आगामी लोकसभा निवडणुकीसाठी महाराष्ट्रातील ४८ पैकी ४५ जागा जिंकण्यासाठी भारतीय जनता पक्षाने आपल्या ‘मिशन ४५’साठी कंबर कसली आहे. तसेच प्रत्येक लोकसभा मतदारसंघात ५१ टक्के मतदान झाले पाहिजे, असा फॉर्म्युलाही भाजपने निश्चित केला आहे. ही ५१ टक्के मतांची लढाई भाजपला जिंकायची आहे. तेव्हा, या ‘मिशन ४५’ अंतर्गत तळागाळातीललोकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न असून, अवघा महाराष्ट्र पिंजून काढणार असल्याची माहिती भाजपचे माजी आमदार नरेंद्र पवार यांनी दै. ‘मुंबई तरुण भारत’ला दिलेल्या विशेष मुलाखतीत दिली. तसेच पवार यांनी त्यांचा राजकीय प्रवास, मतदारसंघातील लोकोपयोगी कामे आणि एकूणच निवडणुकीच्या रणनीतीवर या मुलाखतीतून टाकलेला हा प्रकाश...
विद्यार्थीदशेपासूनच तुम्ही राजकारणात सक्रिय आहात. तेव्हा, राजकारणात तुमचा प्रवेश नेमका कसा झाला? आणि एकूणच त्यावेळेचा अनुभव कसा होता?
विद्यार्थीदशेत राजकारणात जायचे, असे काही मी ठरविले नव्हते. मात्र, लहानपणापासूनच मी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा स्वयंसेवक होतो. इयत्ता पाचवीत असताना संघाच्या नमस्कार मंडळ येथील प्रताप सायं शाखेत मी जात असे. संघाची रूची मला जास्त होती. तिथेच माझ्या मनात समाजकारणाचे बीज रोवले गेले. दहावीच्या परीक्षेपूर्वी एक मार्गदर्शनपर व्याख्यानमाला संघाकडून आयोजित करण्यात आली होती. त्या व्याख्यानमालेला मी हजेरी लावली होती. त्यानंतर अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या माध्यमातून विद्यार्थी परिषद शिबीर, विरंगुळा केंद्र उपक्रम, पावसाळी सहल यांची जबाबदारी माझ्याकडे सोपविण्यात आली.
आग्रा रोडवरील एका अभ्यासवर्गातही मला आमंत्रित केले होते. आग्रा रोडवरील विद्यार्थी परिषदेची जबाबदारी माझ्याकडे सोपविण्यात आली. त्यानंतर कल्याण सहमंत्री, शहरमंत्री असे दायित्व माझ्याकडे आले. विद्यार्थी परिषदेत कार्यरत असताना विविध आंदोलनात मी सक्रिय सहभाग घेतला. मग ते आंदोलन फी वाढीविरोधात असो किंवा अधिवेशन काळातील असो, त्या प्रत्येक आंदोलनात मी सहभाग घेतला.
माझे सिव्हिल इंजिनिअरिंगचे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे पूर्ण वेळ काम करण्याची इच्छा मी वरिष्ठांकडे व्यक्त केली. त्यानंतर दादर, नाशिक आणि काही काळ वनवासी भागातही मी काम पाहिले. महाराष्ट्र प्रदेशमंत्री म्हणूनही मी जबाबदारी पार पाडली. पण, हेच अभाविपचे काम माझ्या राजकारण प्रवेशाचा ‘टर्निंग पॉईंट’ ठरला. येथूनच खर्या अर्थाने माझ्या राजकीय प्रवासाला सुरुवात झाली. त्यानंतर मी कधीही मागे वळून पाहिले नाही.
अन्य क्षेत्रांप्रमाणे राजकारणातही तरुण नेते-कार्यकर्त्यांच्या प्रवासात मार्गदर्शकाची भूमिका महत्त्वाची असते. तेव्हा, तुमच्या प्रारंभीच्या राजकीय कारकिर्दीत लाभलेल्या नेत्यांच्या मार्गदर्शनाविषयी, राजकीय गुरुंविषयी काय सांगाल?
अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे पूर्ण वेळ काम थांबू नये, असे मला अगदी मनापासून वाटत होते. पण, त्याचदरम्यान माझ्या वडिलांना अर्धांगवायूचा झटका आला. घरामध्ये अडचण निर्माण झाल्याने मग स्वत:चे काम सुरू करावे लागले. सिव्हिल इंजिनिअरिंगचे रजिस्ट्रेशन केले. नंतर मग कंत्राटदार म्हणून कामाला सुरुवातही केली. त्यावेळी माझ्याकडे रजिस्ट्रेशनसाठी दीड हजार रुपयेदेखील नव्हते. पण, शिवाजी आव्हाड यांनी मदतीचा हात दिला. त्यातून मग व्यवसायाला सुरुवात केली. व्यवसाय करताना पक्षाची जबाबदारीही चालून आली. विभाग अध्यक्ष, कल्याण शहर सचिव अशा विविध पदांची पक्षाने दिलेली प्रत्येक जबाबदारी प्रामाणिकपणे पूर्ण करण्याचा मी प्रयत्न केला. तत्कालीन सत्ताधार्यांविरोधात अनेक आंदोलने केली. त्यात भाववाढ, ‘एमएसईबी’च्या कार्यालयाची तोडफोड अशा विविध आंदोलनांचा समावेश आहे. त्र्यंबक चव्हाण मला त्यावेळी प्रभागात घेऊन फिरत असे. त्यामुळे संघटना कशी वाढवायची, या सगळ्याचे प्रत्यक्ष धडे मी त्यांच्याकडूनच गिरवले. विनोद तावडे हेसुद्धा माझे राजकीय गुरू आहेत.
अभाविप आणि नंतर भाजपमध्ये तुम्ही विविध पदांवर उल्लेखनीय कामगिरी केली. तेव्हा, या राजकीय प्रवासात नेमक्या कोणकोणत्या जबाबदार्या संघटनेतर्फे तुम्ही निभावल्या? एकूणच तो अनुभव कसा होता?
सिव्हिल इंजिनिअरिंगचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर मी सात वर्षं नोकरी केली. वडिलांच्या तब्येतीचीही यादरम्यान काळजी घेत होतो. त्यावेळी शिवाजी आव्हाड यांनी दिलेली साथ महत्त्वाची ठरली. वॉटर सप्लायर्सचे कामही त्यांनी मिळवून दिले. पण, आव्हाड यांची इच्छा होती की, मी राजकारणात यावे. आधी म्हटल्याप्रमाणे, संघात आणि अभाविपमध्ये असतानाच मला राजकीय पक्षासोबत काम करण्याची संधी मिळाली आणि हळूहळू त्या कामाची मग आवडही निर्माण झाली. जगन्नाथ पाटील, के. आर. जाधव यांसारख्या ज्येष्ठ नेत्यांनी माझ्याकडे कल्याण शहराध्यक्षपदाची जबाबदारी दिली. पारनाका विभागातून पक्षाने मला नगरसेवक पदाचे तिकीटही दिले. अनेक अनुभव व्यक्ती असतानाही पक्षाने मला समोरून हे तिकीट दिले, हे विशेष. खरं तर त्या प्रभागातून निवडून येणे, हे अजिबात सोपे काम नव्हते. पण, भाजपवर प्रेम करणारे नागरिक, संघ परिवार, परिवारातील बँकेचे संचालक, छत्रपती शिक्षण मंडळातील पदाधिकार्यांनी केलेली मदत, यामुळेच मी विजयश्री खेचून आणू शकलो. त्यानंतर कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेत नगरसेवक, स्थायी समिती सदस्य, उपमहापौर अशी विविध पदे भूषवित राजकीय प्रवास आजही सुरुच आहे.
कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेत प्रारंभी नगरसेवक, नंतर उपमहापौर म्हणून तुम्ही स्थानिक पातळीवर केलेल्या विविध लोकोपयोगी कामांविषयी काय सांगाल?
‘घर तिथे रांगोळी’ हे पक्षातर्फे अभियान राबवून आम्ही नागरिकांच्या समस्या जाणून घेण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी नागरिकांच्या तब्बल २४ हजार समस्यांचा पाऊसच पडला होता. या अभियानाला ३० हजार नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. एवढेच नाही, तर सर्वपक्षीय नगरसेवकांनीही या अभियानाला त्यावेळी साथ दिली. या अभियानातून शहरातून विविध प्रश्न मार्गी लागण्यास मदत झाली. कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेत उपमहापौर असताना, एक लाख वृक्ष लागवडीचा संकल्पही केला होता. पण, आम्हाला ६० हजार झाडे लावण्यात यश आले. शहरात आपण मॅरेथॉन स्पर्धादेखील आयोजित केली होती. तिलाही चांगला प्रतिसाद लाभला. त्या स्पर्धेला विनोद तावडे, एकनाथ शिंदे आणि आनंद परांजपे यांनी उपस्थिती लावली होती.
