पातळीवरील बांधवांना न्याय मिळावा म्हणून सुमन सावळ यांनी संघर्ष केला. गोरेगावकरांची हक्काची ताई म्हणून लौकिक मिळवला. त्यांच्या जीवनाचा मागोवा या लेखात घेतला आहे.
७० चे दशक होते. अवघ्या पंधराव्या वर्षी लग्न होऊन ती सासरी आली. मात्र, काही महिन्यातच तिच्या पतीची नोकरी गेली. तसेच, सासरच्या राहत्या घरावरही आपत्ती आली. त्यामुळे संपूर्ण कुटुंबच रस्त्यावर आले. सगळी संकट एकत्र आली. मग त्या घरच्या सुनेने सगळ्या प्रस्थापितांना याबाबत विचारणा केली असता, सगळ्यांनीच हात वर केले. एकाने सांगितले ’मंत्रालयात जा, गलिच्छ वस्ती सुधारणारे काही तरी मदत करतील.’ ती तिथे गेली. पण, कुणी दाद देईना. रस्त्यावर किती दिवस राहणार? मग ती मंत्रालयाच्या परिसरात उपोषणाला बसली. तिची दखल घेऊन, संबंधित व्यक्ती शांता पाटकर तिच्या भेटीला आल्या. तिला म्हणाल्या ’गोरेगावमध्ये कमल देसाई, मृणाल गोरे आमच्या नेत्या आहेत. त्या मदत करतील मी सांगते त्यांना.’ पण, कुणीही त्यावेळी त्या मुलीला मदत केली नाही. त्यामुळे ती मुलगी पुन्हा शांता पाटकर यांना भेटली. त्या म्हणाल्या ’तुला घरच हवे ना, मग अंगावरचे दागिने विक. मंगळसूत्र आहे ते कधी कामाला येईल.’ हे ऐकून त्या पंधरा-सोळा वर्षाच्या मुलीला वाटले, ’आपल्यासाठी कुणी काही करू शकत नाही. आपली लढाई आपल्यालाच लढली पाहिजे.’ तिने मंगळसूत्र विकले आणि एक झोपडी खरेदी केली.आज तीच मुलगी गोरेगावच्या ’हेंरब छाया’ या सोसायटीची चेअरमन आहे. पश्चिम मुंबईतील अनेक सेवाभावी संघटनावर ती कार्यरत आहे. गोरेगाव आणि परिसरातील प्रत्येक पिडीतांना, शोषितांना आजही वाटते की, आपल्या हक्काची लढाई हीच लढू शकते. गरीबांना, दुर्बलांना आपली हक्काची ताई वाटणारी ती मातृशक्ती आहे, सुमन सावळ.
७० वर्षाच्या सुमन सावळ यांचे संपूर्ण आयुष्य संघर्षात आणि दुसर्यांच्या हक्कासाठी लढण्यात गेले. गोरेगावच्या झोपडपट्टीतील सर्वार्थाने मागास असलेल्या आयाबायांना, दुर्बलांना न्याय कसा मिळवता येईल यासाठी सुमन यांनी अविरत संघर्ष केला. त्यावेळी गोरेगाव परिसरात वस्तीगुंडांचा दबदबा. मुली, महिलांची छेड काढणे, घरात घुसणे, जबरदस्तीने घर खाली करायला लावणे, एक ना अनेक घटना वस्तीत घडत होत्या. त्या गुन्हेगारांविरोधात उभे राहण्याची हिंमत वस्तीमध्ये कोणाचीच नव्हती. पण सुमन आपल्याला न्याय मिळवून देतील, या विचाराने वस्तीतील पिडीत लोक सुमन यांच्याकडे मदत मागण्यासाठी येऊ लागले. सुमन यांचीही आर्थिकदृष्ट्या गरीबीच. वस्तीबाहेरील जगाशीही परिचय नाहीच.