अयोध्या आणि रामकथेचा जगभरातील प्रसार!

    02-Jan-2024
Total Views |
Ramkatha And ayodhya


व्हिएतनाममधील एका राजाने रामायणाच्या रचनाकारांचे मंदिर उभारले आहे. कंबोडियात इ.स बाराव्या शतकात रामायणाचा अभ्यास सुरु झाला होता. रामायणाची सगळ्यात जुनी प्रत नेपाळमध्ये आहे. मला वाटतं ह्यातील काही गोष्टी आपल्याला माहिती असतील आणि काही नाही. पण अयोध्या , रामायण आणि रामकथा हा भारतीयांचा जिव्हाळ्याचा विषय. पण रामकथा आणि अयोध्या दोन्ही जगाच्या पाठीवर अनेक देशांमध्ये पोहचल्या आहे. खरतर भारतीय व्यापारी, प्रवासी, तत्त्वज्ञान प्रसारक यांच्यामुळे रामकथा आणि अयोध्या हा विषय जगात दूरवर पोहचला. भारताबाहेर एवढ्या व्यापक भागात, बहुधा त्याकाळात दोन अडीज हजार वर्षापुर्वी ज्ञात असलेल्या जगाच्या अर्ध्यापेक्षा अधिक भागात रामकथा पसरलेली आहे.

चीन, जपान, कंबोडिया , थायलंड, व्हिएतनाम, लाओस, मलेशिया, इंडोनेशिया, मंगोलिया, कोरिया, नेपाळ, तिबेट, अफगाणिस्थान, इराण, झाक, तुर्कस्तान या देशांमध्ये रामायण व रामकथेचे अवशेष आजही सापडतात. त्याशिवाय रशिया, आफ्रिका, दक्षिण अमेरिका आणि युरोपच्या वेगवगेळ्या भागातही रामायणाशी संबंधित काही ना काही अवशेष सापडतात. आजदेखील आशियातले किमान चौदा ते सोळा देश व त्याहीपेक्षा अधिक भाषांमध्ये नेपाळी, तिबेटी, बर्मी,चिनी, जपानी, अफगाणी, तसेच सध्याच्या चीनमध्ये असलेल्या एका भागाची खोतानी ही भाषा, उर्दू, फार्सी, अरबी, कोरियन, मलेशियन, इंडोनेशियन, सिंहली इत्यादी भाषांमध्ये रामकथा अभिमानाने सांगितली जाते.
वाल्मीकी रामायणाचा उल्लेख असलेला सर्वात जुना शिलालेख आजच्या व्हिएतनाममध्ये म्हणजे पुर्वीच्या चम्पामध्ये सापडला असून तो इ.स. तिसऱ्या शतकातला आहे. इ.स. ६५३ ते ६७८ ह्या काळात व्हिएतनामवर राज्य करणारा राजा प्रकाशधर्मन् याने तर रामायणाचे रचनाकार वाल्मीकी यांचेही मंदिर उभारले होते. जगप्रसिद्ध अशा अंगकोर वट ह्या विशाल मंदिर परिसरात संपूर्ण रामकथा कोरलेली आहे. एकूण ४०० एकरांवर पसरलेल्या, कंबोडियातील ह्या मंदिर परिसराची उभारणी इसवी सनाच्या बाराव्या शतकाच्या सुरुवातीला झाली होती तर, कंबोडियाच्या एका मंदिरात इ.स.च्या पाचव्या शतकात रामायणाचा नित्य पाठ सुरू झाला होता असे उल्लेख सापडतात. अनेक दक्षिणपूर्व आशियाई देशांमध्ये रामायणाच्या नित्य पठणाची प्रथा रूढ झाली होती.
 
