श्रीराम जन्मभूमीसाठी आपले तारुण्य पणाला लावून, आता निवृत्तीच्या उंबरठ्यावर अखंड भारताचा ध्यास लागलेले, संघनिष्ठ कारसेवक महेश भास्कर जोशी यांची ही चित्तरकथा...
ठाण्यातील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक तथा प्रथितयश उद्योजक महेश जोशी यांचा जन्म दि. ३० जानेवारी १९६७ रोजी झाला. ठाण्यातील चरई भागातील अहिल्यादेवी उद्यानाच्या गल्लीत त्यांचे कौलारू जुन्या वळणाचं घर होते. अगदी छोटसे अंगण, ओसरी, पडवी, माजघर, परसदार अशा अगदी पारंपरिक घरात महेश यांचे बालपण सुखनैव पार पडले. महेश यांचे आई, वडील, काका असे मोठे अगत्यशील कुटुंब. महेश यांचे वडील भास्कर जोशी हे स्वतः एक निष्ठावंत संघ स्वयंसेवक आणि बँकेत अधिकारी होते. १९४८च्या संघबंदी विरुद्ध सत्याग्रह करून त्यांनी कारावासही भोगला होता. संघ स्वयंसेवकांना त्या दिवसांत विशेषतः महाराष्ट्रात खूपच अवहेलनेला सामोरे जावे लागले होते. परंतु, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्वयंसेवकांनी अत्यंत संयमाने आणि धीरोदात्तपणे सरकारी आणि सुलतानी अत्याचारांना तोंड दिले.
अनेक संसारही त्याकाळात उद्ध्वस्त झाले. तरीही संघविचार आणि कार्याचा वसा टाकून न देता, उलट अधिक उत्कटतेने उराशी कवटाळून संघ हीच आपली जीवननिष्ठा, हे व्रत अविरतपणे अंगीकारले. अशा या संघसमर्पित भावनेने काम करणारे एक स्वयंसेवक म्हणजे महेश यांचे वडील. महेश यांच्या आईदेखील तन्मयतेने सामाजिक कार्यात सक्रिय होत्या. विश्व हिंदू परिषदेच्या कितीतरी वर्षे त्या ‘प्रखंड मंत्री’ होत्या. आता ८८व्या वर्षीही त्यांच्या मातोश्री समितीच्या कार्यकर्त्या आहेत, तर ’ठाणे गौरव पुरस्कार’ प्राप्त पत्नी मानसी जोशी ‘डॉक्टरेट’ असून, पर्यावरण दक्षता मंडळाच्या त्या संचालक आहेत. एकूलता एक २६ वर्षीय मुलगा संघाचा पूर्णवेळ जिल्हा प्रचारक आहे. असा संघनिष्ठेचा उज्ज्वल वारसा जोशी कुटुंबाच्या अगदी पाळामुळातच भिनलेला.
शिशु वयापासूनच महेश राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक. १९८२ पासून शाखा गटनायक ते विभाग सहकार्यवाह होईपर्यंत संघाच्या संघटनात्मक जबाबदार्या त्यांनी यशस्वीरित्या पार पाडल्या. संघाचे तिन्ही वर्षाचे शिक्षण १९८४, १९८५ आणि १९८६ साली महेश यांनी पूर्ण केले. १९८९ ते १९९२ पर्यंत ठाणे शहराची बजरंग दलाचे दायित्वही त्यांनी लीलया सांभाळले. भिवंडीतील आनगाव येथे ‘फिरती प्रयोगशाळे’च्या माध्यमातून मुलांना प्रयोग शिकवले. तलासरीमध्ये ’रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनी’तर्फे प्रदूषणाच्या सर्वेक्षणाचे काम संघनायक म्हणून महेश यांनी केले. मुंबई विद्यापीठातून १९८९ साली प्रथम श्रेणीत ‘एमएससी’ उत्तीर्ण झाल्यानंतर, लगेचच १९९०च्या अयोध्या कारसेवेची जबाबदारीही महेश यांनी आनंदाने तसेच धीरोदात्तपणे स्वीकारली. त्यावेळी त्यांचे वय होते, अवघे २३ वर्षे!
