जसजशी राममंदिराच्या लोकार्पणाची पवित्र घटिका समीप येत आहे, तसतसे काँग्रेससह ‘इंडी’ आघाडीतील पक्षांच्या पायाखालची वाळू सरकताना दिसते. ठाकरे आणि राऊत हे महाराष्ट्रातील बेताल बडबडेही त्याला अपवाद नाही. पण, प्रभू श्रीरामांचा, राममंदिराचा आणि आता कारसेवकांच्या बलिदानाला अपमानित करणार्या या राजकीय पक्षांचे मतपेटीतून लंकादहन केल्याशिवाय आता रामभक्त स्वस्थ बसणार नाहीत!
तुका म्हणे ऐशा नरा। मोजुनी माराव्या पैजारा॥अयोध्या येथील श्रीराम मंदिराच्या लोकार्पण सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर देशभरातील तमाम विरोधी पक्ष भाजपविरोधात भूमिका घेताहेत. मात्र, असे करताना त्यांच्याकडून प्रभू श्रीरामाबद्दल अवमानास्पद वक्तव्यांची मालिकाच सुरु दिसते. विशेषतः उद्धव ठाकरे आणि मंडळींनी तर ताल सोडला आहे. तसा तो त्यांनी २०१९ मध्येच सोडला होता. संत तुकाराम महाराजांनी उपरोक्त अभंग लिहिताना, बहुधा ‘उबाठा’चे प्रवक्ते संजय राऊत तसेच उद्धव ठाकरे यांना नजरेसमोर ठेवूनच केली होती की काय, असा प्रश्न पडावा. १९९० मध्ये उत्तर प्रदेशचे तत्कालीन मुख्यमंत्री मुलायमसिंह यादव यांनी गोळीबार केल्यामुळेच श्रीराम मंदिराचा प्रश्न सोडवण्यात, त्यांनी हातभार लावला आहे, असे ताळतंत्र सुटलेले बेताल वक्तव्य राऊतांनी केले. यापूर्वीही ‘मंदिर वही बनायेंगे’ असे म्हणत प्रत्यक्षात श्रीराम जन्मभूमीपासून ते चार किमी दूर अंतरावर उभे केले जात असल्याचे धादांत खोटे त्यांनी असेच अगदी रेटून सांगितले होते. मुलायमसिंह यांना श्रेय देणारे, हे विधान धक्कादायक तर आहेच, त्याशिवाय श्रीराम मंदिरासाठी ज्या रामसेवकांनी बलिदान दिले, त्यांचा अवमान करणारेही आहे. अयोध्येतील श्रीराम मंदिर सोहळ्यासाठी निमंत्रण न आल्यामुळे उद्धव ठाकरे त्यांच्या उरल्यासुरल्या सोबत्यांसह नाशिक येथील काळाराम मंदिरात त्याच दिवशी भेट देणार आहेत. त्यासाठी मंदिराशी काहीएक संबंध नसताना राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना निमंत्रण देण्याचा उद्दामपणादेखील उद्धव यांनी केला.
