यशस्वी उद्योजकासोबतच संवेदनशील, समाजशील व्यक्तिमत्त्व असलेले सुधीर राणे. ‘रँकोज कोकणात बंगला’ कंपनीचे सर्वेसर्वा असलेल्या सुधीर राणे यांच्या कार्यविचारांचा घेतलेला हा मागोवा...
आपल्यासाठी दोन अधिक दोन चार नाहीत, तर पाच झाले पाहिजेत आणि दोन वजा दोन शून्य नाही, तर एक राहिला पाहिजे. मग ते यंत्राचे असू दे की, निसर्गसंपत्तीचे. पैसे किती कमावले, हे महत्त्वाचे नाही, तर कमाविलेल्या संपत्तीतून आयुष्यात या समाजाचे किती ऋण आपण फेडले, हे महत्त्वाचे,” असे विष्णू राणे, त्यांच्या सुपुत्राला सुधीरला सांगत असत.
सुधीर यांनी हे पितृवचन उद्यमाचे आणि आयुष्याचे सूत्र मानले. त्यांनी प्रचंड कष्ट आणि प्रामाणिकपणे सातत्य ठेवत यशस्वी व्यावसायिक म्हणून लौकिक मिळवला. त्यांचा पडीक जमिनीचा विकास करण्याचा व्यवसाय. ’रँकोज कोकणात बंगला’ नावाची कंपनी त्यांनी उभी केली. पडीक जमिनी ज्यात शेतीभाती होत नाही आणि जमिनीला पाणीही लागत नाही, अशा जमिनी विकत घेणे, तिथे बंगला बांधणे आणि प्रत्येक बंगल्यासोबत दहा वृक्ष लावणे, असा हा व्यवसाय. इथे पाणी उपलब्ध व्हावे, म्हणून मग त्यांनी बंधारे बांधून ’पाणी अडवा, पाणी जिरवा’चे प्रयोगही अगदी यशस्वी केले. अगदी त्याच वर्षी बोअरवेलला पाणी नव्हते, तरी त्यांनी विहिरी बांधल्या. त्या विहिरींना पाणी लागले नाही. मात्र, पावसाळ्यात त्या विहिरींमध्ये पाणी साचले, बाजूच्या जमिनीत मुरले आणि पुढच्याच वर्षी बोअरवलेलाही पाणी लागले. त्यांनी अशाप्रकारे ३६० बंगले बांधले आणि लोकांनी ते मोठ्या हौसेने खरेदीही केले. पुढे वृक्ष लागवड केली. वृक्षांचे संवर्धन केले. ही झाडे वृक्षप्रेमींनी विकत देऊन, त्यांचे संवर्धन करावे, यासाठी सुधीर यांनी विशेष काम केले. ते म्हणजे त्यांनी ’ट्री प्लांट फॉर मी फाऊंडेशन’ स्थापन केली. त्याद्वारे २७ हजार वृक्षांची लागवड केली. तसेच कुडाळमधील ३६ एकर, मालवणमधील २६७ एकर, मातोंड-वेंगुर्ला येथील चार एकर आणि सावंतवाडीमधील ६० एकर जमिनीवर वृक्ष लागवड केली. निसर्गाशी तादात्म्य पावत उत्पन्न मिळवून देणारी वृक्षराजी त्यांनी या जमिनीवर रूजवली, वाढवली, संवर्धित केली. अशी परिपूर्ण वृक्षसंपदेची व्रिकी केली. हेतू हाच की, वृक्षासह जमीन विकत घेणार्या, लोकांना अर्थार्जन करणारी वृक्षसंपदा लाभेल. त्यामुळे ही झाडे कुणीही तोडणार नाही. निसर्गाची ही संपत्ती कायमच राहील. सुधीर यांची ही निसर्गशील उद्यमता पाहिली की वाटते, यामागची प्रेरणा काय असेल? त्यासाठी त्यांच्या भूतकाळाचा मागोवा घेतला.
