इस्रायलच्या हल्ल्यात हमासचा नेता ठार; युद्ध चिघळण्याची शक्यता
03-Jan-2024
Total Views |
बेरूत : इस्रायली सुरक्षा दलांनी लेबनानची राजधानी बेरूतमध्ये लपून बसलेल्या इस्लामिक दहशतवादी संघटना हमासचा उपनेता सलाह अल अरोरी याला ड्रोन हल्ल्यात ठार केले. इस्रायल सुरक्षा दलाने ही कारवाई दि. २ जानेवारी २०२४ मंगळवारी केली. त्याच्या मृत्यूला हमासने दुजोरा दिला आहे.
अरोरीवर हल्ला झाला तेव्हा ते लेबनानची राजधानी बेरूतच्या दक्षिणेकडील निवासी भागात असलेल्या हमासच्या कार्यालयात होते. हे कार्यालय तीन मजली इमारतीत बांधण्यात आले असून इस्त्रायलने त्यावर लक्ष्य करून हल्ला केला. या हल्ल्यात सलाह अल अरोरीसह ७ जण ठार झाल्याचे वृत्त आहे. लेबनानमधील ज्या भागात अरोरीचा मृत्यू झाला तो शिया मुस्लिमांची दहशतवादी संघटना हिजबुल्लाचा गड मानला जातो. त्याचा मृत्यू भ्याड हल्ला असल्याचे हमासने म्हटले आहे.
इस्रायलचा हा हल्ला गाझामधील अपयश दर्शवतो, असे हमासच्या प्रवक्त्याने म्हटले आहे. इस्रायलच्या सुरक्षा दलांनी या प्रकरणी माध्यमांना कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. इस्रायलने आतापर्यंत या हल्ल्याची जबाबदारी घेण्यास नकार दिला आहे. मात्र, अमेरिकन अधिकाऱ्यांनी अमेरिकन वृत्तपत्रांशी बोलताना हा हल्ला इस्रायलने केल्याचे म्हटले आहे.
सोशल मीडियावर शेयर करण्यात येत असलेल्या छायाचित्रांद्वारे दावा करण्यात येत आहे की, सलाह अल अरोरीवरील हल्ला इतका वेगवान आणि प्रभावी होता की नंतर आलेल्या टीमला फक्त त्याचा हात सापडला. तेथे किमान दोन जणांच्या शरीराचे अवयव विखुरल्याचे सांगण्यात येत आहे. हल्ल्यापूर्वी लोकांना ड्रोनचा आवाजही ऐकू आला.
इस्रायलने मारलेला हमासचा दहशतवादी सलाह अल अरोरी कोण होता?
इस्रायलच्या हल्ल्यात मारले गेलेले ५७ वर्षीय अरोरी हमासमध्ये क्रमांक २ चे स्थान सांभाळत होता. हमास प्रमुख इस्माइल हनीयेह नंतर तो या दहशतवादी संघटनेचा सर्वात मोठा नेता होता. हमासच्या दहशतवादी कासिम ब्रिगेडचा पाया त्यांनीच घातला होता. गेल्या दीड दशकापासून तो लेबनॉनमध्ये राहत होता.
१९६६ मध्ये वेस्ट बँकमध्ये जन्मलेला अरोरी १९८७ मध्ये हमासमध्ये सामील झाला. इस्त्रायलमध्ये त्याला दोनदा तुरुंगात टाकण्यात आले आहे परंतु इस्रायल आणि पॅलेस्टिनी गटांमधील वाटाघाटीमुळे दोन्ही वेळा त्याची सुटका झाली. तो सीरिया, तुर्की, लेबनान आणि कतारसारख्या देशांमध्ये दहशतवादी कारवायांना प्रोत्साहन देत असे.