नुकताच मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा प्राप्त झाल्याची घोषणा करण्यात आली. आहे. त्यानिमित्ताने फर्ग्युसन महाविद्यालयातील मराठी भाषेचे प्राध्यापक आणि ‘मराठी अभ्यास परिषदपत्रिका भाषा आणि जीवन’चे संपादक प्रा. आनंद काटीकर यांच्याशी मराठी भाषा, अभिजात दर्जा आणि शिक्षण क्षेत्र या विषयांवर साधलेला हा संवाद..
मराठीला अभिजात भाषेचा दर्जा प्राप्त झाला आहे. पण, असा दर्जा एखाद्या भाषेला मिळणे का महत्त्वाचे असते?
अभिजात भाषेचा दर्जा मिळण्यासाठी एखादी भाषा जुनी असावी, हा त्याचा एक महत्त्वाचा निकष. अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यामुळे भाषेसाठी भरपूर निधी केंद्र सरकारकडून मिळणार आहे, म्हणून लोकांना आनंद झाला आहे. पण, नेमके किती पैसे मिळणार, ते कसे मिळणार आहेत आणि का मिळणार आहेत, हे सुद्धा लोकांना कळणे आवश्यक आहे.
मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळावा म्हणून, २०१२ सालापासून प्रयत्न सुरू होते आणि काही दिवसांपूर्वीच हा दर्जा केंद्र सरकारतर्फे बहाल करण्यात आल्याची घोषणाही करण्यात आली. तेव्हा मराठी भाषेचा हा अभिजात दर्जापर्यंतचा प्रवास नेमका कसा होता?
२००४ साली तामिळ भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला. त्यावेळी केंद्र सरकारला द्रमुक पक्षाचा पाठिंबा होता. त्यांना तामिळ भाषेसाठी काहीतरी हवे होते म्हणून, केंद्र सरकारकडून त्यांनी हा दर्जा मिळवला. राजकीय कारणास्तव तामिळ भाषेला हा दर्जा मिळाला. त्यानंतर २००५ साली संस्कृतला हा दर्जा मिळाला. मग कन्नड, तेलुगू, मल्याळम आणि ओडिया या भाषा जागा झाल्या. त्यांनीही तसे प्रस्ताव केंद्र सरकारकडे सादर केले आणि त्यांनाही अभिजात भाषेचा दर्जा मिळाला. असेच, आपण २०११ साली जागे झालो. त्यावेळी महाराष्ट्र शासनाने एक समिती स्थापन केली आणि त्या समितीने मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा, असा प्रस्ताव सादर केला. पण, अभिजात भाषेचा दर्जा मिळवण्यासाठीच्या निकषांपैकी जो निकष होता की, ‘भाषेचे पूर्वीचे रूप आणि आताचे रूप सारखे असावे.’ त्यामुळे मराठी भाषेला हा दर्जा मिळवण्यासाठी अडचण येत होती. ‘गाथा सप्तशती’ हा इसवी सन सातव्या शतकातला हाल राजाच्या काळातला ग्रंथ आहे. त्या ग्रंथाची जी भाषा आहे, जिला आपण ‘महाराष्ट्री प्राकृत’ म्हणतो, ती आजच्या आपल्या मराठी भाषेचे पूर्वरूप आहे, असा आपण दावा केला. या दाव्याला काही जणांनी विरोध केला. कारण, त्या प्राकृत भाषेला जरी आपण मराठीचे पूर्वरूप म्हणत असलो, तरीही ती समजून घेण्यासाठी आपल्याला संस्कृत भाषेचा आधार घ्यावा लागतो. त्यामुळे मराठी भाषा या निकषात बसत नव्हती. पण, केंद्र सरकारने या निकषात बदल करून निकषात ‘भाषेचे पूर्वीचे रूप आणि आताचे रूप सारखे असावेच असे नाही’ असा बदल केला. त्यामुळे भाषेला हा दर्जा मिळणे सोपे गेले. त्यासोबत यासाठी स्थापन केल्या गेलेल्या समितीने मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळवून देण्यासाठी भरपूर अभ्यास केला, संशोधन केले, पुरावे गोळा केले. रंगनाथ पठारे, हरी नरके, भांडारकर संस्था या सगळ्यांचे यात मोठे योगदान दिले, ते महत्त्वाचे होतेच. पण, चौथ्या निकषात बदल केल्यामुळे हा दर्जा मिळणे शक्य झाले, हे आपल्याला लक्षात घ्यावे
मराठी भाषेला ‘अभिजात दर्जा’ मिळाला आहे. त्यामुळे काय बदल होतील?
