दृष्टिहीन श्रेयाची डोळस रामभक्ती

    19-Jan-2024
Total Views |
 

ram shreya dolas

ती बघू शकत नाही, तरी प्रभू श्रीरामांप्रति असलेल्या श्रद्धेमुळे तिने रामाचे सुश्राव्य गीत गायिले आहे. अशा जन्मतः अंध असलेल्या श्रेया शिंपी या हरहुन्नरी विद्यार्थिनीबद्दल...
 
‘श्रेयांसि बहु विघ्नाऩि।’ अर्थात चांगल्या कामांमध्ये अनेक विघ्ने आली, तरी न डगमगता उभे राहायचे. याच जिद्दीने उभी राहिलेली, अंध विद्यार्थिनी श्रेया राहुल शिंपी गायन कला आणि अभ्यासातही अव्वल. ठाण्यातील पाचपाखाडी, टेकडी बंगला येथील अष्टविनायक दर्शन सोसायटीत राहणारे राहुल आणि स्वाती शिंपी या दाम्पत्याची श्रेया ही एकुलती एक मुलगी. श्रेयाचा जन्म दि. ८ डिसेंबर २०१२ रोजी एक्स्ट्रा प्री-मॅच्युरिटीमुळे झाला. श्रेया ही साडेपाच महिन्यांतली असून, तिचं जन्मतः वजन ६०० ग्रॅम होते. त्यामुळे डॉक्टरांनी तिची शाश्वतीच दिली नव्हती. सहा दिवस व्हेंटिलेटरवर ठेवल्यामुळे, डोळ्यावर ताण येऊन, तिच्या डोळ्याचा पडदा खेचला गेला. जन्म झाल्यापासून तीन महिने ती देखरेखीखाली होती. त्यावेळेस बरेच उपचार झाले; पण तिच्या डोळ्यांचे डिटॅचमेंट थांबले नाही. पुढे शस्त्रक्रियेसाठी चेन्नईला पाठवून, तेथे श्रेयाच्या तीन शस्त्रक्रिया झाल्या. साधारणतः शस्त्रक्रियेच्या वेळेला तिचे वजन १ हजार, १०० ग्रॅम होते. पण, एक्स्ट्रा प्री-मॅच्युरिटीमुळे शस्त्रक्रिया यशस्वी झाली नाही. त्यामुळे तिला पूर्ण अंधत्व आले.
 
डोळ्यांची समस्या तर होतीच; पण इतरही तिच्या बर्‍याच अडचणी होत्या. शरीर संवेदनाहीन बनून हात-पाय घट्ट झाल्यामुळे, तिला चालताही येत नव्हते. तब्बल पाच वर्षे फिजिओथेरपी तसेच इतर उपचार केले. ईश्वर कृपेने सर्व व्याधींवर मात करून, श्रेया उभी तर राहिली. पण, दृष्टिहीन बनल्याने आयुष्य अंधकारमय बनले. अखेर वयाच्या तिसर्‍या वर्षांपासूनच पालकांनी तिचे ब्रेल शिक्षण केल्यामुळे, तिला ब्रेलवर लिहिता-वाचता येऊ लागले. किंबहुना, आता ती लॅपटॉपही वापरते. सध्या ती नियमित शाळेमध्ये इयत्ता पाचवीत शिकत असून, गेले चार वर्षं ती शाळेत पहिला क्रमांक मिळवतेय. वयाच्या पाचव्या वर्षांपासूनच तिला गाण्याची आवड निर्माण झाली. श्रेयाचे आजोबा घरच्या घरी हार्मोनियम, बासरी वाजवायचे एवढाच काय तो कलेचा वारसा शिंपी घराण्यात होता. अनुवांशिकता म्हणा अथवा अन्य काही चमत्कार, श्रेया बालपणापासूनच संगीत आणि गायन कलेत पारंगत होत गेली. तिला गाणी गायला, ऐकायला आवडायची. मग हळूहळू ती सोसायटीच्या सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये भाग घेऊ लागली.
 
