नवी दिल्ली : अमेरिकेतील कॅलिफोर्नियामध्ये दुसऱ्यांदा हिंदू मंदिरावर हल्ला झाला आहे. यावेळी हेवर्ड येथील शेरावली मंदिरात ही घटना घडली. १४ दिवसांतील हा दुसरा हल्ला आहे. यापूर्वी नेवार्कमधील मंदिरावर हल्ला झाला होता.
या हल्ल्यात खलिस्तानींनी शेरावली मातेच्या मंदिराच्या फलकावर काळ्या शाईने लिहिले आणि तिथे खलिस्तान जिंदाबादच्या घोषणा दिल्या. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात अपशब्द लिहिले. अमेरिकेतील हिंदूंसाठी काम करणार्या हिंदू अमेरिका फाउंडेशन या संस्थेने त्यांच्या X खात्यावर त्याचे छायाचित्र शेअर केले आहे.
याआधी शिव दुर्गा मंदिरावर हल्ल्याची धमकी देण्यात आली होती, त्यानंतर शेरावली मंदिराला लक्ष्य करण्यात आले होते. दि. २२ डिसेंबर २०२३ रोजी नेवार्कमधील स्वामीनारायण मंदिरावर हल्ला झाला. त्यावेळी मंदिराच्या भिंतींवर भारतविरोधी घोषणा लिहिण्यात आल्या होत्या. याशिवाय भिंतींवरील चित्रेही खराब करण्यात आली होती. हा प्रकार घडल्यानंतर हिंदू अमेरिकन फाऊंडेशनने या घटनेचा द्वेषपूर्ण गुन्हा म्हणून तपास करावा, असा आग्रह धरत होते.
केवळ अमेरिकेतच नाही तर कॅनडातही खलिस्तानींनी अनेकवेळा हिंदू मंदिरांना लक्ष्य केले आहे. अलीकडेच त्याने सरे येथील एका मंदिराची तोडफोड केली होती आणि नंतर त्याच मंदिराच्या प्रमुखाच्या मोठ्या मुलाच्या घरावर गोळीबार केला होता.याशिवाय गेल्या वर्षी ऑस्ट्रेलियात एका हिंदू मंदिरावर हल्ला झाला होता आणि तिथल्या स्वामीनारायण मंदिराची तोडफोड झाली होती. यावेळी मंदिराच्या दारावर खलिस्तानी झेंडे आणि पंतप्रधान मोदींबद्दल आक्षेपार्ह शब्द लिहलेले होते.