त्यावेळी जे पाच कारसेवक नेमले होते, त्यात धर्मवीर आनंद दिघे, दत्ता कामत हे प्रथम कारसेवक होते. रामजन्मभूमी लढ्याची खरी सुरुवात १९८३-८४ साली झाली. भारतमाता यात्रा, गंगामाता यात्रा, राम-जानकी रथयात्रा मोठ्या उत्साहात काढली गेली. रामशीला पूजनही संपन्न झाले. रामज्योत यात्रेलाही रामभक्तांचा अगदी उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
१९९०च्या ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यात कारसेवेत लालकृष्ण अडवाणींची रथयात्रा अडवली, तेव्हा ’मारू किंवा मरू’ या ध्येयाने महेश जोशी सशस्त्र या लढ्यात सामील झाले. भगवा गमछा घालून डॉ. वरदराज बापट, अॅड. सुयत्न धाक्रस, सुजित साठे, किशोर भावसार, ललित सारंग, संजय पटवर्धन हे सर्वजण त्यावेळी अगदी लपूनछपून अयोध्येत गेले. पण, तरीही रेल्वे स्थानकावर सर्वांना अटक करण्यात आली. त्यातल्या त्यात महेश जोशी मात्र संधी साधून दोन डब्यांच्या मध्ये लपून बसून राहिले. नंतर रेल्वेच्या शौचालयात घुसल्याने पोलिसांच्या नजरेतून सुटल्याचे महेश आवर्जून सांगतात. पहिल्याच दिवशी एका तरुणाने बाबरी ढाँच्यावर भगवे निशाण (फडके) फडकवले. सा. ’विवेक’चा पत्रकार मोहन बने हा युवक ढाँच्याच्या मागच्या भागातील जंगलात कॅमेरा घेऊन लपून बसला होता, त्यानेच तो फोटो काढला. जो पहिला फोटो सर्वत्र प्रसिद्ध झाला आणि कारसेवा सुफळ संपूर्ण ठरून विरोधकांना एक सणसणीत चपराक बसली.
रामनाम जपयात्रा मोठ्या स्वरुपात झाली. त्याची माळा आजही महेश यांच्या गळ्यात दिसते. सर्वत्र हिंदुत्वाचे वारे वाहत असतानाच, राजीव गांधींची हत्या झाली आणि पुन्हा काँग्रेस पक्ष सत्तेवर आला. पुढे १९९०च्या कारसेवेत सक्रिय राहून, त्यावेळच्या अयोध्येतील संघर्षात प्रत्यक्ष महेश जोशी यांनी सहभाग घेतला, तर १९९२च्या कारसेवेतही योगदान दिले. “ज्यावेळेला अयोध्येला गेलो, तेथून सर्वात शेवटी परतणारा मी होतो. तेव्हा ठाण्यात वावड्या उठल्या की, शरयू नदीकाठी हनुमान गढीत फायरिंग झाली, त्यात महेश गेला. घरी पत्रकारांची रीघ लागली, वडिलांना प्रश्न विचारले गेले. मात्र, काही दिवसांतच सुखरूप ठाण्यात परतल्याने, कुटुंबीयांसह सार्यांनाच सुखद धक्का बसला,” असा थरारक अनुभवही महेश कथन करतात.
“ऐन तारुण्यातच सर्वांनी क्रांती केली आहे. ’जन्मभूमी के काम ना आए वो जवानी बेकार है’ सुवर्णाक्षरांनी हा इतिहास लिहिला जाणार आहे. असा अभिमान बाळगताना, ते स्वातंत्र्य आंदोलनात नव्हते, तरी अनेकजण पेन्शनसाठी रांग लावतात,” अशी खंतही ते व्यक्त करतात. “ ‘अखंड हिंदुस्थान हैं प्यारा, रामजन्मभूमी हैं पहला न्यारा’ या नार्यामुळेच हिंदू संघटित झाले. ’हिंदू हित की बात करेगा, वही देश पे राज करेगा’ ही उक्ती सत्यात उतरुन ते परिवर्तन जनतेने घडवून आणले. २०१४ साली ’मोदी युग’ सुरू झाले आणि ’मंदिर निर्माण ते राष्ट्र निर्माण’ हा सर्वांचाच ध्यास आणि श्वास बनला. एवढ्यावरच थांबायचे नाही तर, ’जो मिला उसीमे खुश मत रहना; जो खोया हैं उसका चिंतन करना हैं।’ या अनुषंगाने मातृभूमीचा तोडलेला लचका परत मिळवायचा आहे. एका आक्रमक समाजामुळे खंडन झाले आहे, तो अखंड हिंदुस्थान बाकी आहे,“ अशी दुर्दम्य इच्छाशक्ती महेश व्यक्त करतात.
