मानवी विचार, कृती यांचा विषामृताचा खेळ आणि या खेळातील खेळाडू ओळखण्याचे कौशल्य आयुष्यात जितके लवकर आत्मसात करता येईल, तितकेच आयुष्य सुकर ठरेल.
दैनंदिन जीवनात तुम्ही बरेचदा अशा व्यक्तीला किंवा व्यक्तींना भेटता, त्यांच्याशी संवाद साधता, जे कोरोनासारखे नकारात्मक परिणाम तुमच्या आयुष्यात कळत-नकळत घेऊन येतात. असे लोक तुम्हाचे अस्तित्व मर्यादित करण्याचा किंवा तुम्हाला नेस्तनाबूत करण्याचा प्रयत्न करू शकतात किंवा तुम्ही केलेल्या कोणत्याही प्रगतीकडे ते दुर्लक्ष करू शकतात आणि तुमची खिल्ली उडवू शकता. अशी विषारी व्यक्ती आपल्या वर्तुळात आरामात फिरत असते. बर्याच विषारी लोकांबद्दल दुःखाची गोष्ट म्हणजे, ते स्वतःमधील विषारीपणाकडे पूर्णपणे डोळेझाक करतात. परिणामी, तुम्ही त्यांच्या आयुष्यातून निघून गेल्यावर त्यांना धक्का बसतो आणि कधी कधी ते पूर्ण गोंधळून जातात. विषारी व्यक्तिमत्व असलेल्या व्यक्तीचे सूचक म्हणजे त्यांच्या मर्यादा किंवा सीमा क्लेषदायक असतात. बरेचदा माणसे अशा विषारी लोकांमध्ये, नातेसंबंधांमध्ये गुरफटून पडतात. त्यातून बाहेर कसे पडायचे, याचा त्यांना कोणताही मार्ग दिसत नाही. या सगळ्यात गुंतलेली व्यक्ती पालक, भावंड, सहकारी, मित्र, जोडीदार किंवा प्रियकर आहे की नाही याने काही फरक पडत नाही, ते कदाचित तुमचे हितद्रोही वा शत्रूही असतील. पण, महत्त्वाचे म्हणजे अशा परिस्थितीत तुम्हाला नक्की काय करावे, कसे वागावे, कसे बोलावे, कशी प्रतिक्रिया द्यावी हेच सूचत नाही. आपल्याला पूर्ण कल्पना असते की, आपले त्या व्यक्तीशी असलेले संबंध सक्षम, निरोगी किंवा चांगले अजिबात नाहीत. यामुळेतुम्हाला सतत अस्वस्थ व वाईटही वाटते. परंतु, अजाणतेपणी आपण या नातेसंबंधात अडकून पडलो आहोत, हे लक्षात येण्याची भावनाही तितकीच वेदनादायी म्हणावी लागेल.
असे विषारी मानसिकतेचे लोक वारंवार प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे तुमचा, तुमच्या भावनांचा अवमानच करतात. यापैकी काही तर त्यांच्यामुळे समोरच्या व्यक्तीवर होणार्या नकारात्मक प्रभावाबद्दल बरेचदा अनभिज्ञही असतात, तर काही विषारी मंडळी वातावरणात गोंधळ निर्माण करून आणि इतर लोकांशी हटकून वागल्याने त्यांना अतीव समाधान मिळते. येनकेन प्रकारे ते अनावश्यक गुंतागुंत, भांडणे आणि सर्वांत वाईट प्रकारचा तणाव त्यांच्या आसपास इतरांसाठी निर्माण करतात.संशोधनात असे स्पष्टपणे दिसून आले आहे की, अशा प्रकारच्या तणावाचा मेंदूवर चिरस्थायी, नकारात्मक प्रभाव जाणवतो. काही दिवसांच्या तणावाच्या संपर्कात राहिल्याने-तर्कशक्ती आणि स्मरणशक्तीसाठी जबाबदार असे मेंदूचे एक महत्त्वाचे क्षेत्र एवढे बिघडते की, ते पुन्हा सुधारणे शक्य होत नाही. अनेक महिन्यांचा ताण मेंदूतील महत्त्वाच्या पेशी कायमस्वरुपी नष्टदेखील करू शकतो. तणाव हा तुमच्या यशासाठी मोठा धोकाच. जेव्हा तणाव नियंत्रणाबाहेर जातो, तेव्हा तुमचा मेंदू आणि तुमच्या कार्यक्षमतेला साहजिकच त्रास होतो. नकारात्मकता असो, क्रूरता असो, पीडित भूमिका असो किंवा साधा वेडेपणा असो, विषारी लोक तुमच्या मेंदूला तणावग्रस्त अवस्थेत आणतात, ज्याला कोणत्याही परिस्थितीत टाळले पाहिजे.
