नवी दिल्ली : श्रीरामलला प्राणप्रतिष्ठेचे एबीसी, बीबीसी, सीएनएन आणि अल जझीरासह अन्य प्रसारमाध्यमांनी एकांगी वार्तांकन केले आहे. त्यामुळे त्यांनी हिंदूंची माफी मागावी, अशी मागणी विश्व हिंदू परिषद, अमेरिकेने केली आहे.
अयोध्येतील भव्य मंदिरात २२ जानेवारी रोजी श्रीरामलला प्राणप्रतिष्ठा सोहळा पार पडला. या सोहळ्याचे सीएनएन, बीबीसी, एमएसएनबीसी आणि अल जझीरा या प्रसारमाध्यमांनी अतिशय पक्षपाती वार्तांकन केल्याचा आरोप विश्व हिंदू परिषद, अमेरिका यांनी केला आहे. त्यांनी म्हटले की, हिंदू समुदायाने अयोध्येत मंदिर उभारणीसाठी ५०० वर्षे संयम दाखवला. त्यानंतर २२ रोजी जगभरातील हिंदूंसाठी अतिशय आनंदाचा दिवस होता. मात्र, या प्रसारमाध्यमांनी अतिशय बेजबाबदारपणाचे प्रदर्शन करून हिंदू समुदायावर खोटे आरोप करणारे वार्तांकन केले आहे. हिंदूंविरोधात द्वेष पसरविण्याचा प्रयत्न त्याद्वारे करण्यात आल्याचे विश्व हिंदू परिषद, अमेरिकेचे सरचिटणीस अमिताभ मित्तल यांनी म्हटले आहे.
हिंदूविरोध पसरविल्याबद्दल एबीसी, बीबीसी, सीएनएन, एमएसएनबीसी आणि अल जझिरा यांनी असे पक्षपाती वार्तांकन मागे घ्यावे आणि हिंदूंची माफी मागावी, असे पत्रात नमूद केले आहे. पक्षपाती अहवालाद्वारे खोट्या कथनांचा प्रसार केल्याने समाजविघातक भावनांना खतपाणी मिळत असून शांतताप्रिय, मेहनती आणि योगदान देणाऱ्या हिंदू अमेरिकन समुदायालाही धोका पोहोचतो. त्यामुळे अमेरिकी प्रशासनानेही त्याविरोधात कारवाई करावी, असेही विश्व हिंदू परिषद, अमेरिकेने म्हटले आहे.