डॉ. बिंदेश्वर पाठक : समरसतेच्या सामाजिक न्यायाची क्रांती

    27-Jan-2024   
Total Views |
Padmavibhushan Award to dr bindeshwar pathak

डॉ. बिंदेश्वर पाठक यांना नुकताच मरणोत्तर ’पद्मविभूषण पुरस्कार’ जाहीर झाला. ‘स्वच्छ भारता’च्या सर्वांगीण उभारणीसाठी झटणार्‍या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कारकिर्दीत पाठकांना हा सन्मान जाहीर झाला, हा एक सुवर्णयोगच! त्यानिमित्ताने डॉ. बिंदेश्वर पाठक यांच्या विचारकार्याचा संक्षिप्तपणे घेतलेला हा आढावा...

डॉ. बिंदेश्वर पाठक यांनी ’सुलभ इंटरनॅशनल संस्थे’च्या माध्यमातून हाताने मैला साफ करून, डोक्यावर वाहून नेणार्‍या बांधवांच्या जगण्यात मानवी मूल्यांची क्रांती घडवून आणली. या आधीही शौच साफ करणार्‍या, वंचित समाजबांधवांसाठी अनेकांनी तळमळीने काम केले. मात्र, समाजबांधवांच्या जगण्यात फरक पडला नाही. कारण, मैला माणसांनी साफ केला नाही, तर तो जाणार कुठे? ही एक भीषण समस्या होती. दुसरा प्रश्न होता की, जर या समाजगटाने मैला साफ करण्याचे काम केले नाही, तर त्यांचे उत्पन्नाचे साधन काय असेल? तर ‘सुलभ शौचालया’च्या निर्मितीतून बिंदेश्वर पाठक यांनी या दोन्ही समस्यांचे निवारण केले. ‘सुलभ शौचालया’ची संकल्पना अशी आहे की, या पद्धतीमध्ये शौच-मैल्याची विल्हेवाट नैसर्गिरित्या लावली जाते.

मैला वाहण्याची गरजच उरली नाही. दुसरीकडे ‘सुलभ शौचालया’ची सार्वजनिक स्तरावर बांधणी झाली आणि समाजाला अर्थार्जनाचे साधन मिळाले. त्याचबरोबर समाजाने शिक्षित व्हावे, सन्मानपूर्वक स्वयंरोजगाराच्या माध्यमातून स्वावलंबी व्हावे, यासाठी बिंदेश्वर यांनी यशस्वी कार्य केले. यामुळे डोक्यावरून मैला वाहून नेण्यासारख्या अमानवी प्रथेतून लोकांची सुटका झाली. समाज शिकू लागला, सन्मानाने जगू लागला, प्रगती करू लागला. आज देशभरात ’सुलभ इंटरनॅशनल’चे हजारो शौचालय आहेत आणि लाखो लोक या शौचालयाचा, स्नानगृहाचा वापरही करतात.

बिहारच्या वैशाली जिल्ह्यातील रामपूर बाघेल गावच्या बिंदेश्वर पाठकांनी इतकी मोठी क्रांती केली. पण, ती सहजासहजी नव्हतीच! कारण, पाठक कुटुंब म्हणजे प्रचंड रुढीवादी कुटुंब. नातेवाईक मनाने चांगले होते; मात्र स्पृश्य-अस्पृश्य भेदाभेद माननारे. माणूस दुसर्‍या माणसाप्रति इतके अमानवी कसा वागू शकतो? हा विचार त्यांना पडत असे. या सगळ्या विचारांमध्ये दैनंदिन जगणे सुरूच होते. कला शाखेतून पदव्युत्तर शिक्षण घेतल्यानंतर पुढे बिंदेश्वर बिहार गांधी शताब्दी समितीशी जोडले गेले. त्यावेळी शौच साफ करणार्‍या समाजगटासोबत ते राहिले. तिथे एक घटना घडली. एक बैल उधळला आणि तो बालकावर धावून गेला. आजूबाजूचे लोक त्या बालकाला वाचवण्यासाठी धावणार इतक्यात कुणीतरी ओरडले की, ”अरे, तो मैला साफ करणार्‍या वस्तीतला मुलगा आहे.” लोकं थांबली. बिंदेश्वर पाठक आणि सहकारी कसेबसे त्या बालकाला वाचवण्यासाठी पुढे धावले.

पण, बैलाने त्या बालकावर हल्ला केला. ते बालक मृत पावले. ‘नरेचि केला हिन किती नर’ - एका विशिष्ट गटाला अशी अमानवी वागणूक का दिली जात असेल? त्यानंतर ती एक घटना घडली. एका घरात सूनबाई रडत होती. तिचे सासू-सासरे तिला म्हणत होते की, ”शहरात जा, मैला साफ करण्याचे काम मिळेल.” पण, सूनबाईचे म्हणणे की ती सुशिक्षित आहे. मैला डोक्यावर नेण्याचे काम ती करणार नाही. तिच्या सासर्‍यांचे म्हणणे होतेे की, ती कितीही शिकली, तरी तिला शौच साफ करण्याचेच काम मिळेल. त्यांच्या या मतावर बिंदेश्वर निरुत्तर झाले. प्रश्न होते, पण त्यावर उत्तर काय?

