वैचारिक प्रदूषण पसरवणाऱ्या कारस्थानांपासून समाजाचे रक्षण हीच काळाची गरज

सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत यांचे प्रतिपादन

    12-Oct-2024
Total Views |

Dr. Mohanji Bhagwat

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : (Mohanji Bhagwat Nagpur Speech) 
"आपले राष्ट्रीय जीवन सांस्कृतिक एकात्मता आणि श्रेष्ठ सभ्यतेच्या भक्कम पायावर उभे आहे. त्यास हानी पोहोचवण्याचे किंवा नष्ट करण्याचे दुष्ट प्रयत्न अगोदरच थांबवणे आवश्यक आहे. त्यासाठी जागरूक समाजालाच प्रयत्न करावे लागतील. याकरीता आपल्या सांस्कृतिक जीवनदर्शन आणि राज्यघटनेने दिलेल्या मार्गावर आधारित लोकतांत्रिक योजना बनवायला हवी. एक सशक्त विमर्श उभा करून वैचारिक आणि सांस्कृतिक प्रदूषण पसरवणाऱ्या कारस्थानांपासून समाजाचे रक्षण करणे, ही काळाची गरज आहे.", असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत यांनी केले.
रेशिमबाग, नागपुर येथे शनिवार, दि. १२ ऑक्टोबर रोजी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा विजयादशमी उत्सव संपन्न झाला. यंदाच्या विजयादशमीला संघाने आपल्या शताब्दी वर्षात सीमोल्लंघन केले असून उपस्थित सर्वांकरीता हा आनंदाचा क्षण होता. उत्सवाला प्रमुख अतिथी म्हणून इस्त्रोचे माजी अध्यक्ष पद्मभूषण डॉ. के. राधाकृष्णन यांची विशेष उपस्थिती होती.

समाजमाध्यमांवरून पसरवल्या जाणाऱ्या विकृत प्रचाराबाबत सरसंघचालक म्हणाले, विविध यंत्रणा आणि संस्थांकडून पसरवल्या जाणारा विकृत प्रचार आणि मूल्ये ही भारतातील नवीन पिढीच्या विचारांवर, शब्दांवर आणि कृतींवर वाईट परिणाम करत आहेत. आपल्या स्वतःच्या घरात, कुटुंबात आणि समाजात जाहिराती आणि विकृत दृक-श्राव्य सामग्रीवर कायदेशीर नियंत्रणाची नितांत गरज आहे. त्यासोबतच आज तरुण पिढीमध्ये अमली पदार्थाची सवय वणव्यासारखी पसरत चालली आहे, ती समाजालाही आतून पोकळ करत आहे. त्यामुळे चांगुलपणाकडे नेणाऱ्या मूल्यांचे पुनरुज्जीवन करणे महत्त्वाचे आहे.


Nagpur Vijayadashmi

समाज सुदृढ आणि सशक्त होण्यासाठी सामाजिक समरसता, परस्पर सद्भाव आणि समंजसपणा यांचे महत्त्व सरसंघचालकांनी उपस्थितांसमोर अधोरेखित केले. ते म्हणाले, समाजातील सर्व वर्ग आणि स्तरातील व्यक्ती आणि कुटुंबांमध्ये मैत्री असली पाहिजे. परिस्थितीमुळे समाजातील विविध घटकांच्या गरजा सर्व घटकांनी समजून घेतल्या पाहिजेत. समाजात फूट पाडण्याचे कोणतेही कुचक्र यशस्वी होणार नाही, यावर विचार केला पाहिजे. आपल्यातील दुर्बल जाती किंवा वर्गाच्या कल्याणासाठी आपण सर्व मिळून काय करू शकतो? असे विचार व कृती नित्य घडत राहिल्यास समाज सुदृढ होईल आणि समरसतेचे वातावरणही निर्माण होईल.

आर.जी.कार हॉस्पिटलमधील प्रकरणावर भाष्य
'मातृवत् परदारेषु' मानल्या जाणाऱ्या आपल्या देशात मातृशक्तीला अनेक ठिकाणी बलात्कारासारख्या घटनांना सामोरे जावे लागत आहे. . आर.जी.कार हॉस्पिटलमधील घटनेच्या निषेधार्थ संपूर्ण समाज वैद्यकीय क्षेत्रातील बांधवांच्या पाठीशी उभा राहिला. त्वरित आणि संवेदनशील कारवाईची मागणी त्यांनी केली. मात्र असे गुन्हे होत असताना येथील राजकीय गठबंधन अपराधींना पाठीशी घालण्याचा प्रयत्न करताना दिसले. त्यामुळे आता कुटुंब, समाज आणि प्रसारमाध्यमांद्वारे आपली सांस्कृतिक मूल्ये रुजवण्याची व्यवस्था पुन्हा जागृत करायला हवी.

