मुंबई : मुंबई महापालिकेने दि. २५ जानेवारी २०२४ रोजी मोहम्मद अली रोडवरील अतिक्रमण हटवत कारवाई केली. या कारवाईत ४० दुकानांचे अतिक्रमण हटवण्यात आले. यातील काही दुकाने १९३० मध्ये बांधण्यात आली होती. याआधी दि. २४ जानेवारी रोजी मीरा भाईंदर महापालिकेने मीरा रोड, ठाणे येथील १५ इमारतींवर कारवाई केली होती.
एका वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, महापालिका अधिकाऱ्यांनी सांगितले की, मोहम्मद अली रोडवर अनाधिकृतरित्या रस्त्यापर्यंत दुकानांची जागा वाढवण्यात आली होती. अतिक्रमण हटवून रस्ता रुंदीकरण करण्यासाठी ही कारवाई करण्यात आली आहे. तसेच या कारवाईचा व्हिडिओ देखील व्हायरल होत आहे. ज्यामध्ये पालिका अधिकाऱ्यांनी दुकानावर बुलडोझर चालवला. या दुकानांमध्ये नूरानी मिल्क सेंटर आणि सुलेमान उस्मान मिठाईवाला यांचेही दुकान आहे.
पालिका अतिक्रमण हटाव विभागातील एका अधिकाऱ्याने सांगितले की, “सध्या मुख्यमंत्र्यांच्या ‘सघन स्वच्छता’ मोहिमेचा एक भाग म्हणून सर्व महापालिका प्रभागांमध्ये स्थानिक मोहीम राबवली जात आहे. यासाठी, फूटपाथ स्वच्छ राहतील याची खात्री करण्यासाठी आम्ही लहान भोजनालये आणि विक्रेते रस्त्याच्या कडेला हटवत आहोत. ही मोहीम डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यापासून सुरू आहे.