स्थानिक पातळीवर यशस्वी कामगिरीनंतर तुम्हाला कल्याण पश्चिम विधानसभा मतदारसंघातून लोकप्रतिनिधित्व करण्याचीही संधी मिळाली. तेव्हा, आमदार म्हणून मतदारसंघातील कोणकोणते प्रश्न, समस्या तुम्ही मार्गी लावल्या?
कल्याणचा आमदार म्हणून जबाबदारी स्वीकारल्यानंतर भरघोस असा निधी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मिळवून दिला होता. त्यामुळे त्या निधीतून अजूनही या क्षेत्रात विकासकामे सुरू आहेत. तसेच मला बजेटविषयी ज्ञान होते. त्यामुळे कोणता विषय मांडला तर मतदारसंघासाठी प्राधान्याने निधी मिळू शकतो, त्याचा मी अभ्यासही केला होता. त्यामुळे विकासनिधी या मतदारसंघासाठी मिळत गेला. मराठवाड्यातील शेतकरी आत्महत्या करीत होते. शेतकरी अडचणीत असताना पक्षाने अशा शेतकरी कुटुंबातील एकूण १०० जणांचा विवाह सोहळा आयोजित करण्याचे आदेश दिले. त्यानंतर तब्बल ५५१ मुलींची लग्न लावली दिली. ’न भूतो न भविष्यती’ असा सर्वधर्मीय लग्नसोहळा त्यावेळी संपन्न झाला होता. त्या सोहळ्यासाठी राज्याचे विद्यमान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे स्वत: उपस्थित होते.
तसेच ‘सीएसआर’च्या माध्यमातून सात ठिकाणी ‘जलयुक्त शिवार’ उपक्रमही राबविला. डम्पिंग ग्राऊंडची समस्या मांडून विशेष निधी मिळविला. गार्डन, साई उद्यान, नानासाहेब धर्माधिकारी उद्यान, कारभारी उद्यान असे अनेक उद्यान, चौक सुशोभीकरण करण्याचे काम मतदारसंघात केले. कल्याण ते टिटवाळापर्यंतचे सर्व चौकांचे सुशोभीकरण करण्यातही यश आले. नांदप गावाची एकच ग्रामपंचायत होती. ती ग्रामपंचायत दत्तक घेतली होती. तिथेही रस्ता काँक्रिटीकरण केले. नांदप व्यतिरिक्त अनेक ठिकाणच्या रस्त्यांचे काँक्रिटीकरण केले. मैदाने विकसित केली. शाळेच्या प्रयोगशाळा आणि सुरक्षतेसाठी निधी मंजूर करून आणला. या निधीतून अजूनही कामे सुरू आहेत. पालिका क्षेत्रातील अनेक प्रभागांमध्ये समाजमंदिरे उभी राहत आहेत. ही सर्व कामे आम्ही निधी मंजूर करून आणला, त्यातून सुरू आहेत. अनेक कामांचे लोकार्पण लवकरच होणार आहे.
तुम्ही या मतदारसंघाचे विद्यमान आमदार नसूनही नागरिक तुमच्याकडे स्थानिक समस्या घेऊन आवर्जून येतात. तेव्हा, त्यांच्या समस्या तुम्ही कशाप्रकारे मार्गी लावता?
गेल्या चार वर्षांपासून मी आमदार नसलो तरी विकासकामे पूर्वी जशी सुरू होती, तशीच आताही सुरू आहेत. नागरिक त्यांच्या विविध प्रकारच्या अडीअडचणी घेऊन माझ्याकडे येत असतात. त्यांच्या सर्व समस्या सोडविण्याचे काम आम्ही नित्यनेमाने करीत असतो. आमदार निधीतून सुरू असलेल्या विकासकामांच्या उद्घाटनासाठीही नागरिकांकडून आवर्जून आमंत्रित केले जाते. एकूणच मी म्हणेन की, मला पक्षाने खूप काही दिले आहे. ते ऋण फेडण्याचा मी प्रयत्न करीत आहे.
स्थानिक प्रश्नांबरोबरच भाजपच्या भटक्या-विमुक्त आघाडीचे प्रदेश संयोजक म्हणून जबाबदारी पार पडत असताना एकूणच अनुभव कसा होता?