हा दर्जा मिळाल्यामुळे सर्वप्रथम मराठीच्या ज्या सगळ्या बोली भाषा आहेत, त्यांचे सर्वेक्षण करण्यासाठी आपल्याला प्रस्ताव सादर करता येईल आणि त्याला निधी मंजूर होईल. पुण्यातील डेक्कन कॉलेजने ‘राज्य मराठी विकास संस्थे’च्या सहकार्याने महाराष्ट्रातील सगळ्या जिल्ह्यांतील प्रमुख दोन-तीन ठिकाणांच्या बोलींचे खूप चांगले सर्वेक्षण केले आहे. आता मराठी भाषिक लोकांना डेक्कन महाविद्यालयाच्या नेतृत्वाखाली असेच महाराष्ट्राच्या विविध भागातील आणि महाराष्ट्राबाहेर सुद्धा बोलल्या जाणार्या विविध बोलींचे संशोधन करून त्यांच्या संवर्धनासाठी प्रयत्न करता येईल. हा एक मराठी भाषेला मिळालेल्या अभिजात दर्जाचा महत्त्वाचा फायदा होऊ शकतो. दुसरे म्हणजे, जुन्या मराठी भाषेच्या ज्या खुणा आहेत, मग तो आक्षीचा शिलालेख असेल, श्रवणबेळगोळचा शिलालेख असेल किंवा नाणेघाटात ठिकठिकाणी असलेले शिलालेख असतील, त्यांच्या प्रतिकृती तयार करणे, त्यांचे संग्रहालय तयार करणे असे त्यांच्या संवर्धनासाठी प्रयत्न आपल्याला करता येतील. महाराष्ट्राचा इतिहास ज्या ज्या ठिकाणी लिहिला गेला आहे, त्या त्या ठिकाणच्या शिलालेखांचे, ताम्रपटांचे संकलन आणि संवर्धन आपल्याला करता येईल. काही लोकांच्या मते, आता जो निधी आपल्याला मिळणार आहे त्यातून, मराठी शाळा सक्षम करणे यांसारख्या गोष्टी आपल्याला करता येतील. पण, अशा कोणत्याही गोष्टींसाठी निधी मिळणार नाही. कारण, जी जुनी मराठी तिच्या संवर्धनासाठीच आपल्याला हा निधी मिळणार आहे, हे सगळ्यांनी लक्षात घेतले पाहिजे. जुनी मराठी भाषा शिकण्यासाठी विद्यार्थ्यांना तयार करणे, संशोधनाला चालना देणे आणि या सगळ्यातून मराठी भाषा आणि महाराष्ट्र कसा कसा आकार घेत गेला, हे सगळ्यांपर्यंत पोहोचविणे, या कार्यासाठी आपल्याला या मिळालेल्या अभिजात दर्जाचा लाभ होणार आहे.
हे सगळे प्रयत्न जर जुन्या मराठी भाषेसाठी केले जाणार असतील, तर ‘जुनी मराठी’ आणि ‘आधुनिक मराठी’ असा वाद येत्या काळात निर्माण होईल, असे आपल्याला वाटते का?
