नवी दिल्ली : ( Uniform Civil Code )उत्तराखंडच्या समान नागरी कायद्याची नियमावली तयार झाली असून आता लवकरच राज्यात कायदा लागू केला जाईल, असे प्रतिपादन उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्करसिंह धामी यांनी शुक्रवारी केले आहे.
समान नागरी कायदा लागू करणारे उत्तराखंड हे देशातील पहिले राज्य ठरणार आहे. उत्तराखंड विधानसभेने समान नागरी कायद्यावर बहुमताने मंजुरीची मोहोर उमटविली होती. त्यानंतर कायदा लागू करण्यासाठी त्याचे नियम तयार करण्याची जबाबदारी समितीवर सोपविण्यात आली होती. या समितीने नियम तयार केले असून त्याचा मसुदा मुख्यमंत्री पुष्करसिंह धामी यांना सादर केला आहे.
समान नागरी संहिता कायद्याचे नियम राज्य सरकारने सादर केले आहेत. या नियमावलीत प्रामुख्याने चार भाग आहेत. ज्यामध्ये विवाह आणि घटस्फोटाची नोंदणी, लिव्ह-इन रिलेशनशिप, जन्म-मृत्यू नोंदणी आणि उत्तराधिकाराशी संबंधित नियमांचा उल्लेख केला आहे. राज्यात या कायद्याची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यासाठी लवकरच मंत्रिमंडळाच्या बैठकीत तारीख निश्चित केली जाईल. त्यासाठी अधिकारी व कर्मचाऱ्यांना प्रशिक्षणही दिले जाणार आहे. सर्वसामान्यांची सुलभता लक्षात घेऊन या समान नागरी संहितेसाठी एक पोर्टल आणि मोबाईल ॲपही तयार करण्यात आले आहे, जेणेकरून नोंदणी, अपील आदी सर्व सुविधा सर्वसामान्यांना ऑनलाइन माध्यमातून उपलब्ध करून देता येतील; असे मुख्यमंत्री पुष्करसिंह धामी म्हणाले.
देवभूमी उत्तराखंडमध्ये सर्वांना समान न्याय देण्यास सरकार कटिबद्ध असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. ते पुढे म्हणाले, महिला सक्षमीकरण आणि सुरक्षितता लक्षात घेऊन हे विधेयक तयार करण्यात आले आहे. या कायद्याची लवकरच अंमलबजावणी होणार आहे. स्वातंत्र्यानंतर उत्तराखंड हे देशातील पहिले राज्य बनणार आहे, ज्याला समान नागरी संहिता लागू करण्याचा मान मिळेल.