असुरक्षिततेच्या भावनेने जोडलेले, एकमेकांशी दुखावलेल्या नातेसंबंधात तरीही कायम राहण्याच्या मानसिकतेमागचे कारण म्हणजे, स्वतःवर किंवा स्वत:च घेतलेल्या निर्णयांवर अजिबात विश्वास नसणे. जर तुमची मनाची ‘डीफॉल्ट’ स्थिती ही हलगर्जीपणा, विषारी विचार व वर्तनाला तर्कसंगत बनवण्याची असेल, (उदा. तो जे बोलला, त्याचा अर्थ खरोखरच तसा नव्हता; तो क्षणाचा उमाळा होता) किंवा त्या व्यक्तीला संशयाचा फायदा देणे (उदा. तिला कदाचित कळले नसावे की, तिचे हावभाव दुसर्यांना दुखावणारे होते; एकदा तिला समजावून सांगितल्यानंतर, मला खात्री आहे की ती नक्की भानावर येईल), अशा अतार्किक विसंगत विचारांच्या पलीकडे जाऊन थांबण्याची गरज आहे. आपण कोणाला आणि कोणासाठी का माफ करीत आहोत, हे समजून घेण्याचा हा उचित क्षण आहे. तुम्ही जर इतरांच्या विषारी बहाणे बनवण्याच्या किंवा विषारी वर्तनाला तर्कसंगत बनवण्याच्या पद्धतीमध्ये गुंतून गेला असाल तर कृपया थांबा. कारण, या विषारी लोकांचा अनुभव फक्त एक प्रकारची जाणवणारी वेदनाच नाही, तर ते खूप धोकादायक ठरू शकते. धोकादायक म्हणजे, हेराफेरी करणे, लोकांना नियंत्रित करणे, त्यांना अपमानास्पद वागणूक देणे वगैरे. काही विषारी लोकांकडे चोरी करणे, खोटे बोलणे, फसवणूक करणे, यशस्वी होण्यासाठी लोकांना भुरळ घालणे किंवा इतरांचा वापर करणे किंवा फायदा घेणे, असे मुळी एक कौशल्यच असते. एकदा तुम्ही अशा व्यक्तींचे डावपेच, विचारसरणी आणि अयोग्य वर्तन ओळखले की, तुम्ही त्यांना कशी प्रतिक्रिया द्यावी, त्यांचा सामना कसा करावा किंवा त्यांना कसा निरोप द्यावा, याचा अंदाज तुम्हाला येईल.
एखादी व्यक्ती तुमच्यात उदासीन, आत्म-जागरूक, मूर्ख किंवा इतर कोणत्याही नकारात्मक भावना निर्माण करत असेल, तर तुम्ही पुढे निघून जा. तुम्ही कितीही दयाळू असलात, तरीही दुष्ट लोकांचे तुमच्यासोेबत एकप्रकारे उद्दाम आणि अलिप्त असेच वर्तन असते. त्यामुळे इतरांना त्रास होऊ शकतो आणि नैतिक खच्चीकरण झाल्यासारखे वाटत राहते. अशावेळी या लोकांपासून शहाणपणाने आणि निर्धाराने दूर राहा. अशा पाशवी लोकांबरोबर तुम्ही दीर्घकालीन उद्दिष्टे स्थापित करू इच्छित नाही किंवा तुमचा वापर करू इच्छिणार्या व्यक्तीकडून मोठ्या गोष्टींची अपेक्षा करू इच्छित नाही. जर ती व्यक्ती तुमची खरोखर काळजी घेत असेल किंवा तुम्हाला आवडत असेल आणि तुमचा आदर करत असेल तर तुम्हाला ते कळेलही. परंतु, तसे नसल्यास तुम्हाला ही व्यक्ती आपल्याला फसवत आहेत, हेही लक्षात आले पाहिजे. एका वेगळ्या ‘पॅटर्न’मध्ये देखील अशा व्यक्ती असतात, ज्या तुम्हाला एका क्षणी अनावर प्रेम करतात आणि दुसर्या क्षणाला तुमची निंदानालस्तीही करतात. म्हणजे काही आठवड्यांसाठी तुम्हाला आदरपूर्वक वागणूक दिली जाईल आणि अन्य आठवड्यात तुम्हाला वारंवार अपमानित केले जाईल. एका क्षणी प्रशंसा आणि दुसर्या क्षणी नाचक्की. असे होत असेल तर ती व्यक्ती नक्कीच भीतीदायक आणि विषारी आहे, हे ध्यानात घ्या. ही परिस्थिती तुमच्यासाठी नरकसदृश्य आहे, हे आधी नीट समजून घ्या. ज्याप्रमाणे पर्यावरणात विषारी पदार्थ असतात, त्याचप्रमाणे माणसांमध्येही विषारी मानसिकतेची माणसं असतात. त्यामुळे अशा विषारी लोकांना ओळखणे आणि त्यांना टाळणे, हे शक्य तितक्या लवकर जीवनात आत्मसात करणे , हे देखील एक जीवनावश्यक कौशल्यच आहे.
डॉ. शुभांगी पारकर