’कोरोना’ काळात घरातच असल्याने, तिला गाण्याचा उत्तम सराव करता आला. संगीताचे धडे गिरवत, शास्त्रीय संगीताच्या दोन परीक्षा विशेष श्रेणीमध्ये उत्तीर्ण केल्या आणि आता संगीताच्या तिसर्‍या परीक्षेलाही ती बसली आहे. की-बोर्ड वाजवायला ती स्वतःच शिकली, तयार असलेले कोणतेही गाणे ती स्वतः की-बोर्डवर वाजवते. कोणत्याही गाण्याची किंवा कराओके ट्रॅकची ती स्केल ओळखते, जे की खूप कठीण असते. तिला ही ईश्वरीय देणगीच आहे. ‘चिन्मय मिशन ठाणे’ यांच्यातर्फे आयोजित केलेल्या स्पर्धेत तिला दरवर्षी पारितोषिक मिळाले. गाण्यासोबतच ती भगवद्गीता पठणसुद्धा करते. गेली पाच वर्षे गीतेच्या प्रत्येक स्पर्धेमध्ये तिने क्रमांक मिळवला आहे. यावर्षी गीता पठणाच्या महाराष्ट्र झोनल स्पर्धेत तिला द्वितीय क्रमांक, ‘ठाणे आयडॉल-२०२३’, ‘व्हाईस ऑफ ठाणेकर’ स्पर्धेचे उपविजेतेपद तिनेच पटकावले.
 
जन्मतः अंध असली, तरी प्रभू श्रीरामाप्रति श्रेयाची भक्ती मात्र डोळस आहे. तिला अयोध्येतील प्रभू श्रीरामांच्या प्राणप्रतिष्ठापनेला जाण्याचा योग आला नसला, तरी आपली भक्ती व्यक्त करण्यासाठी तिने चक्क रामनामाचे गाणे गाऊन, रसिक भाविकांचे लक्ष वेधले आहे. तिने गायलेले ’बोलो राम राम राम’ हे अनिल वैती यांनी संगीतबद्ध केलेले गीत अयोध्येतील प्रभू श्रीरामांच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी अर्पण केल्याचे श्रेया सांगते. दृष्टिहीन असली तरी श्रेया स्वावलंबी आहे. अभ्यासासोबतच ती आपली सर्व कामे स्वतःच करते. श्रेयाने आजपर्यंत तब्बल २०० गाणी गायली आहेत.
 
श्रेया शास्त्रीय संगीतासाठीही मेहनत घेत आहे. आपल्या गुरूच्या मार्गदर्शनाखाली श्रेयाने शास्त्रीय संगीताचा रियाज नित्यनियमाने सुरू ठेवला आहे. आई स्वाती आणि वडील राहुल यांच्या मोलाच्या साथीने श्रेयाने आजवर अनेक महत्त्वाचे टप्पे गाठले. छोट्या पडद्यावरील मालिकांमध्ये तसेच अनेक कार्यक्रमांत श्रेयाला विशेष आमंत्रण देण्यात येते. ’सोनी टीव्ही’वरील ’बडे अच्छे लगते हे’ या मालिकेच्या संगीत समारंभात तर श्रेयाने ’इंडियन आयडॉल’च्या विजेत्यांसोबत गाणं सादर केल्याचे तिचे पालक सांगतात. गानसम्राज्ञी लतादीदींची सर्व गाणी ती आवडीने गाते. श्रेयाला पुढे मोठे गायिका आणि संगीतकार बनायचे आहे. प्रसिद्ध गायिका श्रेया घोषाल यांना भेटण्याची इच्छा आहे.
 
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि इतर नेत्यांसोबत ठाण्यातील दिव्यांगस्नेही उद्यानाच्या उद्घाटन समारंभाचा श्रेया भाग होती. आपल्या समवयस्क पिढीला संदेश देताना श्रेया डोळस उपदेश करते. ”मला अंधत्वामुळे जीवनात काही अडथळा आला नाही. एखाद्या गोष्टीबद्दल रडत बसण्यापेक्षा त्यावर मात करून पुढे जायला हवे,” असे ती सांगते. अयोध्याभेटीची आस लागलेल्या श्रेयाने निमंत्रण मिळाल्यास, रामाच्या दर्शनासाठी जाण्याची इच्छादेखील व्यक्त केली. अयोध्या वारीसह भविष्यात उत्तम गायिका बनण्यासाठी श्रेयाला दै. ’मुंबई तरूण भारत’कडून मनःपूर्वक शुभेच्छा!
(अधिक माहितीसाठी संपर्क- ९९२००१८२२३)
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.