कोपरी-पाचपाखाडी विधानसभा मतदार संघात ३६६ मतदान केंद्र
18-Oct-2024
Total Views |
ठाणे : ( Kopri-Pachpakhadi )मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा बालेकिल्ला असलेल्या ठाण्यातील कोपरी-पाचपाखाडी विधानसभा मतदार संघात सद्यस्थितीत एकूण ३ लाख, ३८ हजार, ३२० मतदार आहेत. मागील २०१९ ची विधानसभा आणि नुकतीच पार पडलेली लोकसभा निवडणूक पाहता या मतदार संघात जेमतेम ५० ते ५६ टक्के मतदान झाले होते. त्यामुळे २०२४ च्या या विधानसभा निवडणुकीत मतदानाचा टक्का वाढविण्याचे मोठे आव्हान प्रशासनासमोर उभे ठाकले आहे.
ठाण्यातील कोपरी-पाचपाखाडी विधानसभा मतदार संघात एकूण ३ लाख, ३८ हजार ३२० मतदार आहेत. तर, ३६६ मतदान केंद्र असून एकही मतदान केंद्र झोपडपट्टीत नाही. मुख्यमंत्र्यांचा हा मतदार संघ असल्याने मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी प्रशासन विशेष दक्षता घेत आहे. सन २०१९च्या विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीत कोपरी पाचपाखाडी विधानसभा मतदारसंघासाठी ४९ टक्के मतदान झाले होते. तर, २०२४च्या लोकसभा निवडणुकीत मतदानाची टक्केवारी ५६.२५ टक्के इतकी होती. या निवडणुकीत जास्तीत जास्त मतदारांनी मतदान करावे, यासाठी प्रशासनाकडून विविध प्रकारे जनजागृती करण्यात येत आहे.
या पार्श्वभूमीवर नागरिकांनी या जनजागृतीपर आवाहनास प्रतिसाद द्यावा व उत्सव निवडणुकीचा अभिमान देशाचा, अभियान यशस्वी करावे, असे आवाहन कोपरी- पाचपाखाडी विधानसभा क्षेत्राचे निवडणूक निर्णय अधिकारी सर्जेराव म्हस्के पाटील यांनी केले आहे.
लोकशाहीच्या बळकटीसाठी मतदान कराच...
लोकशाहीने प्रत्येक नागरिकाला मतदानाचा अधिकार दिला आहे. या अधिकाराचा वापर प्रत्येकाने करून लोकशाही बळकट करण्यासाठी हातभार लावला पाहिजे. स्वत: मतदान कराच, तसेच आपल्या घरातील सदस्य, शेजारी, नातेवाईक, मित्रपरिवार यांना सुद्धा मतदान करण्यासाठी प्रवृत्त करण्याचा संदेश स्वीप अंतर्गत मतदार जनजागृतीच्या माध्यमातून देण्यात आला. यावेळी मतदान करण्याची शपथ सर्वांना देण्यात आली. नवीन मतदार नोंदणी करण्यासाठी अर्जाचे वाटप करून नवमतदारांना सुद्धा मतदान करण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले.