रामायण, महाभारत यांचे मूर्तिमंत स्वरूप म्हणजे 'शिवचरित्र'

स्वामी गोविंददेव गिरी महाराज यांचे प्रतिपादन

    14-Oct-2024
Total Views |

Swami Govinddev Giri Maharaj

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : (Goviddev Giri Maharaj News)
"आज भारतासमोर अनेक ज्वलंत प्रश्न आहेत, त्या सर्वांवर एकमात्र उत्तर म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. त्यांचे प्रेरणादायी जीवनचरित्र नव्या पिढीसमोर ठेवणे अतिशय आवश्यक आहे. रामायण, महाभारत हे दोन्ही ग्रंथ एकत्र केले तर त्याचे मूर्तिमंत स्वरूप म्हणजे शिवचरित्र होय. त्यामुळेच छत्रपती शिवाजी महाराज हे राष्ट्राचे दीपस्तंभ आहेत.", असे प्रतिपादन प्रख्यात प्रवचनकार व श्रीराम मंदिर तीर्थक्षेत्र न्यासचे कोषाध्यक्ष स्वामी गोविंददेव गिरी महाराज यांनी केले.

हे वाचलंत का? : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाबाबत हे काय म्हणाले राज ठाकरे?

छत्रपती सेवा प्रतिष्ठान नागपूर-पुणे तर्फे आयोजित ४२ वा जिजामाता विद्वत् गौरव पुरस्कार सोहळा नुकताच नागपुर येथे संपन्न झाला. यावेळी प्रज्ञाचक्षु विद्याभूषण मुकुंदकाका जाटदेवळेकर यांच्या हस्ते स्वामी गोविंददेव गिरी महाराज यांना पुरस्कार प्रदान करण्यात आला. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान छत्रपती सेवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष अजेय देशमुख यांनी भूषविले. धर्मभास्कर सद्गुरुदास महाराज प्रमुख अतिथी म्हणून व्यासपीठावर उपस्थित होते.

उपस्थितांना संबोधत स्वामी गोविंददेव गिरी महाराज म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराज नसते तर आपण आपली संस्कृती टिकवून ठेवू शकलो नसतो. त्यामुळेच राष्ट्राला सामर्थ्य प्रदान करणारे शिवचरित्र संपूर्ण भारतीयांसमोर येणे काळाची गरज आहे. माता जिजाऊंमुळेच आपली संस्कृती, धर्म टिकून राहिला. आता जिजाऊची शिकवण आपल्या अंगी धारण करणे गरजेचे आहे. शिवाजी महाराजांच्या प्रेरणा स्वतः जिजाऊच होत्या. दास्यत्वाचा काळोख छत्रपतींनी दूर केला. दुर्दैवाने काहींना छत्रपती शिवराय कळले नाहीत.