 कोणत्याही ग्रंथाच्या नित्य पाठाची अथवा पारायणाची प्रथा जेव्हा सुरु होते. तेव्हा त्या ग्रंथाला धर्मग्रंथाचा दर्जा प्राप्त झालेला असतो. वाल्मिकी रामायणाची सध्या उपलब्ध असलेली जगातील सर्वात जुनी प्रत नेपाळमध्ये असून ती इ.स १०२० मधील आहे. ही प्रत नेपाळमधील काठमांडू येथील नेहरू ताम्रपत्र संग्रहालयात उपलब्ध आहे. ही प्रत ७५० ते ७७५ वर्ष जुनी आहे. ही प्रत १६ ताम्रपत्रांवर लिहिली आहे. प्रत्येक ताम्रपत्राची लांबी सुमारे २५ सेंटीमीटर आणि रुंदी सुमारे १० सेंटीमीटर आहे.ही प्रत संस्कृत भाषेत लिहिली आहे आणि तिला "रामायण महाभारत ताम्रपत्र" असे म्हणतात. ही प्रत रामायण आणि महाभारत या दोन्ही महाकाव्यांचा समावेश करते. रामायणाच्या १२ अध्याय आणि महाभारताच्या २४ अध्याय या प्रतीत समाविष्ट आहेत. तसेच नेपाळी भाषेत रामायणाची अनेक रूपांतरे झालेली असून त्यापैकी पं. सोमनाथ सिग्दल यांनी इ.स १८४८ मध्ये लिहिलेले 'आदर्श राघव' आणि भानुभक्त आचार्य यांनी इ.स.१८८४-८९ मध्ये लिहलेले नेपाली रामायण ह्या सर्वात अलीकडच्या काव्यरचना आहेत.

दरम्यान तिबेटमध्ये आठव्या शतकापासून रामायणाच्या प्रती सापडल्या आहेत. चीनमधून भारतात येजा करण्याचा मार्ग तिबेटमधूनच होता. भारतात आलेल्या चिनी प्रवाशांनी परत जाताना आपल्याबरोबर नेलेल्या भारतीय ग्रंथांच्या नकला तिबेटमध्ये केल्या गेल्या असे दिसते. तिबेटी लेखकांनी केलेले रामायणावर आधारित लेखनही मोठ्या प्रमाणावर उपलब्ध आहे. सा-सक्य पंडिता नामक लेखकाने इ.स. ११८२-१२५१ मध्ये तिबेटी भाषेत लिहिलेले रामायण हे वाल्मिकी रामायणाचे बहुतांशी प्रामाणिक रुपांतर मानले जाते.ह्या तिबेटी ग्रंथाचा अनुवाद नंतर मंगोलियन भाषेत झाला व त्याच्या माध्यमातून रामकथा मंगोलियात पोचली." ह्याच तिबेटी रामकथेचे रूपांतर 'खोतानी रामायणा'त देखील झाले आहे, ह्यांचे संदर्भ ayodhya beyond adduced evidence (अयोध्या बियोड एड्यूस्ड एविडेंस ) ह्या किशोर कुणाल ह्यांच्या पुस्तकात आढळतात.

तसेच ह्या पुस्तकात दिलेल्या माहितीनुसार, ब्रह्मदेशातली म्हणजेच आताच्या म्यानमारमधील रामायणाची परंपरा किमान हजार वर्ष जुनी आहे. ब्रह्मी राजा क्यानसित्था ह्यांचा इ.स.१०८४-१११३ मधला स्थानिक 'मोन' भाषेतला एक शिलालेख सापडला असून त्यात त्या राजाने 'पूर्वजन्मात आपण रामाचा नातेवाईक होतो' असा दावा केला आहे. साधारण इ.स.च्या अकराव्या शतकापासून ब्रह्मदेशातील अनेक आख्यानांमध्ये रामायणातील विविध व्यक्तिमत्त्वांचे उल्लेख सापडतात. असे असले तरी त्या देशात संपूर्ण रामायण लिखित स्वरूपात यायला मात्र सतरावे शतक उजाडले. सतराव्या शतकाच्या प्रारंभी 'रामवत्तू' ह्या ग्रंथाच्या माध्यमातून संपूर्ण रामकथा ब्रह्मदेशाच्या स्थानिक भाषेत अनुवादित झाली. ब्रह्मदेशात सापडणाऱ्या सर्व रामायणविषयक साहित्यावर बौद्ध तत्त्वज्ञानाचा पगडा आहे, असे अयोध्या ह्या पुस्तकात संदर्भ देताना माधव भांडारी सांगतात.

