नाशिक (पवन बोरस्ते) : दि. २८ मे, १८८३ रोजी स्वा. वि. दा. सावरकर यांचा जन्म ज्या वाड्यात झाला, तो दुमजली वाडा ब्रिटिश सरकारने जॅक्सन वधानंतर १९१०साली जप्त करून काही वर्षांनंतर त्याचा लिलाव केला. हा वाडा मारूतीराव चव्हाण यांनी विकत घेतला. पुढे तो वारसाहक्काने पांडुरंग चव्हाण यांच्या मालकीचा झाला. त्यावेळी त्यांनी या वाड्यात सावरकरांची जन्मखोली वगळून उर्वरीत खोल्यांमध्ये काही भाडेकरू ठेवले. १९६६ साली सावरकरांच्या निधनानंतर हा वाडा स्मारकरूपात जतन करण्याची मागणी भगूरकरांनी उचलून धरली.
परंतु, तत्कालीन काँग्रेस सरकारने त्याला प्रतिसाद दिला नाही. पुढे भाजप-शिवसेना युती सरकारने तत्कालीन मालक पांडुरंग चव्हाण यांना नुकसान भरपाई देऊन वाडा ताब्यात घेत तो पुरातत्त्व खात्याकडे वर्ग केला. २०१४ नंतर भाजप सरकारच्या कार्यकाळात वाड्याची डागडुजी करण्यात आली. देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्याची शपथ घेऊन त्यासाठी सर्व आयुष्य झोकून देणार्या सावरकरांचा वयाच्या १४ वर्षांपर्यंत याच वाड्यामध्ये वावर होता. सावरकरांचे चौथीपर्यंतचे शिक्षण पूर्ण होईपर्यंतच्या काळाचा हा वाडा साक्षीदार आहे.
दरम्यान, अंदमानच्या काळकोठडीच्या कारागृहातून स्वातंत्र्यवीर सावरकरांची दि. ६ जानेवारी, १९२४ रोजी सुटका झाली. यानंतर त्यांना रत्नागिरी येथे स्थानबद्ध करण्यात आले. या सुटकेला आज १०० वर्ष पूर्ण होत आहे. त्यानिमित्ताने स्वा. सावरकरांच्या जन्मठिकाणी अर्थात भूगरस्थित सावरकर वाड्यामध्ये काही वर्षं वास्तव्य असलेल्या भाडेकरूंचा शोध घेऊन दै. ‘मुंबई तरुण भारत’ने त्यांच्याशी संवाद साधला. यावेळी त्यांनी सावरकर वाड्याच्या सान्निध्यात राहणे, ही आमच्यासाठी मोठी भाग्याची, अभिमानाची आणि समाधानाची गोष्ट असल्याचे सांगत सावरकर वाड्यातील आठवणींना उजाळा दिला.
सावरकरांच्या जन्मघरात वास्तव्याचे आजही आत्मिक समाधान वाटते
भगूरजवळीलच देवळाली साऊथ येथे हवाई दलामध्ये १९८३ साली मी रुजू झालो. नाशिकहून रोज येणे-जाणे शक्य नव्हते. त्यामुळे मी जवळच भगूरमध्ये भाड्याच्या खोलीचा शोध घेतला. त्यावेळी एका आजीनेसावरकर वाड्यात एक भाड्याची खोली दाखविली. पुढे याच वाड्यात आम्ही सात ते आठ वर्ष राहिलो. लग्नानंतरही मी तिथे एक वर्ष राहिलो. आपण स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या जन्मघरात काही काळ वास्तव्यास होतो, याचे आत्मिक समाधान वाटते. अगदी दूरवरून लोक वाडा पाहायला यायची. तिथे राहायला मिळाले हे माझे नशीब. राज्य सरकारने वाडा ताब्यात घेतल्यानंतर बरीच सुधारणा, बदल झाला. पूर्वी पडझडीला आलेला सावरकर वाडा सध्या सुस्थितीत आहे, याचे समाधान वाटते. सावरकर वाड्यात गेल्यावर ऊर अभिमानाने भरून येतो.
- मुरलीधर वाघ
वाड्याचा वापर होत राहिला, म्हणून तो सुस्थितीत टिकून राहिला
सावरकर वाड्यात मी १९८१ ते १९८४ दरम्यान राहत होतो. वडील जिल्हा परिषदेत कुष्ठरोग तज्ज्ञ होते. सिन्नरहून नाशिकला बदली झाल्याने आम्ही संपूर्ण कुटुंबासह तीन वर्ष सावरकर वाड्यात भाड्याने राहात होतो. त्यावेळी मी नुकताच दहावी उत्तीर्ण झालो होतो. खासगी मिळकत असूनही वाडा पाहायला भरपूर लोकं यायची. सावरकरांची जन्मखोली भाड्याने दिलेली नव्हती. तिला कुलूप होते. कुणीही ती पाहण्यास, दर्शन करण्यास आले, तर मालक परवानगी देत असत. तिथे राहायचो, याचा अभिमान वाटायचा. आम्ही तिथे राहिलो होतो, याविषयी लोकं आजही कौतुकाने विचारतात. खोली सोडल्यानंतर मी २०२० पर्यंत भगूरमध्येच राहिलो. त्याठिकाणी एक चित्रफीत बनवली गेली, त्यात माझ्या मुलांनीही अभिनय केला होता. वाड्याचा वापर होत राहिला, म्हणून तो सुस्थितीत टिकून राहिला.