आपले घर भले आणि बालवाडीची शिक्षिका म्हणून नोकरी भली. त्यातच अर्थाजनासाठी १४६कोंबड्याही पाळल्या होत्या. या सगळ्या व्यापात त्यांचे अपूर्ण राहिलेले शिक्षणही पूर्ण करत होत्या. अशा काळात त्यांच्याकडे कुणी ना कुणी अत्याचार झाला, सहकार्य करा असे सांगत यायचे. त्या सगळ्यांचे म्हणणे ऐकून त्या अगदी रात्री थकून भागून घरी आल्यावर, जेवत असताना ताट बाजूला सारून त्या पिडीतांच्या मदतीला पुढे धावल्या. त्यांच्या कामाचा वेग किती होता? तर त्यावेळी सुमन यांनी लोकांना न्याय मिळावा म्हणून, २००च्यावर तक्रारी पोलीस स्टेशनमध्ये दाखल केल्या होत्या. तोपर्यत तिथे अत्याचाराच्या विरोधात आवाज उठवायची कुणाचीच हिंमत नव्हती. गोरेगावच्या झोपडपट्टयांमध्ये राहणारे लोक कुणामुळे इतके हिंमत दाखवायला लागले, याचा मागोवा त्या प्रस्थापित गुन्हेगारांनी घेतला. त्यांनी सुमन यांना जिवे मारण्याची अनेकदा धमकी दिली. घरावर हल्लाही केला. मात्र, सुमन म्हणाल्या, “चार दिवस शेळीसारख जगण्यापेक्षा, एक दिवस वाघ होऊन मरेन. ”
शौर्य आणि समाजशीलता ही उसनी मागून कधीच मिळत नसते, तर ती एखाद्याकडे उपजतच असते. ते तसे शौर्य आणि समाजशीलता सुमन यांच्याकडे उपजतच होती.
सुमन काशिनाथ सावळ या पूर्वाश्रमीच्या शोभना राजाराम पावसकर. पावसकर कुटुंब मूळचे कुडाळचे. पण कामानिमित्त मुंबईत गोरेगावला स्थाईक झालेले. या दोघांची कन्या शोभना उर्फ सुमन. राजाराम हे मिलमध्ये काम करायचे. अर्थार्जन पोटापुरतीही नव्हते. त्यामुळे घरची कायम गरीबी. कुणाचे तरी वापरलेले कपडे घालून , सुमन यांनी बालपण साजरे केले. चप्पल काय असते हे सुद्धा त्यांना माहिती नव्हते. त्यावेळी सुमन आईकडे कधी तरी हट्ट करायच्या हे खेळणे दे, ते कपडे घे म्हणून. त्यावेळी आई म्हणायची बाळा ’आजचा दिवस उद्या राहणार नाही. तू आयुष्यात असे काही तरी कर की, तुझ्यासोबतच इतर गरीब घरच्या लेकींना पण तुझा आसरा वाटेल.’
असो त्यावेळी परिस्थितीमुळे वयाच्या पंधराव्या वर्षीच सुमन यांचा विवाह, काशिनाथ सावळ यांच्याशी झाला. मात्र, आधीच सांगितल्याप्रमाणे, तिथे संकटांची मालिका सुरू झाली. सुमन यांनी हार मानली नाही. परिस्थितीवर मात करण्यासाठी त्यांनी, शिक्षण पूर्ण केले. १८-१८ तास कष्ट केले. स्वत:च्या कुटुंबाची परिस्थिती पालटवत असतानाच संपूर्ण वस्तीला भयमुक्त, गुन्हेगारीमुक्त करण्याचे व्रत त्यांनी आजन्म पाळले. प्रचंड संघर्ष केला. गोरेगावच्या सामाजिक विकासामध्ये सुमन सावळ यांचे मोलाचे योगदान आहे. त्या म्हणतात,“गांजलेल्या दुर्बलांच्या उत्थानासाठी मला खारीचा वाटा उचलता आला, हे माझे भाग्य आहे. आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत मी समाजबांधवांसाठी कार्य करत राहणार आहे.” गोरेगावकरांची ताई म्हणून निस्वार्थीपणे काम करणार्या, सुमन सावळ यांची समाजशीलता ही समाजासाठी दिपस्तंभ आहे नक्की.