तसेच इ.स.च्या दहाव्या शतकाच्या पूर्वार्धात जावानीज भाषेत लिहिले गेलेले 'रामायण काकावीन' हे आजही, एक हजार वर्षानंतरही इंडोनेशियातील सर्वाधिक लोकप्रिय काव्य आहे. काहीजणांच्या मतानुसार हे महाकाव्य इंडोनेशियन कवी योगेश्वर याने लिहिलेले आहे. हे काव्य वाल्मीकी रामायणावर आधारित असून कवीने मुळाबर हुकूम रुपांतर करण्याचा प्रयत्न केलेला दिसतो. त्याचबरोबर कंबोडियामध्ये आपल्या रामलीलेसारखा 'रामकेर्ती- रामकीर्ती हा लोकनाट्याचा प्रकार इ.स.च्या पहिल्या शतकात अस्तित्वात आला. कंबोडियाच्याच ख्मेर बोलीतील 'राम केर - रामाची ख्याती' ही एक महत्त्वाची रचना असून ती इ.स.च्या सोळाव्या किंवा सतराव्या शतकात लिहिली गेली. मलेशियाच्या मलव ह्या बोलीमध्ये हिकायत सेरीरामा' ह्या नावाने साधारणतः इ.स.च्या तेराव्या शतकात रामायणाचा अनुवाद झाला. अगदी दूरवरच्या जपानमध्येसुद्धा इ.स.च्या बाराव्या शतकात 'होबुत्सुसा' ह्या संग्रहात रामकथा संक्षिप्त रूपात समाविष्ट झाली होती.

दरम्यान कोरियामधील राजवंश अयोध्येच्या राजवंशाशी आपला रक्ताचा नातेसंबंध असल्याचे आजही अभिमानाने सांगतो.'सुरीरला' नामक अयोध्येच्या एक राजकन्येचा विवाह कोरियाचा राजा किम सुरो याच्याशी इ.स.४८ मध्ये झाला होता. विवाहानंतर तिने हिओ वांग को (Heo Hwang-Ko) हे नाव धरण केले. राजा किम सुरो आणि महाराणी हिओ ह्या दोघानांही कोरियाच्या इतिहासात फार महत्त्वाचे स्थान असून आजही त्यांची नावे सन्मानाने घेतली जातात. सन २००० मध्ये कोरिया सरकारने पुढाकार घेऊन अयोध्येत तिचे स्मारक उभे केले आहे.तसेच थायलंडमध्ये साधारण इ.स.च्या दहाव्या शतकाच्या सुरुवातीला 'रामाकीइन - रामकीती' ह्या काव्याची रचना सयामचे म्हणजे थायलंडचे तेव्हाचे राजे राम (पहिला) यांनी केली. थायलंडचे राजे स्वतःला 'राम' हे बिरुद लावत आले आहेत. इ.स.च्या १४व्या शतकामध्ये यु थॉग (संस्कृतमध्ये उतुंग) हा थायलंडचा राजा होता. हा राजा बौद्ध धर्मीय होता तरी तो स्वतःला 'सूर्यवंशी' पर्यायाने 'रामाचा वंशज' म्हणवत असे.

 इ.स.१३५०मध्ये त्याने आपल्या राजधानीचे नाव बदलून 'अयोध्या' केले. एवढेच नाही तर त्याने आपले स्वतःचे नावदेखील बदलले व 'रामातिबोध' हे नवे नाव धरण केले. त्याच्या घराण्याने चार शतके राज्य केले. थायलंडचे राजे आजसुद्धा आपल्या नावामागे 'राम' ही उपाधी वापरतात. त्यामुळे राजे अदुल्यबोल ('अतुल्यबल') हे '१०वे राम' म्हणून ओळखले जातात. थायलंड व इंडोनेशिया या दोन देशांमध्ये 'अयोध्या' नावाशी साधर्म्य किंवा संबंध सांगणारी शहरे आजही उभी आहेत. इंडोनेशियाच्याच बाली बेटांवरसुद्धा रामकथा आजही अभिमानाने सादर केली जाते. त्यामुळे पाश्चात्य जगातसुद्धा रामायण आणि रामकथा इ.स. पु काळातच पोहचली होती असे दाखवून देणारे अनेक पुरावे अलीकडच्या काळात समोर येऊ लागले आहेत. त्यामुळे रामकथेचा जगातील प्रसार हा विषय सखोल अभ्यासाचा चिंतनाचा विषय आहे. तरी तो विषय थोडक्यात आम्ही तुमच्यासमोर मांडण्याचा प्रत्यन केला.