मनात जर सत्कार्याची तीव्र इच्छा असेल, तर सगळी सृष्टी माणसाला साहाय्य करते, हेच खरे! त्यामुळेच या काळात ’एक्सक्रिटा डिस्पोजल इन रुरल एरिया अ‍ॅण्ड स्मॉल कम्युनिटिज’ हे पुस्तक आणि उत्तम शौचालय पद्धतीवर लिहिलेले राजेंद्र दास यांचे पुस्तक बिंदेश्वर यांच्या वाचनात आले. या दोन पुस्तकांमुळे त्यांच्या मनात ’सुलभ शौचालया’ची संकल्पना रूजली. तसेही महात्मा गांधींच्या स्वच्छतेच्या संकल्पनांचा बिंदेश्वर यांच्या आयुष्यावर प्रभाव होताच. बिंदेश्वर यांचा ’पीएचडी’चा विषय होता-’कमी खर्चात सफाई प्रणालीच्या माध्यमातून बिहारमध्ये सफाई कामगारांची मुक्ती.’

सुलभ शौचालयाच्या संकल्पनेवर काम करताना, बिंदेश्वर यांना अनेक अडचणी आल्या. त्यांच्या सासर्‍यांनी तर म्हटले की, ”तुमचे तोंडही मला पाहायचे नाही. माझ्या मुलीचे आयुष्य तुम्ही बरबाद केले.” ब्राह्मण कुटुंबांतील उच्चशिक्षित युवकांने शौचालय, मैला वाहणारे लोक यांच्यासाठी काम करावे, हे बिंदेश्वर यांच्या घरातल्यांना मुळीच आवडले नव्हते. तसेच त्यांनी ‘सुलभ शौचालया’ची संकल्पना आराखडा मांडला, तर लोक प्रश्न विचारायचे की, ”तुम्ही काही इंजिनिअर नाही. तुमच्या संकल्पनेवर पैसा लावला आणि ती संकल्पना कार्यान्वित झाली नाही तर?” अशीच उत्तरे अनेकांकडून आल्यावरही बिंदेश्वर यांनी धीर सोडला नाही. शेवटी बिहारमध्ये पहिले दोन शौचालय बांधण्याची, त्यांना संधी मिळाली. तो प्रयोग यशस्वी झाला. बिहारमध्येच नाही, तर देशभरात ती पद्धत यशस्वी झाली. २०११ साली तर अमेरिकेनेही अफगाणिस्तानातील त्यांच्या सैन्यासाठी सुलभ शौचालय बांधण्यासाठी मदत मागितली. याच काळात या समाजबांधवांना मंदिरामध्ये पूजा करण्याचा सन्मानही बिंदेश्वर यांनी मिळवून दिला. त्यासाठी त्यांनी विरोधकांशी संघर्ष नाही, तर समन्वय केला. पुढे वृंदावन-मथुरा येथे नाईलाजास्तव आलेल्या विधवांसाठीही बिंदेश्वर यांनी अत्यंत कल्याणकारी काम सुरू केले.

बिंदेश्वर यांना आधी ’पद्मभूषण पुरस्कार’ तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावरचे अनेक मानसन्मान प्राप्त झाले आहेत. त्यांच्या कार्याचा संक्षिप्त आढावा घेतला, तर जाणवते की, न जाणे कित्येक वर्षांच्या अमानवी पद्धतीतून समाजाची त्यांनी सुटका केली. समाजाला सन्मानाचे जगणे मिळवून दिले. ही रक्तविहिन क्रांती होती. ही विकासाची क्रांती होती, ही मानवी मूल्यांच्या जयघोषाची, स्थापनेची क्रांती होती. मात्र, ही क्रांती करताना बिंदेश्वर यांनी समाजाचे धर्मश्रद्धा, संस्कार यांना कोणताही तडा लावला नाही. उलट समाजासाठी सर्वांगीण विकासाचा पर्याय उपलब्ध करून देताना, बिंदेश्वर यांनी या समाजाचे अखंड भारतीयत्व आणि श्रद्धाशील हिंदुत्व जपले. हेच बिंदेश्वर यांचे मोठेपण आहे, असे म्हणायला हवे.

डॉ. बिंदेश्वर पाठक यांचे शोषित, वंचित समाजासाठीचे अमूल्य शाश्वत कार्य फार मोलाचे आहे. त्यामुळेच त्यांना जाहीर झालेला मरणोत्तर ’पद्मविभूषण’ पुरस्कार हा सन्मान केवळ त्यांचाच नाही, तर वंचित, शोषित समाजाच्या सर्वांगीण उत्थानाच्या सामाजिक न्यायाचा हा सन्मान आहे. हा पुरस्कार समरसतेचा आहे.

९५९४९६९६३८
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.

योगिता साळवी

एम.ए. समाजशास्त्र. सध्या मुंबई तरुण भारत  येथे वार्ताहर-उपसंपादक पदावर कार्यरत. राजकीय कार्यकर्ता म्हणून प्रदीर्घ अनुभव. विविध सामाजिक प्रश्‍नांच्या अभ्यासाची आवड व लिखाण. वस्त्यांचे वास्तव हे मुंबई तरुण भारतमधील लोकप्रिय सदराच्या लेखिका.