कथित खिचडी घोटाळ्यात राऊतांच्या भावाचं नाव का आलं?

    30-Jan-2024
Total Views |
Sandeep Raut News

लॉकडाऊनचा काळ हा प्रत्येकासाठी कशाप्रकारे संघर्षांचा काळ होता. पंरतु यावेळी कामगार आणि गरीबांना दिल्या जाणाऱ्या खिचडीत ही काही लोकांनी घोटाळा केला. आणि गरीब कामगारांसोबत ठाकरे गटाचे प्रवक्ते संजय राऊत यांच्या मित्रपरिवाराने ही लाखो रुपयांची खिचडी खाल्ली. असा आरोप विरोधकांकडून सध्या केला जातोय. त्यातच आता कथित खिचडी घोटाळा प्रकरणी संजय राऊतांचे धाकटे बंधू संदिप राऊत यांची ईडीकडून चौकशी करण्यात आली. त्यामुळे संदिप राऊत यांच्यावर कोणत्या घोटाळ्याचे आरोप आहेत? या घोटाळ्या प्रकरणी कोणाची नावे पुढे आली आहेत?

राज्यात कोविडकाळात गाजलेल्या खिचडी घोटाळ्याचे धागेदोरे आता थेट ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्या कुटुंबीयांपर्यंत पोहोचल्याचं बोललं जात आहे. ह्यांचं कारण म्हणजे खिचडी घोटाळ्यातील भ्रष्टाचाराचे पैसे मुख्य आरोपी राजीव साळुंखे यांच्या खात्यातून संजय राऊतांचे निकटवर्तीय सुजीत पाटकर यांच्या यांच्या खात्यात जमा झाले. त्यानंतर हे पैसे संजय राऊतांचे भाऊ संदीप राऊत आणि कन्या विधिता राऊत यांच्या खात्यात जमा झाल्याचं पोलीस तपासात समोर आल्याची माहिती काही वृत्तसंस्थांनी दिली आहे. त्यामुळे पुन्हा एकदा खासदार संजय राऊत यांच्यासह राऊत कुटुंबीयांच्याही अडचणी वाढणार असल्याचं बोललं जात आहे. या घोटाळ्यासंबधी सुरुवातीला स्थलांतरित मजुरांना २५ लाख खिचडी पॅकेट पुरवण्याच्या नावाखाली पालिकेकडून ८ कोटींचा घोटाळा झाल्याची माहिती किरीट सोमय्यांनी दिली होती. त्यावेळी सह्याद्री रिफ्रेशमेंट कंपनीचे नाव या घोटाळ्यात समोर आले होते. त्यानंतर मुंबई आर्थिक गुन्हे शाखेने संजय राऊत यांचे निकटवर्तीय सुजीत पाटकर, सुनिल बाळा कदम, महापालिकेचे तत्कालीन सहा. आयुक्त, सह्याद्री रिफ्रेशमेंटचे राजीव साळूखे, फोर्सवन मल्टी सर्विसेसचे भागीदार आणि कर्मचारी, स्नेहा कॅटरर्सचे भागीदार, इतर बीएमसी अधिकारी आणि इतर संबंधित खासगी लोकांविरोधात खिचडी घोटाळ्यासंबधी गुन्हा दाखल केला होता.त्यानंतर या घोटाळ्यात राऊतांचे बंधू संदिप राऊत आणि कन्या विधिता राऊत यांची नावे पुढे आली. या प्रकरणी किरीट सोमय्या म्हणाले की, सह्याद्री रिफ्रेशमेंटचे मुंबईत वैश्य सहकारी बँकेत खाते आहे.त्या खात्यात खिचडीचे कोट्यावधी रुपये जमा झाले आहेत.

त्यात विधीता राऊत यांच्या खात्यावर २९ मे २०२० रोजी ३ कोटी ५० लाख रु. २६ जुन २०२० रोजी ५ लाख रु. ४ ऑगस्ट २०२० ला १ लाख २५ हजार आणि २० ऑगस्ट २०२० रोजी ३ लाख रु. आले."म्हणजे जवळपास विधिता संजय राऊत यांच्या खात्यावर खिचडी घोटाळ्याशी संबधित १२ लाख ७५ हजार रुपये आले आहेत. तसेच संजय राऊत यांचे भाऊ संदिप राऊत यांच्या खात्यात १० ऑगस्ट २०२० ला ५ लाख रु.२० ऑगस्ट २०२० ला १ लाख ४५ हजार रुपये आले. म्हणजे संदिप राऊत यांच्या खात्यात ६ लाख ४५ हजार रुपये कथित खिचडी घोट्ळ्याच्या रुपाने जमा झाले.त्याचबरोबर कोविड घोटाळ्याप्रकरणी अटक झालेल्या सुजीत पाटकर यांच्या खात्यात १५ जुलै २०२० ला १४ लाख रुपये, ५ ऑगस्ट २०२० ला १४ लाख , २९ ऑक्टोंबर २०२० ला १० लाख रुपये, १७ डिंसेबर २०२० रोजी १ लाख ९० रुपये. त्याचबरोबर १२ जानेवारी २०२१ ला १ लाख ९० हजार रुपये आले.म्हणजे जवळपास ४१ लाख ८० हजार रुपये कोविड घोटाळ्यासंबधी पैसे पाटकर यांच्या खात्यात जमा झाले आहे, अशी माहिती काही पुराव्यांच्या माध्यमातून किरीट सोमय्यांनी दिली होती. त्यानंतर या प्रकरणात संदिप राऊतांचे नाव चर्चेत आलं.