जगभरातील हिंदूंच्या मदतीची आवश्यकता
भारताची प्रतिमा मलीन करण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न भारतात आणि बाहेरील जगात सध्या होत आहे. भारतापासून आपल्याला धोका आहे, त्यामुळे पाकिस्तानला आपल्यासोबत घ्यायला हवं कारण तो आपला प्रामाणिक मित्र आहे. बांगलादेश आणि पाकिस्तान एकत्र येऊन भारताला रोखू शकतो, अशा प्रकारच्या चर्चा बांगलादेशात सुरु आहेत. असे फेक नऱ्हेटीव सेट करण्याचा प्रकार भारतीतही काहीजण करू पाहत आहेत. बांगलादेशातील अत्याचारांच्या निषेधार्थ तेथील हिंदू समाज संघटित होऊन बचावासाठी घराबाहेर पडला खरा परंतु जोपर्यंत हा अत्याचारी जिहादी स्वभाव तेथे आहे तोपर्यंत तेथील हिंदूंसह सर्व अल्पसंख्याक समाजाच्या डोक्यावर धोक्याची तलवार लटकत राहणार आहे. त्यामुळे त्या देशातून होणारी बेकायदेशीर घुसखोरी हा लोकसंख्येच्या दृष्टीने चिंतेचा विषय बनला आहे. बांगलादेशात अल्पसंख्याक बनलेल्या हिंदू समाजाला भारत सरकार आणि जगभरातील हिंदूंच्या मदतीची आवश्यकता आहे.


Shastrapoojan

समाजानेही सजग, सतर्क राहण्याची गरज
गणेशोत्सवादरम्यान गणपती विसर्जनाच्या मिरवणुकांवरील दगडफेकीच्या घटनांमुळे समाजात तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली होती. अशा घटना घडू न देणे, घडल्यास त्यावर ताबडतोब नियंत्रण आणणे, दंगेखोरांना तत्काळ शिक्षा करणे हे मुख्यतः प्रशासनाचे काम आहे. परंतु ते पोहोचेपर्यंत समाजालाच आपल्या जीविताचे व मालमत्तेचे रक्षण करावे लागते. त्यामुळे समाजानेही सजग, सतर्क राहण्याची आणि अशा वाईट प्रवृत्तींना पाठीशी घालणाऱ्यांना ओळखण्याची गरज निर्माण झाली आहे.

जम्मू-काश्मीरमधील निवडणुका शांततेत
भारत देश बदलतो आहे. जगभरात भारताची प्रतिष्ठा वाढली आहे. भारतात होणाऱ्या बदलांमुळे समाजही बदलच चालला आहे. याचा प्रत्यय काश्मीर मधील निवडणुकीत दिसला. बदललेल्या समाजामुळे जम्मू आणि काश्मीरमधील निवडणुका शांततेत पार पडल्या. मात्र भारताच्या वाढीबरोबर आपल्या स्वार्थाची दुकाने बंद होतील, या भितीपोटी भारतातही बांगलादेश सारखी परिस्थिती असावी, असे उद्योग एकीकडे चालू आहेत.

स्मरण अहिल्यादेवी होळकर, दयानंद सरस्वती आणि भगवान बिरसा मुंडांचे...
अत्यंत विपरीत परिस्थिती पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी आपलं राज्य चालवलं. त्यातून रणनीतीचे कौशल्य त्यांनी दाखवून दिलं. संस्कृती संरक्षण, धर्म संरक्षण स्वतः निःस्पृह राहून एक आदर्श त्यांनी समाजासमोर तयार केला होता. त्यामुळे अशा एका उत्कृष्ट राज्यकर्त्या अहिल्यादेवी होळकर यांचे स्मरण प्रत्येकाने कायम करायला हवे. दीर्घकाळाच्या गुलामीनंतर भारताचे जेव्हा पुनरुत्थान सुरु झाले, त्यामागे ज्या विशिष्ट शक्ती होत्या त्यापैकी एक स्वामी दयानंद सरस्वती होते. खरा धर्म म्हणजे नेमकं काय याबाबत लोकांमध्ये जाऊन त्यांनी जनजागृती केली. त्यांची प्रेरणा घेऊन भारत उत्थान करतो आहे. त्यासोबतच भगवान बिरसा मुंडा यांच्या १५० व्या जयंतीला १५ नोव्हेंबरपासून सुरुवात होणार असून ही शताब्दी आपल्याला भगवान बिरसा मुंडा यांनी आदिवासींना गुलामगिरीतून आणि शोषणातून मुक्त करण्यासाठी, परकीय वर्चस्वातून मुक्त करण्यासाठी, अस्तित्व आणि अस्मितेचे रक्षण करण्यासाठी आणि स्वधर्माचे रक्षण करण्यासाठी दिलेल्या उलगुलानच्या प्रेरणेची आठवण करून देईल.

अराजकतेचे व्याकरण...
आज भारतात जात, भाषा, प्रदेश इत्यादी छोट्या वैशिष्ट्यांच्या आधारे सामान्य समाजाला वेगळे करून संघर्ष निर्माण करण्याचा प्रयत्न सुरु आहे. देशात विनाकारण कट्टरतावादाला चिथावणी देणाऱ्या घटनांमध्येही अचानक वाढ होताना दिसते आहे. समाजातील एखाद्या विशिष्ट वर्गावर हल्ला करणे, विनाकारण हिंसाचार करणे, भीती निर्माण करण्याचा प्रयत्न करणे, ही गुंडगिरी आहे. आदरणीय डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी अशा वागण्याला 'अराजकतेचे व्याकरण' असे म्हटले आहे.

विषारी झाडांऐवजी गुणकारी झाडे लावा.
आपला परिसर हिरवागार करण्यासाठी वृक्षारोपण करा. त्यामध्ये परंपरागत देशी वृक्षांची लागवड करा. यापूर्वी अनेक ठिकाणी फॅशन म्हणून विदेशातून आलेल्या झाडांची लागवड करण्यात आली. त्यांना काढून टाकण्याचे आदेश सरकारने दिले आहेत. अशा विषारी झाडांऐवजी कडुनिंबासारख्या गुणकारी झाडांची लागवड करा. अशाने पर्यावरणाची हानी कमी होण्यात मदत होईल.