सुधीर यांचे वडील विष्णू राणे हे रा. स्व. संघाचे स्वयंसेवक. राणे कुटुंब मूळचे वेंगुर्ल्यातील मातोंड गावचे. विष्णू आणि त्यांची पत्नी भागीरथी अत्यंत पापभिरू आणि कष्टाळू. विष्णू हे अत्यंत कल्पक बुद्धीचे. शेतकरी कुटुंबातील विष्णू मुंबईला कामानिमित्त गेले. तिथे नोकरी करता-करता त्यांनी स्वतःचा अभियांत्रिकी क्षेत्रातला उद्योग सुरू केला. त्यात जम बसवला आणि इतर भावांनाही स्वतंत्र उद्योग निर्माण करून दिला. त्यांनी पत्नी भागीरथी आणि तीन मुलांना कुडाळला एमआयडीसीतील त्यांच्या कारखान्यातच ठेवले होते. ते नेहमी मुंबई ते कुडाळ ये-जा करीत असत. कारखान्यातच राहत असल्याने, सुधीर हे बालपणापासूनच यंत्रांच्या सोबत रमू लागले. या काळात कुडाळच्या त्या एमआयडीसी परिसरात एकही झाड नव्हते. त्यावेळी विष्णू यांनी मुलांना सोबत घेऊन, तिथे नारळाची आणि इतर झाडे लावली. पवनचक्की बसवली, गांडूळ खताचा प्रकल्पही उभारला. खादी ग्रामोद्योगच्या मदतीने जिल्ह्यात ३०० गोबर गॅस प्रकल्प उभे केले. वडिलांची उद्यमशीलता सुधीर यांच्या मनावर कोरली गेली.
सुधीर यांनी बारावीची परीक्षा दिली. पुढे शिक्षण घेणार, तर ती दुःखद घटना घडली. विष्णू यांचे कर्करोगाने निधन झाले. या काळात वडिलांशिवाय पोरक्या झालेल्या १८ वर्षांच्या सुधीर यांना जनरीत कळली. याच काळात वडिलांनंतर मोठ्या भावासोबत काम करू लागले. मात्र, कंपनीचा नफा समाधानकारक नव्हता. वडिलांनी तर दोन अधिक दोन पाच हे सूत्र सांगितलेले. त्यामुळे अधिक नफा कसा मिळेल, याचा विचार सुधीर करू लागले. त्यासाठी सुधीर यांनी कंपनीच्या मार्केटिंगची धुरा खांद्यावर घेतली. कंपनीचे उत्पन्न तीन वर्षांत चौपट झाले. पुढे सुधीर यांचा दुसरा भाऊही उद्योग-व्यवसायात स्थिरावला. त्यावेळी सुधीर यांनी स्वतंत्र व्यवसाय सुरू करण्याचे ठरवले. त्यांनी यावेळी विचार केला की, भावांंच्या उद्योगाशी स्पर्धा करायची नाही. त्यामुळे दोन भाऊ जे व्यवसाय करत होते, तो व्यवसाय न करता, त्यांनी नवीन वाटेने जायचे ठरवले. त्यांच्या मनाने ग्वाही दिली की, ज्यामध्ये माणूस आणि निसर्ग यांचा समन्वय साधला जाईल, तोच व्यवसाय करायचा. त्यातूनच पडीक जमिनीचा विकास करण्याचा व्यवसाय त्यांनी सुरू केला. व्यवसायासोबत सुधीर यांनी सामाजिक संवेदनाही जपल्या. गोरगरीब, गरजू त्यातही दुर्बल घटकांना सर्वांगीण सहकार्य करणे, नैसर्गिक आपत्ती असू दे की, ’कोरोना’ची महामारी, या प्रत्येक संकटामध्ये सुधीर समाजासाठी कायमच कार्यरत राहिले. हिंदू धर्म, देश प्रतिष्ठा यांसाठी जो काही खारीचा वाटा उचलावा लागला, तो त्यांनी सहर्ष उचलला. ”समाज आणि देश सक्षम झाला, तरच आपण माणूस म्हणून जगू,” असे सुधीर यांचे मत. त्यामुळेच “यापुढेही सतत कार्यक्षम राहत समाज आणि देशाच्या आर्थिक विकासासोबतच नैतिक आणि धार्मिक उन्नतीसाठीही कार्य करणार आहे,“ असे सुधीर म्हणतात. ‘रँकोज कोकणात बंगला’च्या माध्यमातून कोकणाचा असाही विकास करणारे सुधीर राणे हे जन्मभूमीचे ऋण फेडू इच्छिणार्या, प्रत्येक उद्योजकांचे दिशादर्शक आहेत, हे नक्की!
९५९४९६९६३८