त्यानंतर आता काही वृत्तसंस्थानी दिलेल्या माहितीनुसार, या स्थलांतरीत कामगारांना खिचडी देण्याचं कॉन्ट्रॅक्ट ५२ कंपन्यांना मुंबई महानगरपालिकेनं दिलं होतं. सुरुवातीच्या ४ महिन्यात ४ कोटी खिचडी पॅकेट वाटण्यात आले, असं मुंबई महानगरपालिकेचे म्हणणं आहे. पण यामध्ये घोटाळा झाल्याचा आरोप करण्यात आला आहे. त्याचीच चौकशी सुरू आहे. तसेच सुजित पाटकर यांच्या खात्यातून संदीप राऊत यांच्या खात्यावर ७.७५ लाख रुपये, तर विधिता राऊत यांच्या खात्यावर १४.७५ लाख जमा झाल्याचे पोलिस तपासात उघड झाले आहे. गंभीर बाब म्हणजे कोविड काळात खिचडी बनवण्याचे कंत्राट चुकीच्या पद्धतीने दिले आणि त्यात मोठा भ्रष्टाचार झाल्याचेही समोर आले आहे. खिचडी बनवण्याचे कंत्राट मिळवण्यासाठी बोगस कंपनीची कागदपत्रे दिल्याचा पोलिसांचा संशय आहे. त्या दृष्टीने पोलिस तपास करत आहेत.खिचडी बनवण्याचे कंत्राट संजय राऊत यांचे निकटवर्तीय बाळा कदम यांच्या वैष्णवी किचनला (सह्याद्री रिफ्रेशमेंट) देण्यात आले. यातही कंपनीचा पत्ता चुकीचा दिल्याचे उघड झाले. शिवाय धक्कादायक बाब म्हणजे या कंपनीकडे अन्न व प्रशासनाचा परवाना नसतानाही वाटाघाटी करून ते कंत्राट दिल्याचे पोलिस तपासात समोर आले आहे.इतक्यावरच न थांबता मुंबई महापालिकेने प्रति ३०० ग्रॅम खिचडीचे ३३ रुपये मंजूर केले असताना, प्रत्यक्षात मात्र १०० ग्रॅम खिचडीचे वाटप करत ५ कोटी ९३ लाख ९७ हजार २३५ रुपये स्विकारून प्रत्यक्षात खिचडी बनवण्यासाठी ३.२० कोटी देत, उर्वरित २ कोटी ३ लाखाच्या निधीचा गैर वापर केल्याचा आरोप करण्यात आला आहे.

दरम्यान दि. १७ जानेवारी २०२४ ला सूरज चव्हाण यांना ईडीने अटक केली. त्यानंतर कोरोनाच्या पहिल्या लाटेत फोर्स वन मल्टी सर्व्हिसेस या सुरक्षा फर्मने सुनील कदम उर्फ बाळा याच्या मदतीने पालिकेचे कंत्राट मिळवले.कदम या कामासाठी सह्याद्री रिफ्रेशमेंट आणि संजय माळी यांच्या स्नेहा केटरर्स आणि डेकोरेटर्सना खिचडीची पाकिटे पुरवतील, असे ठरले होते. पालिकेने फोर्स वन मल्टी सर्व्हिसेसला ८.६४ कोटी रुपये दिले होते, असे सुरज चव्हाण यांनी न्यायालयात सादर केलेल्या रिमांड अर्जात म्हटले आहे. तर दुसरीकडे पाच साडेपाच लाखांच्या घोटाळ्यासाठी पण ईडी चौकशी होई शकते. हे काय ईडीचे काम आहे ? , असा सवाल संदिप राऊतांनी उपस्थित केला आहे. तसेच राजीव साळुंखे माझे चांगले परिचित आहेत. कोविड काळामध्ये त्यांच्याकडे किचन नव्हते. त्यामुळे त्यांनी माझ्या हॉटेलचे किचन वापरले. त्यांच्याकडे साहित्य नव्हते. मी ते त्यांना दिले. कोविड काळामध्ये कोणीही काम करण्याची हिमंत दाखवत नव्हते. परंतु आम्ही जनतेची सेवा केली आहे, असे ही संदिप राऊत म्हणाले. त्यामुळे आता ईडीच्या या चौकशीनंतर आणखी सत्य बाहेर येण्याची सत्यता आहे.