विश्वगुरू भारताची प्राणप्रतिष्ठा!

    22-Jan-2024
Total Views |
Ayodhya 
 
भारतातील राजकारण, अर्थकारण, मनोरंजन, क्रीडा, अध्यात्म वगैरे जवळपास सर्व क्षेत्रांतील सर्वोच्च व्यक्ती एकाच ठिकाणी एकाच सोहळ्यात एकत्र आल्याचे उदाहरण भारताच्या इतिहासात नाही. पण, सोमवारी अयोध्येत झालेल्या प्रभू रामांच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यात ही गोष्ट प्रत्यक्षात घडली. भारताच्या सर्व भागांतील आणि सर्व क्षेत्रांतील दिग्गज नेते आणि कलाकार या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यास उपस्थित राहिले होते, हीच प्रभू रामांची ताकद आणि प्रभाव...
 
अयोध्येत प्रभू रामांच्या प्राणप्रतिष्ठेच्या कार्याने भारताच्या इतिहासातील एका संघर्षमय अध्यायाची सांगता झाली असली, तरी भारताला विश्वगुरू बनविण्याच्या अधिक व्यापक आणि आश्वासक पर्वाचा तो प्रारंभ ठरणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या कार्यक्रमानंतर केलेल्या ऐतिहासिक भाषणात भारताची यापुढील काळातील दिशा कोणती असेल, त्याचे दिग्दर्शन केले. “कालचक्र आता भारताला विश्वगुरू बनविण्याच्या दिशेने वळले आहे,” असे मोदी यांनी आत्मविश्वासाने सांगितले. अयोध्येत प्रभू रामांच्या भव्य मंदिराची निर्मिती आणि त्यात रामांची प्राणप्रतिष्ठा झाल्याने भारताच्या इतिहासातील एक अध्याय संपुष्टात आला असला तरी, सनातन धर्माचे प्रतीक असलेल्या, भारताने आता नव्या पर्वाचे पान उलटले आहे.
 
अयोध्येतील राम मंदिराचा उद्घाटन आणि प्राणप्रतिष्ठा सोहळा अपेक्षेप्रमाणेच नेत्रदीपक आणि भव्य ठरला. संपूर्ण दगडी बांधकाम असलेले, राम मंदिर ही मन थक्क करणारी तसेच मनाला आश्वस्त करणारी भव्य वास्तू. प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी या वास्तूवर केवळ फुलांची सजावट केली होती. ही सजावट इतकी मनमोहक आणि आकर्षक होती की, त्यामुळे केवळ डोळ्यांचे पारणेच फिटले असे नव्हे, तर या वास्तूचे आंतरिक सौंदर्यही खुलून आले. हे मंदिर भव्य आणि भारदस्त भासले. ‘ना आदि ना अंत’ असलेल्या सनातन धर्माप्रमाणेच हे मंदिरही अनंत काळ उभे राहील, असे वाटत होते. हजारो लोक उपस्थित असतानाही, तेथे कोठेही गर्दी जाणविली नाही की, धक्काबुक्की नाही, इतकी ती वास्तू प्रशस्त. सकाळपासूनच या मंदिरात लगबग सुरू होती आणि मध्यान्ह होण्याआधीच सर्व निमंत्रित स्थानापन्नही झाले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आगमनाची काही काळ प्रतीक्षा करावी लागली; पण या मंदिराच्या उभारणीसाठी लागलेल्या प्रतीक्षेच्या तुलनेत ती काहीच नव्हती.
 
या सोहळ्यानंतर पंतप्रधान मोदी यांनी केलेल्या ऐतिहासिक भाषणात या मंदिराचे मर्म समजावून सांगितले. “आपण आताच त्या गर्भगृहात दैवी चेतनेचा अनुभव घेतला असून, त्यामुळे माझं शरीर अजूनही कंप पावत आहे आणि कंठ अवरुद्ध आहे,” असे सांगून मोदी यांनी या राम मंदिराचे मर्म सांगितले. या प्राणप्रतिष्ठेच्या पूजेत मोदी पूर्णपणे एकचित्त झाले आहेत, हे त्यांना पाहताच दिसून येत होते. त्यांचे सारे लक्ष प्रभू रामांच्या मनमोहक रुपाकडे लागले होते. त्याकडे पाहताना त्यांच्या मनात या मंदिरासाठी झालेल्या प्रदीर्घ संघर्षाच्या किती स्मृती जाग्या झाल्या असतील, त्याची कल्पनाच केलेली बरी. कारण, या कार्यक्रमात साध्वी ऋतंभरा आणि साध्वी उमा भारती यांची भेट झाल्यावर दोघींच्या मनातील या संघर्षाच्या आठवणी अश्रू बनून वाहू लागल्या होत्या. राम जन्मभूमी आंदोलनाशी जोडलेल्या प्रत्येक भारतीयाची आज अशीच अवस्था झाली होती.
 
