मुंबई (विशेष प्रतिनिधी) : (Alok Kumar Valmiki Jayanti) उद्योग, व्यापार आणि विकासाचे वाहक बनण्याचा संकल्प करा, असे आवाहन विश्व हिंदू परिषदेचे आंतरराष्ट्रीय अध्यक्ष आणि ज्येष्ठ अधिवक्ता आलोक कुमार यांनी वाल्मिकी समाजाला केले आहे. महर्षी वाल्मिकी जयंती महोत्सवानिमित्त दिल्लीच्या लाल किल्ला येथे एक कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी समस्त हिंदू समाजाच्या वतीने शोभायात्रा काढण्यात आली होती.
उपस्थितांना संबोधत आलोक कुमार म्हणाले, महर्षी वाल्मिकींच्या आदि महाकाव्यामुळेच आपण सर्वांना श्रीरामाच्या आदर्श जीवनाची प्रेरणा घेऊ शकलो आहोत. रामायण आणि योग-वसिष्ठ ही त्यांची खास ओळख आहे. वाल्मिकी समाजाने शासकीय योजनांचा लाभ घेऊन आपल्या विकासाच्या प्रवासात झपाट्याने पुढे जाण्याची आता वेळ आली आहे.
विहिंपचे राष्ट्रीय प्रवक्ते विनोद बन्सल म्हणाले की, महर्षी वाल्मिकींच्या आशीर्वादानेच श्रीराम हे मर्यादा पुरुषोत्तम झाले. रामायणाच्या माध्यमातून त्यांनी श्रीराम आणि त्यांचे आदर्श जगाच्या कानाकोपऱ्यात नेले. श्रीरामांनी आपल्या १४ वर्षांच्या वनवासात एकोपा निर्माण करून संपूर्ण समाज एकत्र केला. त्यांचे महाकाव्य श्री रामायण वाचूनच जगातील कोणतीही व्यक्ती केवळ स्वतःच्याच नव्हे तर आपल्या कुटुंबाच्या, समाजाच्या आणि राष्ट्राच्या सर्वांगीण विकासाचे वाहन बनू शकते.