मुंबई : लुप्त होत चाललेल्या शिवकालीन खेळांचा वारसा, परंपरा आणि संस्कृती जपण्यासाठी कौशल्य विकास मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी 'छत्रपती शिवाजी महाराज पारंपारिक क्रीडा महाकुंभाचे' आयोजन केले आहे. शुक्रवारी वरळीतील जांभोरी मैदानावर राज्यपाल रमेश बैस आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते या कार्यक्रमाचे उद्धाटन पार पडले. यावेळी मंत्री लोढांनी माध्यमांशी संवाद साधला.
मंत्री मंगलप्रभात लोढा म्हणाले की, "यावर्षी छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाचे ३५० वे वर्ष आपण साजरे करत आहोत. याच पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मार्गदर्शनाखाली मुंबईत एक मोठा क्रीडा महाकुंभ आयोजित केला आहे. याला एवढा चांगला प्रतिसाद मिळेल याची आम्हाला कल्पना नव्हती. मात्र, यामध्ये दोन लाखांहून अधिक लोकांनी सहभाग घेतला आहे," अशी माहिती त्यांनी दिली.
ते पुढे म्हणाले की, "आपले पारंपारिक खेळ हे केवळ खेळण्यापुरतेच मर्यादित न राहता सर्वांनी एकत्र येऊन ते समाजात पोहोचवणे ही छत्रपती शिवाजी महाराजांची भावना होती. आज लोकं कंप्युटर, लॅपटॉप यासारख्या उपकरणांमध्ये जास्त रमत असल्याने पारंपारिक खेळ हळूहळू लुप्त होत चालले होते. त्यामुळेच पारंपारिक आणि मैदानी खेळांची आठवण करुन देण्याची सुरुवात केली आहे. यापुढे संपुर्ण महाराष्ट्रात दरवर्षी हे पारंपारिक खेळ आयोजित करण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी सांगितले असल्याचेही ते म्हणाले."