नवी दिल्ली : संसदेचे अल्पकालीन अर्थसंकल्पीय अधिवेशन पासून सुरु झाले. परंपरेनुसार या अधिवेशनाची सुरूवात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या अभिभाषणाने झाली.नव्या संसद भवनात प्रथमच आपले विचार मांडण्याचा आनंद वाटत असल्याचे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी म्हटले आहे. स्वातंत्र्याच्या अमृत काळाच्या प्रारंभिक दिवसांत नव्या संसद भवनाच्या निर्मितीचे काम पूर्ण झाल्याबद्दल राष्ट्रपतींनी समाधान व्यक्त केले. नवे संसद भवन ‘एक भारत - श्रेष्ठ भारत’ या भावनेच्या उत्साहाने ओतप्रोत भरलेले असून ही इमारत भारतीय सभ्यता आणि संस्कृतीचे मूर्तीमंत स्वरूप आहे, अशी भावना राष्ट्रपतींनी व्यक्त केली. ही इमारत स्वातंत्र्याच्या अमृत काळात, विकसित भारताला आकार देणाऱ्या धोरणांवर होणाऱ्या फलदायी चर्चेची साक्षीदार बनेल, असा विश्वास राष्ट्रपतींनी व्यक्त केला.
गेले वर्ष भारतासाठी ऐतिहासिक कामगिरीने भरलेले आहे. या काळात देशवासीयांचा अभिमान वाढवणारे अनेक क्षण आले, असे राष्ट्रपती मुर्मू यांनी सांगितले. त्या पुढे म्हणाल्या, गंभीर संकटांमध्ये भारत ही जगातील सर्वात वेगाने वाढणारी प्रमुख अर्थव्यवस्था बनली आहे. सलग दोन तिमाहीत भारताचा विकास दर ७.५ टक्क्यांच्या वर आहे. चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर ध्वज फडकवणारा भारत हा पहिला देश ठरला. भारताने आदित्य मिशन यशस्वीरित्या प्रक्षेपित केले, पृथ्वीपासून 15 लाख किलोमीटर दूर आपला उपग्रह पाठवला. ऐतिहासिक G-20 शिखर परिषदेच्या यशाने जगभरात भारताची भूमिका मजबूत झाली. आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताने प्रथमच 100 हून अधिक पदके जिंकली, तसेच पॅरा आशियाई क्रीडा स्पर्धेत 100 हून अधिक पदके जिंकली. भारताला सर्वात मोठा सागरी सेतू अटल सेतू मिळाला. भारताला पहिली नमो भारत ट्रेन आणि पहिली अमृत भारत ट्रेन मिळाली. भारत हा जगातील सर्वात वेगवान ५जी रोलआउट देश बनला आहे. इंडियन एअरलाइन्स कंपनीने जगातील सर्वात मोठ्या विमानाचा सौदा केला. गेल्या वर्षीही केंद्र सरकारने मिशन मोडमध्ये लाखो तरुणांना सरकारी नोकऱ्या दिल्या आहेत, असेही राष्ट्रपतींनी आपल्या अभिभाषणात नमूद केले.