- सुनील भावसार
एका प्रखर राष्ट्रभक्ताच्या जन्मघरी राहण्याचे भाग्य मिळाले
१९७४ ते ११९२ अशी १८ वर्षे आम्ही सावरकर वाड्यामध्ये वास्तव्यास होतो. वाड्यासमोर तेव्हा ऐसपैस आणि मोकळी जागा होती. मुलांचे बालपण, संगोपन वाड्यात गेले. तिथे लहान मुले खेळताना, बागडताना एक वेगळीच वातावरण निर्मिती होत असे. एका प्रखर राष्ट्रभक्ताच्या जन्मघरी राहण्याचे भाग्य मिळाले, याचा अभिमान वाटतो. युतीच्या सरकारने या वास्तूचे मूल्यमापन करून योग्य मोबदला देऊन ती सरकारच्या ताब्यात घेतली. त्यानंतर आम्ही वाडा सोडून दुसरीकडे स्थायिक झालो. सावरकरांची सासरवाडी जव्हारची. त्यांनाही ब्रिटीशांनी प्रचंड त्रास दिला. अंदमानला जाण्याची फार इच्छा आहे, मात्र जेमतेम परि ते कधी शक्य झाले नाही. काँग्रेसने सावरकरांना दुर्लक्षित केले, मात्र सध्याची स्थिती उत्तम आहे. वाड्याला नवसंजिवनी देऊन पुन्हा गतवैभव प्राप्त झाले आहे. मोदी सरकारच्या कार्यकाळात स्वा. सावरकरांना भारतरत्न पुरस्कार मिळावा, अशी माझी तीव्र इच्छा आहे.
- रमेश गायकवाड
...तो काळ आठवला की छाती आजही अभिमानाने फुलून येते
माझा जन्म जव्हारचा आणि सावरकर यांच्या पत्नी यमुनाबाई यांचे माहेरही जव्हारचेच. सावरकर वाडा हा त्यावेळी खासगी वास्तू असल्याने त्याकाळी वाड्याविषयी फार कुणाला माहिती नव्हती. इतिहासातही सावरकर यांचा इतिहास तसा अत्यल्पच. त्यामुळे सावरकर वाडा तसा दुर्लक्षितच राहिला. एकाच वाड्यामध्ये अनेक कुटुंबे राहत होती. माझा भाऊ नोकरीनिमित्त याठिकाणी भाड्याने राहात होता. त्यावेळी मी शिक्षणानिमित्त जवळपास पाच वर्ष भावासोबत राहिलो. त्यामुळे मला १९८२ ते १९८७ असे पाच वर्ष या वाड्याचा सहवास लाभला. ही काही वर्ष माझ्या आयुष्यात आली, हे आजही आठवले तरी छाती अभिमानाने फुलून येते. महापुरुषाच्या जन्मवास्तूचे काही काळ का होईना सान्निध्य लाभले, ही पुण्याईच. भगूर गावातील जुनी मंडळी आजही मला जवळून ओळखतात. तेथील करंजकर गल्लीतील अनेकजण माझे जवळचे मित्रदेखील आहेत.
- अनंत खैरनार
मी नशिबवान म्हणूनच सावरकरांच्या जन्मघरात राहता आले
१९८८ ते १९९५ पर्यंत आम्ही सावरकर वाड्यात भाड्याने राहात होतो. पती हवाई दलात नोकरीला असल्याने व भगूर तिथून जवळ असल्याने आम्ही या घरात भाड्याने राहात होतो. त्यावेळी महिन्याला आम्हाला १४० रुपये भाडे होते. जेव्हा मुंबई, पुण्याहून लोकं वाडा पाहायला यायची, तेव्हा अभिमान वाटायचा. मी नशिबवान होते म्हणूनच सावरकरांच्या जन्मघरात, जन्मगावी इतकी वर्ष राहता आले. मी घर शेणा-मातीने सारवायचे. वाड्याच्या प्रवेशद्वाराच्या बाजूलाच आमची खोली होती. तेव्हा वाड्यात कुणीही गाईड, सुरक्षारक्षक नसल्याने कुणी वाडा पाहायला आले, तर आम्हीच त्यांना वाड्याची माहिती द्यायचो. त्यावेळी वाडा सरकारच्या ताब्यात नसल्याने आम्हाला तिथे राहता आले. आता उत्तम स्थितीतील वाडा पाहून आनंद वाटतो.
- भारती वाघ