नाही, आपल्या घरातील आजी-आजोबांचा जसा आपल्याला त्रास होत नाही, तसेच आताच्या काळात मराठी शिकणार्या आधुनिक पिढीला या जुन्या मराठीचा त्रास होणार नाही. उलट जे आताच्या काळात मराठी शिकत आहेत, त्यांना आपल्या भाषेचे आधीचे रूप असे होते, ती अशी बोलली जायची, हे जाणून घेऊन अधिक आनंद होईल. आजचे जे भाषिक प्रश्न आहेत, ते सोडवण्यासाठी अभिजात भाषेचा दर्जा लाभ ठरणार नाही. परंतु, यामुळे भाषाविषयक जागृती होईल, आपल्यालाच आपला चांगला भूतकाळ कळेल, त्या भूतकाळाचा अधिक अभ्यास करण्यासाठी संधी आणि रोजगार उपलब्ध होऊ शकतात. जुनी मराठी अधिक सोपी करून कल्पकतेने ती आपल्याला अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचवता येऊ शकते.
मराठीला अभिजात भाषेचा दर्जा तर मिळाला. पण, व्यवहारात मागे पडत चाललेली मराठी भाषा पुनरुज्जीवित करण्यासाठी सगळ्यात पहिली आणि महत्त्वाची गोष्ट कोणती गोष्ट केली पाहिजे?
माझ्या मते, सगळ्यात पहिली गोष्ट जी केली गेली पाहिजे, ती म्हणजे प्रत्येक मराठी माणसाने ‘मी मराठीतच बोलणार’ हे ठरवले पाहिजे. मराठी माणूसच मराठी बोलत नाही, ही सगळ्यात मोठी खंत आहे. त्यामुळे सगळीकडे मराठी भाषा बोलली गेली पाहिजे. दुकानांमध्ये, व्यवसायांमध्ये मराठी भाषा अनिवार्य केली पाहिजे. त्यामुळे अधिकाधिक लोक मराठी भाषा शिकतील. बाहेरून महाराष्ट्रात आलेल्या लोकांनी सुद्धा मराठी शिकली पाहिजे आणि ती बोलली पाहिजे. त्यासाठी ‘मी मराठीतच बोलणार’ असा आपण आग्रह धरला पाहिजे.
तुम्ही एक भाषा अभ्यासक आहात आणि सोबतच मराठी भाषेचे प्राध्यापक सुद्धा आहात. फर्ग्युसनसारख्या नामांकित महाविद्यालायत तुम्ही अध्यापन करत आहात, तर सद्यस्थितीत शिक्षण क्षेत्रात मराठी भाषेला विद्यार्थ्यांच्या मिळणार्या प्रतिसादाविषयी काय सांगाल?
प्रत्येक ठिकाणी आपल्या आवडीनिवडीनुसार शिक्षण घेणारे लोक असतातच. पण, आताच्या काळात आपल्याला काय आवडतं, याचा विचार करताना त्यात रोजगाराच्या संधी सुद्धा आहेत का, याचा विचार करावा लागतो. त्यामुळे मराठीची आवड असून सुद्धा संधींची कमतरता असल्यामुळे त्यांना ते शिक्षण घेता येत नाही. पण, अभिजात भाषेच्या दर्जामुळे तशा संधी जर निर्माण झाल्या, तर विद्यार्थी निश्चितच त्याचा लाभ घेतील.
मराठी भाषेला मिळालेल्या अभिजात दर्जाचा शिक्षण क्षेत्राला कसा लाभ होईल किंवा काय लाभ होणे आवश्यक आहे?
शिक्षण क्षेत्रात नवीन, चांगले संशोधन सुरू होऊ शकते, त्यासाठी प्रशिक्षण दिले गेले पाहिजे. त्याचसोबतच जुन्या मराठी भाषेचा, व्याकरणाचा अधिक चांगला अभ्यास करता येऊ शकतो. पुरातत्वीय संदर्भांच्या आधारे भाषेच्या इतिहासाचा अभ्यास करून संस्कृतीची चांगली मांडणी करता येऊ शकते आणि त्यामुळे भौगोलिक, पुरातत्वीय, अर्थशास्त्रीय अशा सगळ्या विषयांच्या अभ्यासाला चालना मिळू शकते.
दिपाली कानसे