील लोकप्रिय सदराच्या लेखिका.