संघ हीच जीवनगाथा, हे सूत्र शिरोधार्य मानून संघाने दिलेले काम आणि संघानुकूल जीवनरचना या बाबीला महेश जोशी यांनी कायमच सर्वोच्च प्राधान्य दिले. संघटनात्मक चौकटीचे बळकटीकरण, कार्यकर्त्यांच्या निष्ठेचे दृढीकरण आणि जिल्ह्याच्या सर्व भागांत कार्यविस्तार, यावर त्यांचा कटाक्ष राहिला. नुकतेच महेश जोशी यांनी आपले राहते घर पूर्णपणे नव्याने बांधले. वास्तू बदलली; परंतु त्या वास्तूने जोपासलेला निष्ठेचा धगधगीत वारसा हा जसाच्या तसा पुढच्या पिढीपर्यंत जातो आहे, ती प्रक्रिया कुठेही खंडित झालेली नाही, याचा प्रत्यय महेश यांच्या कुटुंबातून आजही प्रतीत होतो.
२००३ ते २००७ ठाण्यातील प्रताप व्यायामशाळा सेवा संस्थेच्या जागेत स्वखर्चाने इमारत उभी करून दिली. तेथील संघाच्या योजनेतून आकाराला आलेल्या ‘वामनराव ओक रक्तपेढी’चे ते उद्गाता असल्याचे सांगतात. २०१६ पर्यंत या रक्तपेढीचे पालकत्व त्यांच्याकडेच होते. सध्या ते श्रीराम व्यायामशाळेचा ११ कोटींचा प्रकल्प उभारत आहेत. त्याचे ‘प्रोजेक्ट इन्चार्ज’ म्हणून जबाबदारीही महेश जोशी यांच्याकडे आहे. डिसेंबर २०२४ पर्यंत ही इमारत पूर्ण करणार असल्याचे ते सांगतात.
महेश यांचे वयोवृद्ध वडील, महेश स्वत: आणि त्यांचा मुलगा अभिषेक असे तीघेही संघाचा गणवेश घालून उत्सवासाठी निघाले की, संघाचे स्वयंसेवकत्व पिढ्यान्पिढ्या जपत आलेल्या कुटुंबाचे वैभव अगदी लख्ख दिसते. महेश जोशी यांची पत्नी मानसीही ‘दुर्गा वाहिनी’त सक्रिय असून २००२ पासून ‘दीपकज्योती महिला पतपेढी’ची संचालिका आहे, तर ‘पर्यावरण दक्षता मंडळा’तही कार्यरत आहे. संघाचे तृतीय सरसंघचालक बाळासाहेब देवरस यांनी मोठ्या धन्यतेने एकदा म्हटलं होतं की, ”देवदुर्लभ कार्यकर्त्यांचा संच संघाला लाभला आहे.” त्यांच्या या उक्तीचा शब्दार्थ आपल्या जीवनामध्ये तंतोतंत अंगीकारणारी महेश जोशी यांच्या कुटुंबासारखी अनेक कुटुंबे संघामध्ये कार्यरत आहेत. निष्ठा, श्रद्धा यांची परंपरा एका पिढीकडून दुसर्या पिढीकडे सहजपणे हस्तांतरित होण्याचीही प्रक्रिया अन्यथा समाजामध्ये विरळ होत चाललेली असताना, संघामध्ये मात्र त्याचा अत्यंत मनोमन प्रत्यय येतो.
युवा पिढीला संदेश देताना महेश जोशी अधिकारवाणीने सांगतात की, ”अयोध्या आंदोलनाने अनेक आयाम आपल्या समोर ठेवले आहेत. कर्तृत्व दाखवायला देव आपल्याला अनेकवेळा संधी देतो, ती जाणून घ्या. किंबहुना, त्यासाठी आपले सर्वस्व लावून पूर्ण केल्यास वैयक्तिक जीवनात तर फायदा होईलच, पण सामाजिक जीवनातही लाभ होईल. प्रत्येक तरुणाने विचार करायला हवा की, येणारा काळ हा सुवर्ण काळ आहे. मंदिर निर्माणामध्येच राष्ट्र निर्माण आहे, तेव्हा देशासाठी माझं स्वतःचं काय योगदान आहे, याचा विचार युवा पिढीने करणे गरजेचे आहे.”
अशा या प्रखर ध्येयनिष्ठ व दुर्दम्य इच्छाशक्ती लाभलेल्या कारसेवक महेश जोशी यांच्या राष्ट्र उभारणीच्या पुढील वाटचालीस दै. ’मुंबई तरूण भारत’च्या मनःपूर्वक शुभेच्छा!
(अधिक माहितीसाठी संपर्क - ९८२१०५७९३८