साहेब करोगे याद तो...

    04-Jan-2024   
Total Views |
 Uddhav Thackeray
 
वांद्य्राच्या साहेबांनी अंगणवाडी सेविकांना परवा आवाहन केले की, निमूट बसू नका म्हणे. पण, साहेबांना कोण सांगणार की, साहेब या सगळ्या माता-भगिनी तुमच्यासारखा सोन्याचा चमचा तोंडात घेऊन जन्मल्या नाहीत! निमूटबिमूट बसणे त्यांच्या रक्तात नाही आणि नशिबातदेखील नाही. सध्याचे महायुतीचे सरकार या भगिनींना योग्य तो न्याय देईलच. त्यांची काळजी तुम्ही करूच नका. ‘आवाज कुणाचा’ म्हणत तुम्हाला सत्तेत आणण्यासाठी मोर्चे, आंदोलने केली, म्हणून तर नोकर्‍या गेल्या अन् गरिबी आली. म्हणून मुंबई सोडून कल्याणच्या पुढे राहायला गेलेल्या, त्या आयाबाया, त्यांचे कुटुंब. साहेब ते आठवतात का तुम्हाला? करोगे याद तो... साहेबांना अंगणवाडी सेविकांचा कळवळा आला. पण, जेव्हा ते सत्तेत होते, तेव्हा भाऊ म्हणून त्यांनी अंगणवाडी सेविकांचा विचार केला का? कालपर्यंत तर ’कोरोना’ आला, तेव्हा आम्ही असं केलं, तसं केलं असं म्हणत साहेब फुशारक्या मारत होते.
 
लोकांना माहिती आहे की, रस्त्यावर त्यावेळी रा. स्व. संघ आणि समविचारी सज्जनशक्ती रस्त्यावर उतरून जनसेवा करत होती.
अंगणवाडी सेविकाही घरोघरी जात होत्याच. तेव्हा साहेब तर फेसबुक-फेसबुक खेळत होते. साहेबांच्या राज्यात काय चालले होते; तर साधू हत्या, सुशांत-दिशा आत्महत्या, हिरेन आणि १०० कोटींचे खंडणी प्रकरण. त्यावेळी जनता उपाशी आणि तडफडून-तडफडून मरत होती; मात्र जनतेच्या मढ्याच्या टाळूवरचं लोणी खाण्यात भ्रष्ट लोक दंग होती. त्याचवेळी साहेबांसोबत केवळ स्वार्थासाठी लोंबकळत राहणारे, बोलघेवडे साहेबांच्या मुलाखती घेत होते. साहेब कसे आंतरराष्ट्रीय स्तरावरचे ‘कोरोना’तज्ज्ञ आहेत वगैरे दावे करत होते. कोरोना काळ सरला आणि आता तर काय महाविकास आघाडी सरकारचा खिचडी घोटाळा, ‘कोरोना’ सेंटर घोटाळादेखील चव्हाट्यावर आला. सत्ता गेली, सगळेच गेले. आता परत सत्तेत कसे यायचे, तर अलबत त्यांची मशाल पेटलेली आहे. या मशालीने राज्यात असंतोष पेटवण्याचे काम ते अगदी जिजानसे करत आहेत. ’जिजान’ हा शब्द वापरला आहे. हा शब्द वापरला तर साहेबांचे हक्काचे नवमतदार खूश होतील. बाकी गेले अनेक दशकं साहेबांच्या पक्षाचे मुंबईत बस्तान होते. त्यांच्या राज्यात मराठी माणूस मुंबईतून का बाहेर गेला? साहेब करोगे याद तो...
 
 
हाथी चले बाझार...
 
“आजारी पडलात, तर रुग्णालयात जाणार की मंदिरात? भूक लागली आणि मंदिरात गेला, तर तिथे तुम्हाला कोणी अन्न देईल का? उलट तिथे तुम्हाला दान द्याव लागेल.” इति तेजस्वी यादव. नावातच तेज आणि बाकी अकलेचा अंधार असलेल्या या तेजस्वीला कोणी तरी विचारले होते का की, मंदिर बांधल्यावर काय होणार? पण, देवादिकांचे नाव घेतल्यावर, राक्षसभूतं जशी सैरभैर होतात, तसे काहीसे सध्या बिहारमध्ये तेजस्वी यादव आणि इथे महाराष्ट्रात जितेंद्र आव्हाडचे झालेले. जितेंद्रचे ठीक. कारण, त्याला ’जितुद्दीन’ हीच लोकपदवी मिळालेली. असो. तर तेजस्वी यादव रुग्णसेवेबद्दल बोलतो तेव्हा वाटते की, त्याने जणू आजन्म जनतेच्या सेवेसाठी स्वतःला वाहिले असावे. जणू काही त्याने, त्याचे बाबा लालू यादव, मातोश्री राबडीदेवी यांनी लालटेनच्या प्रकाशात बिहारचा विकासच विकास केला आहे. किती हास्यास्पद आहे की, तेजस्वी यादव जनतेच्या भुकेबद्दल बोलत आहे. पण, ज्यांचा चारा खाल्ला, त्या पशूंच्या भुकेबद्दल तेजस्वीने बोलावे. भ्रष्टाचाराच्या कलंकात आकंठ डुबलेल्या पालकांचा तितकाच भ्रष्ट विचारांचा पुत्र हा तेजस्वी यादव. या अशा लोकांना वाटते की, हिंदूंना काही धार्मिक अस्मिता नसते.
 
सवलतीचे दोन तुकडे फेकले की, हिंदू खूश; पण आता तसे राहिलेले नाही. हिंदूंची धार्मिक, सामाजिक आणि राजकीय अस्मिता जागृत झालेली आहे. अर्थात, तेजस्वी काय किंवा जितेंद्र आव्हाड काय? या दोघाही मंदबुद्धींना वाटते की, प्रभू श्रीरामचंद्रांचे मंदिर बांधण्याची प्रतिज्ञा भारतीय जनता पक्षाने केली. हिंदू श्रद्धा, निष्ठा आणि देवधर्माचा जागर केला, म्हणून केंद्रात भारतीय जनता पक्ष सत्तेत आली. त्यानंतर अयोध्या जन्मभूमीचा निकाल प्रभू श्रीरामचंद्रांच्या बाजूने लागला. त्यामुळे देशातली बहुसंख्य हिंदू जनता भाजपच्या भजनी लागली. परिणामतः भाजप नंतर पुन्हा सत्तेत आली. भाजप सत्तेत येण्याचे कारण श्रीराम आहेत, असे ऐकून या रामविद्रोही आणि सत्तेतून पायउतार झालेल्या व्यक्तींना वाटते. या सगळ्याचा राग-राग येऊन, हे लोक मंदिराबद्दल काहीही बोलत सुटलेत. खरं तर तेजस्वी काय नि आव्हाड काय? दोघांच्या विकृत अकलेला आणि लबाड मानसिकतेला समाजाने अजिबात भीक घालू नये. ‘कुत्ते भोके हजार हाती चले बाझार’ अशी म्हण आहेच म्हणा!
 
९५९४९६९६३८
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.

योगिता साळवी

एम.ए. समाजशास्त्र. सध्या मुंबई तरुण भारत  येथे वार्ताहर-उपसंपादक पदावर कार्यरत. राजकीय कार्यकर्ता म्हणून प्रदीर्घ अनुभव. विविध सामाजिक प्रश्‍नांच्या अभ्यासाची आवड व लिखाण. वस्त्यांचे वास्तव हे मुंबई तरुण भारतमधील लोकप्रिय सदराच्या लेखिका.