नवी दिल्ली : केंद्रीय गृह मंत्रालयाने गुरुवारी हिजब-उत-तहरीर या दहशतवादी संघटनेवर बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे. मागील काही काळात, राष्ट्रीय तपास संस्थेकडून या संघटनेतील सदस्यांच्या घरांवर छापेमारी करण्यात आली होती. कारवाईच्या दरम्यान, संस्थेला भारतविरोधी फुटीरतावादाचा प्रचार करणारे साहित्य आढळून आले. या संघटनेच्या माध्यमातून युवकांची माथी भडकवण्याचे काम सुरु असल्याची माहिती माध्यमांना मिळाली.
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी आपल्या X हँडलवर या संदर्भातली माहिती शेअर केली. ते म्हणाले "पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या झीरो टोलरन्स टुवर्डस् टेररिझम या धोरणाला अनुसरुन हिजब-उत-तहरीर या संघटनेला दहशतवादी संघटना घोषित करत त्यावर बंदी घालण्यात येत आहे. दहशतवादी संघटनेसाठी पैसे गोळा करणे, तरुणांना अशा दहशतवादी संघटनांमध्ये भाग घ्यायाला लावणे, या आणि अशा असंख्य भारतविरोधी कारवायांमुळे यांच्यावर अंकुश ठेवणे गरजेचे आहे, जे काम मोदी सरकार करत आहे." तामिळनाडू मध्ये केलेल्या कारवाई मध्ये या संदर्भात धक्कादायक खुलासे झाले आहे. हामीद हुसैन हा या संघटनेचा भारतातील म्होरक्या. त्याच्या ५ साथीदारांसोबत, भारतविरोधी कारवाया करण्यासाठी संघटना विस्तारीत होता. या आरोपीसहीत अनेक गटांसह, संपूर्ण तामिळनाडू आणि भारतामध्ये खिलाफत किंवा इस्लामिक शासन स्थापन करण्यासाठी मोहिमा चालवल्या जात होत्या. समाजात फूट पाडणे आणि देशाचे सार्वभौमत्व, प्रादेशिक अखंडता या गोष्टींना बाधा आणण्याच्या उद्देशाने अनेक लोक सामील होते.
गृहमंत्रालयाने याबाबत अधिकची माहिती शेअर केली असून त्यात त्यांनी म्हटले की हिजब-उत-तहरीर या संघटनेचे उद्दिष्ट जगाच्या पाठीवर लोकशाही मार्गाने चालणाऱ्या देशांची (यात भारताचा सुद्धा समावेश आहे) सत्ता उलथवून लावणे आणि इस्लामिक राजवाट स्थापन करणे आहे. यामुळे देशाच्या अंतर्गत सुरक्षिततेला धोका निर्माण झाला आहे. सोशल मीडीयाचा वापर करत युवकांची माथी भडकवण्याचे काम या संघटनेच्या माध्यमातून सुरु आहे.