रबर-काजू लागवडीमुळे आकसला आंबोलीतील बेडकांचा आकार; जंगल तोडीचा उभयचरांवर परिणाम

जंगल तोडून केलेल्या लागवडीचा उभयचरांवर गंभीर परिणाम; "नेचर कॉन्झर्वेशन फाऊंडेशन"चे संशोधन

    14-Oct-2024   
Total Views |
amboli bush frog


मुंबई (अक्षय मांडवकर) -
पश्चिम घाटात प्रदेशनिष्ठ असलेल्या 'आंबोली बूश फ्राॅग' आणि 'बाॅम्बे बूश फ्राॅग' नामक बेडकाच्या प्रजातींवर रबर आणि काजू लागवडीचा विपरीत परिणाम होत असल्याचे संशोधन प्रसिद्ध झाले आहे (amboli bush frog). जंगलाच्या तुलनेत रबर लागवडीमध्ये आढळणाऱ्या 'आंबोली बूश फ्राॅग'चा आकार आकसल्याचे निरीक्षण संशोधकांनी नोंदवले आहे (amboli bush frog). त्यामुळे तळकोकणात मोठ्या प्रमाणावर सुरू असणाऱ्या रबर आणि काजू लागवडीचा गंभीर परिणाम उभयचरांसारख्या दुर्लक्षित जीवांवर होत असल्याचे सिद्ध झाले आहे. (amboli bush frog)
 
 
तळकोकणात खासगी मालकीची जंगलं कापून त्यावर रबर आणि काजूच्या बागा तयार होत आहेत. अशा बदललेल्या अधिवासाचा परिणाम बेडकांवर कशा पद्धतीने पडतो, यासंबंधीचा अभ्यास 'नेचर काॅन्झर्वेशन फाऊंडेशन'च्या संशोधकांनी केला. संशोधक हिमांशू लाड, निनाद गोसावी, जिथीन विजयन आणि डाॅ. रोहित नानिवडेकर यांनी केलेल्या या संशोधनाचे वृत्त नुकतेच लंडनच्या 'झूलाॅजिकल सोसायटी'च्या 'अॅनिमल काॅन्झर्वेशन' नामक संशोधन पत्रिकेत प्रसिद्ध झाले आहे. आंबोलीतून शोधलेल्या 'आंबोली बूश फ्राॅग' आणि 'बाॅम्बे बूश फ्राॅग' बेडकांना केंद्रस्थानी ठेवून संशोधकांनी हा अभ्यास केला. यामध्ये संशोधकांना जंगलाच्या तुलनेत काजू बागायतीमध्ये 'आंबोली बूश फ्राॅग' बेडकांची संख्या खूपच कमी असल्याचे निदर्शनास आले. त्यातही किशोरवयीन बेडकांची संख्या कमी नोंदवल्याने बेडकांच्या प्रजननासाठी काजू बागायती योग्य अधिवास नसल्याचे समोर आले आहे.
 
 
amboli bush frog
 

रबर लागवड क्षेत्रातील 'आंबोली बूश फ्राॅग'चा आकार हा त्याच्या जंगलातील आकाराच्या तुलनेत पाच टक्क्यांनी आकसल्याची नोंद संशोधकांनी केली आहे. जंगलात या बेडकांचा आकार २७.८ मिलीमीटर नोंदविण्यात आला असून रबर लागवडीमध्ये हा आकार २६.५ मिलीमीटर नोंदविण्यात आला आहे. बेडकासारख्या आकाराने जन्मत: छोट्या असणाऱ्या जीवांचा आकार पाच टक्क्यांनी आकसणे, ही गंभीर बाब आबे. रबर लागवड क्षेत्रात या बेडकांचे नर आणि मादी सापडण्याचे गुणोत्तर देखील समसमान प्रमाणात नाही आहे. रबर लागवड क्षेत्रात १०० नर बेडकांमागे केवळ तीन प्रौढ मादी असल्याची नोंद आम्ही केली असून ही बाब या बेडकांच्या प्रजननाच्या दृष्टीने अत्यंत नकारात्मक असल्याची माहिती संशोधक हिमांशू लाड यांनी दै. 'मुंबई तरुण भारत'शी बोलताना दिली. या संशोधन कार्याला 'आॅन द एज काॅन्झर्वेशन'ने आर्थिक सहाय्य दिले असून प्रवीण देसाई, पराग रांगणेकर यांच्यासारख्या स्थानिकांनी या संशोधन कार्यासाठी मदत केली आहे.
 
 
सखोल अभ्यासाची गरज
'आययूसीएन'च्या लाल यादीमध्ये 'आंबोली बूश फ्राॅग'च्या श्रेणीत बदल करण्यात आला असून त्याला चिंता नसलेल्या (लिस्ट कसर्न) श्रेणीत स्थान देण्यात आले आहे. मात्र, आम्ही केलेला अभ्यास या प्रजातीच्या भविष्यातील अस्तित्वाच्या दृष्टीने चिंता दर्शवणारा आहे. त्यामुळे या प्रजातींचे पुन्हा एकदा मूल्यांकन करण्याची गरज आहे. तसेच रबर-काजू लागवडीच्या क्षेत्रात या प्रजातीचे असणारे असमान लिंग गुणोत्तर आणि आकारात झालेल्या बदलांची कारणे शोधण्यासाठी सखोल अभ्यासाची गरज आहे. - डाॅ. रोहित नानिवडेकर,वरिष्ठ संशोधक, नेचर काॅन्झर्वेशन फाऊंडेशन
 
 
 
 

अक्षय मांडवकर

'दै. मुंबई तरुण भारत'मध्ये 'विशेष प्रतिनिधी' (पर्यावरण/ वन्यजीव) म्हणून कार्यरत. मुंबई विद्यापीठातून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण. गेल्या तीन वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत. पर्यावरण आणि वन्यजीव क्षेत्राची आवड असल्याने त्यासंबंधीच्या वृत्तांकनामध्ये विशेष रस. महाराष्ट्रातील महत्वाच्या वन्यजीव संवर्धन आणि संशोधन कार्यात सहभाग. भारतीय शास्त्रीय नृत्यशैलीतील 'कथ्थक' नृत्यात विशेष प्राविण्य. देशातील महत्वाच्या शास्त्रीय नृत्य महोत्सव आणि नृत्यविषयक टेलिव्हिजन मालिकांमध्ये सादरीकरण.