भटक्या-विमुक्त समाजाचे अनेक प्रश्न होते आणि यानिमित्ताने त्यांचे प्रश्न मला अगदी जवळून अनुभवता आले. भटक्या-विमुक्त समाजाच्या समस्यांशी माझा परिचय नव्हता. पण, पक्षाने जबाबदारी दिल्यानंतर या समस्यांची व्याप्ती लक्षात आली. लोकसंख्येच्या बाबतीत सांगायचे तर, अनेक लहान लहान समाज या भटक्या जमातीत मोडतात. पण, त्यांच्या बर्याच समस्या आहेत. त्यांच्याकडे साधे रेशनकार्डदेखील नाही. त्यामुळे त्यांना मोफत धान्याचा लाभ घेता येत नाही. मुलांना शिक्षण नाही. त्यांच्या जन्ममृत्यूची नोंद नाही. परिणामी, हाताला काही ठोस रोजगार नाही आणि मग घरकुल योजनेसाठीही ते अपात्र ठरतात. पोटापाण्यासाठी हा समाज भटकंती करतो. म्हणून त्यांच्याकडे रहिवाशी पुराव्याची वगैरे कुठलीही कागदपत्रे उपलब्ध नाही. अशा या समाजाच्या समस्यांची यादी मोठी आहे. पण, रा. स्व. संघ आणि भाजपच्या माध्यमातून, अनेक जिल्हा आणि तालुक्यांमध्ये फिरून या समाजातील मुलांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यात आम्ही यशस्वी झालो आहोत. तसेच कोल्हापूरमध्ये या समाजातील ‘घरकुल’ योजनेसाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून निधीदेखील मिळवून दिला आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्या वर्षी बाराबलुतेदारांसाठी ‘विश्वकर्मा योजना’ जाहीर केली. सध्या विविध मतदारसंघातील गरजूंपर्यंत या योजनेचा लाभ पोहोचविण्याचे अभियान सुरु आहे. त्याविषयी काय सांगाल?
प्रत्येक विधानसभा क्षेत्रात एक हजार गरजूंना तरी या महत्त्वाकांक्षी योजनेचा लाभ मिळवून द्यायचा आहे. बाराबलुतेदार, अठरा पगडजाती यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे. त्यांना मार्गदर्शन करणे, कमी व्याजदरावर कर्ज उपलब्ध करून दिले जाणार आहे. छोट्या व्यावसायिकांना सक्षम करणे, हा या योजनेमागचा उद्देश आहे. जास्तीत जास्त लोकांना लाभ देण्याचा सरकारचा प्रयत्न आहे.
२०२४ हे वर्ष निवडणुकांचे. आधी लोकसभा आणि नंतर महाराष्ट्राची विधानसभा निवडणूक संपन्न होईल. तेव्हा, निवडणुका लक्षात घेता, पक्ष आणि संघटनात्मक पातळीवर त्यादृष्टीने काय तयारी सुरु आहे?
या निवडणुकीच्या तयारीच्या दृष्टिकोनातून संपूर्ण राज्यात भाजपतर्फे विधानसभा प्रमुख आणि लोकसभा प्रमुख अशी रचना तयार केली आहे. प्रत्येक बूथवर ५१ टक्क्यांचे मतदान झाले पाहिजे, अशी रणनीती तयार केली आहे. प्रत्येक बूथपर्यंत संघटना शक्तीशाली कशी करता येईल, याचीही काळजी घेतली आहे. शक्तीकेंद्र प्रमुख व ‘युवा वॉरियर्स’ किंवा ‘सुपर वॉरियर्स’ अशी पदे दिली आहेत. शक्तीकेंद्र प्रमुखांकडे तीन प्रभाग किंवा बूथ असायचे. त्यांची संख्या आता कमी केली आहे. सक्षम कार्यकर्त्यांची ‘सुपर वॉरियर्स’ म्हणून नेमणूक केली आहे. बूथ स्तरावरही सूक्ष्म नियोजन केले आहे.ही योजना कागदावर नाही, तर प्रत्यक्षात आणण्यासाठी भाजपने कंबर कसली आहे. पक्षाने दिलेले कार्यक्रम ‘मन की बात’, ‘नमो चषक’ प्रत्येक विभागात कसे पार पडतील, याकडे विशेष लक्ष दिले जाते. बूथमधील शेवटच्या नागरिकापर्यंत सरकारची कामे पोहोचवून ५१ टक्क्यांची लढाई लढण्याची तयारी केली आहे. त्यात मित्रपक्षही आमच्यासोबत आहेत.