बे पिए ही शराब से नफ़रत
ये जहालत नहीं तो फिर क्या हैं
असा प्रश्न उपस्थित करणारे प्रसिद्ध कवी आणि गीतकार साहिर लुधियानवी. मुस्लीम असले तरी इस्लामी विचारांपेक्षा समाजवादी विचारांचा लुधियानींवर पगडा. आता लुधियानवींच्या या पंक्ती आठवण्याचे कारण म्हणजे, सौदी अरेबियाने नुकताच घेतलेला एक महत्त्वाचा निर्णय. या निर्णयानुसार तब्बल 50 वर्षांनंतर सौदीचे राजधानीचे शहर रियाधमध्ये परदेशी गैर-मुस्लीम राजनयिक अधिकार्यांसाठी मद्याचे दुकान खुले होणार आहे. त्यामुळे हराम असलेले ‘हाला’ (मद्य) सौदीच्या भूमीत विदेशींसाठी का होईना, आता अधिकृतरित्या ‘हलाल’ होणार आहे.
मक्का आणि मदिनेसारखी धार्मिक स्थळे असलेली सौदी ही इस्लामची जन्मभूमी. इस्लामिक संस्कृतीत मद्यपान हे ‘हराम’ अर्थात निषिद्ध मानले जाते. सौदी, कतारसारख्या काही इस्लामिक देशांत याची काटेकोर अंमलबजावणी होत असली तरी पाकिस्तान, तुर्कीये, उझबेकिस्तान, कझाकस्तान, सीरिया, जॉर्डन, मोरोक्को यांसारख्या कित्येक देशांत सरसकट मद्यप्राशनावर बंदी नाही.
प्रत्येक देशाने आपल्या सोयीनुसार याबाबत नियम-निर्बंध आखलेले दिसतात. आता सौदीनेही गैर-मुस्लीम राजनयिकांसाठी का होईना, मद्याच्या दुकानाला मान्यता दिली. मग यापूर्वी सौदीमध्ये कधीही मद्याचा एक थेंबही उपलब्ध होत नव्हता का? तर, तसे अजिबात नाही. यापूर्वीही हे विदेशी राजदूत, परदेशी उच्चपदस्थ सौदीमध्ये मागच्या दाराने का होईना मद्यप्राशनाचा आस्वाद घेत होतेच. एवढेच काय तर आपल्या अधिकारांचा वापर करून परदेशातूनही सोबत उंची मद्याचा स्टॉक आणण्याची मुभा होतीच.
थोडक्यात काय, मद्य प्यायचे तर खुशाल प्या, पण चार भिंतींच्या आड. विदेशासारखे त्याचे सार्वजनिक प्रदर्शन नको, असा सौदीचा फतवा. कारण, तसे करताना आढळल्यास जब्बर दंड, पोलीस कोठडी आणि शरियानुसार शिक्षेसाठी दोषी व्यक्ती पात्र ठरते.
अशा या सौदीमध्ये मद्यावर बंदी मात्र 1952 साली अमलात आणली. या निर्णयाला कारणीभूत तेथील राजघराणेच ठरले. 1951 साली सौदीचे राजे किंग अब्दुल्ला अझीज यांचा सुपुत्र मिशारी सौदने एका पार्टीत अधिकचे मद्य दिले नाही म्हणून चक्क ब्रिटिश राजनयिकावर गोळ्या झाडून रागाच्या भरात त्याची हत्या केली होती. त्यानंतर मिशारीलाही मृत्यूदंडाची शिक्षा ठोठावण्यात आली. या धक्कादायक प्रकारानंतर वर्षभरानेच सौदीने मद्यावर सरसकट निर्बंध लादले.
मग इतक्या वर्षांच्या बंदीनंतर आताच सौदी घराणे गैर-मुस्लीम विदेशींसाठी हा होईना मद्यप्राशनास परवानगी द्यायला अनुकूल कसे झाले? तर यामागचे कारण म्हणजे, सौदीचे युवराज आणि पंतप्रधान मोेहम्मद बिन सलमान यांचे ‘व्हिजन 2030.’ आज तेलाच्या काळ्या सोन्यामुळे सौदी अरेबिया आर्थिकदृष्ट्या तग धरून आहे. पण, तेलाचे साठे आगामी काही वर्षांत संपुष्टात आल्यानंतर देशाचे भवितव्य काय? याचीच पुरेपूर जाणीव झाल्यामुळे सलमान यांनी सौदीला धार्मिक पर्यटनापलीकडे आता एक ‘टूरिस्ट डेस्टिनेशन’ म्हणून विकसित करण्याचा विडा उचलला. पण, सौदीमधील वहाबी कट्टरतावादी विचारसरणी लक्षात घेता, गैर-मुस्लीम पर्यटन इथे फिरकतील, याची शक्यात धुसरच.
म्हणूनच जगाच्या नजरेत सौदीची प्रतिमा अधिकाधिक लिबरल आणि पाश्चिमात्त्यांना साजेशी करण्याचा घाट सौदीने घातलेला दिसतो. यासाठीच महिलांना मतदानाचा अधिकार देण्यापासून ते त्यांना वाहन चालवण्याचा परवाना देणे, ‘स्मार्ट सिटी’चा विकास, योगवर्ग असे कित्येक अनपेक्षित निर्णय घेऊन सलमान यांनी सौदीचे कडवे इस्लामिक राष्ट्र ही प्रतिमा पुसून टाकण्याचा प्रयत्न चालवलेला दिसतो. त्याच अंतर्गत आता केवळ विदेशी राजनयिकांसाठी या मद्यविक्रीचा प्रयोग करून नंतर सरसकट पर्यटकांसाठीही त्याची अंमलबजावणी होऊ शकते. त्यामुळे एकीकडे राष्ट्राची कट्टर धर्मनिष्ठा आणि दुसरीकडे राष्ट्राच्या आर्थिक आरोग्यासाठीची वित्तनिष्ठा, असा हा सौदीतील प्रकार. असो.
सौदीचा हा निर्णय पाहता, कतारमधील 2022च्या फुटबॉल विश्वचषकावेळी स्टेडियममधील दारुबंदीवरून उडालेला धुरळा स्मरणात आल्याशिवाय राहत नाही. तेव्हा, कतारने मद्यपान इस्लाममध्ये ‘हराम’ आहे, म्हणून पर्यटकांनी इस्लामप्रति ‘एहतराम’ (आदर-सन्मान) दाखवावा, अशी भावना व्यक्त केली होती. पण, अन्य राष्ट्रांत, अन्य धर्मांप्रति तोच ‘एहतराम’ इस्लाम कधी तरी दाखवेल का?