समस्त हिंदूंचे आराध्य असलेल्या राम, कृष्ण आणि शिव या तीन देवतांची प्रमुख आणि प्राचीन मंदिरे ही शतकानुशतके इस्लामी आक्रमकांच्या अत्याचाराखाली दबली गेली होती. त्यापैकी केवळ प्रभू रामांचे जन्मस्थान आता परकीय जोखडातून पूर्णपणे मुक्त झाले. पण, त्यासाठी हिंदूंना त्यांच्याच देशात किती संघर्ष करावा लागला, किती जणांना आपल्या प्राणांचे बलिदान द्यावे लागले आणि आपल्याच देवाच्या अस्तित्वाचे पुरावेही सादर करावे लागले होते, त्याचे स्मरण केल्यावर मन विषादाने भरून जाते.
 
कारण, हा संघर्ष परक्या धर्मांधांशी जसा होता, तसाच तो स्वकीयांशीही होता. काही हिंदूच ही जन्मभूमी परकी आक्रमणातून मुक्त करण्याच्या प्रयत्नांमध्ये अडथळे आणीत होते, हे पाहिल्यावर संतापापेक्षा विषाद आणि खेदाच्या भावनेने मन भरून जात असे. केवळ मूठभर मतांसाठी स्वकीय आणि स्वधर्माशी द्रोह करणार्या या लोकांनी तर गोळीबार करून शेकडो कारसेवकांचे प्राण घेण्यासही मागेपुढे पाहिले नव्हते. पण, परमेश्वरावर अढळ श्रद्धा असलेल्या, हिंदूंनी चिवटपणे हा लढा सुरू ठेवला आणि अखेरीस रामजन्मभूमी मुक्त झाली.
 
प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानंतर पंतप्रधान मोदी यांनी आपल्या भाषणात “आजचा दिवस ही कॅलेंडरवरील केवळ तारीख नसून, तो नव्या कालचक्राचा आरंभ आहे,” असे सांगितले. ते म्हणाले की, “गुलामगिरीच्या मानसिकतेतून बाहेर पडणार्या या राष्ट्राला या मंदिराकडून उमेद मिळाली आहे. हे मंदिर भारतीय समाजाच्या संयमाचे, शांततेचे आणि परस्पर सदभावाचे प्रतीक आहे. भारत आता नव्या सृजनाच्या दिशेने वाटचाल करू लागणार आहे. आजचे हे मंदिर हे न्यायालयीन प्रक्रियेचे पालन करून उभे राहिले असून, रामाला न्याय मिळाला आहे,” असे ते म्हणाले. गेल्या काही दिवसांत मोदी यांनी दक्षिण भारतातील राम मंदिरांना भेटी दिल्या. त्यानंतर शरयूपासून सागरापर्यंत सर्वत्र श्रीरामांचा प्रभाव पसरलेला आहे, हे आपण पाहिल्याचे त्यांनी सांगितले.
 
राम हा भारतीयांचा अंतरात्मा आहे आणि राम हेच आसेतुहिमालयापर्यंतच्या सर्व भारतीयांना जोडणारे सूत्र असल्याचेही त्यांनी प्रतिपादन केले. “हे मंदिर समाजातील सर्व वर्गाला उज्ज्वल भवितव्याच्या मार्गावर नेण्याची प्रेरणा देणारे आहे. ही केवळ रामाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा नसून, भारतीय संस्कृतीवरील विश्वासाचीही प्राणप्रतिष्ठा आहे,” असे सांगून त्यांनी या मंदिराचे वैश्विक स्वरूप स्पष्ट केले. “ही सर्वोच्च मानवी मूल्यांची प्राणप्रतिष्ठा आहे,” असेही त्यांनी सांगितले. आजच्या दिवशी आपल्याला पुढील हजार वर्षांच्या भव्यदिव्य आणि सक्षम भारताचा पाया रचायचा आहे, असे आवाहनही त्यांनी केले. “शबरी मातेप्रमाणेच रामावर असलेला प्रत्येक भारतीयाच्या मनातील अढळ विश्वासच भारताला भव्य आणि सक्षम बनविण्याचा पाया ठरेल,” असे ते म्हणाले. त्यांच्या या शब्दांनी आजच विश्वगुरू भारताचीही प्राणप्रतिष्ठा झाल्याचे जाणवले.