काँग्रेसप्रणित ‘इंडी’ आघाडीतील २८ पक्षांनी या सोहळ्यासंबंधी एकच एक भूमिका घेतली आहे, ती म्हणजे भाजपला विरोध. देशातील एकाही राजकीय पक्षाला अयोध्येतील या भव्यदिव्य, ऐतिहासिक सोहळ्याचे श्रेय घेता येत नाही. म्हणूनच त्यांनी अतिशय खालच्या पातळीवर जात, अयोध्या येथील मंदिर तसेच भाजपविरोधात भूमिका घेतलेली दिसते. द्रमुकच्या स्टॅलिन यांनी म्हणूनच ‘सनातन’ धर्माला संपविण्याची भाषा केली, तर संविधानाच्या रक्षणसाठी कारसेवकांवर गोळीबार केला, असे तर्कट सप नेत्यांनी मांडले. श्रीराम मंदिराच्या लोकार्पणाचा मुहूर्त जसजसा जवळ येऊन ठेपला आहे, तसतसा या हिंदूद्वेष्ट्या मंडळींचा तोलही ढळू लागला आहे. देशात सर्वत्र ‘जय श्रीराम’चे नारे उत्स्फूर्तपणे दिले जात आहेत. घराघरातून, गावागातून ‘राम आयेंगे’ ही भावना वाढीस लागलेली दिसते. प्रभू श्रीरामांच्या स्वागतासाठी तोरणे उभारली जात आहेत. अतिशय पवित्र असे वातावरण देशभरात असताना, काँग्रेस आणि त्याच्या दावणीला बांधलेले उद्धव ठाकरे यांच्यासारखे नेते श्रीरामविरोधी भावना व्यक्त करण्यात धन्यता मानतात, इतका हा संकुचितपणा! उद्धव ठाकरे आणि गटाचा ताळतंत्र सुटला आहे, हे कितीही मान्य केले, तरी त्यांच्याकडून जी काही वक्तव्ये केली जात आहेत, ती म्हणजे लाजलज्जा या ज्या काही समाजमान्य रिती आहेत, त्या पूर्णपणे सोडल्याचेच लक्षण. लौकिकार्थाने ती त्यांनी २०१९ मध्येच सोडून दिली, म्हणूनच सोनिया-राहुल यांच्या चरणी लोटांगण घालत, स्वतःची मुख्यमंत्रिपदी वर्णी लावण्यासाठी काँग्रेस-राष्ट्रवादी यांच्याबरोबरचे आघाडी सरकार त्यांनी स्थापन केले. महाराष्ट्रातील जनतेने दिलेला स्पष्ट जनादेश नाकारत, त्यांनी केवळ स्वार्थासाठी काँग्रेसचे पाय धरले. काँग्रेसने स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याविरोधात वक्तव्य केल्यानंतरही, सत्तेच्या लाचारीतून त्यांनी त्याविरोधात अवाक्षरही उच्चारले नाही. आपण हिंदुत्व सोडले नाही, असे वारंवार म्हणणार्या उद्धव ठाकरे यांना पालघर येथे दोन साधूंची जमावाने केलेली हत्या दिसून आली नाही. एवढी ही सत्तांधता!
उद्धव ठाकरे यांच्या तीन वर्षांच्या मुख्यमंत्रिपदाच्या कालावधीत ते केवळ दोनदाच मंत्रालयात गेले, यावरून त्यांना जनहिताची किती पर्वा होती, हे दिसून येते. ‘मातोश्री’ म्हणजे मुंबई, ‘कलानगर’ म्हणजे महाराष्ट्र अशी ज्यांची समजूत होती, त्या उद्धव ठाकरेंनी म्हणूनच साथरोगाच्या काळात महाराष्ट्रातील जनतेला वार्यावर सोडले. ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ हे त्यांचे धोरण राहिले. यातूनच गैरव्यवहारांना चालना मिळाली. आदित्य ठाकरे यांचे निकटवर्तीय, संजय राऊत यांचे स्नेही यांच्यावर त्या बदल्यात खटले दाखल होताहेत. भाजपविरोधातील ही सगळी मळमळ म्हणूनच व्यक्त होत आहे का? उद्धव ठाकरे यांच्या पूर्वपरवानगीशिवाय असा कोणताही गैरव्यवहार करणे, उबाठातील कोणाला करणे शक्य होते का? आमदार अपात्रता प्रकरणात उद्धव यांनी पक्षाची घटनाच सादर न केल्यामुळे, विधानसभा अध्यक्षांनी शिवसेनेच्या आमदारांना अपात्र ठरवण्याचा निर्णय घेतला गेला नाही. कायदेशीर बाबींची पूर्तता करण्यास ठाकरे गटाला अपयश आले असताना, त्यांनी ‘महापत्रकार परिषद’ नावाने तमाशा मांडला. ज्यांना न्यायालयीन यंत्रणेत ‘उबाठा’ गटाची बाजू मांडण्यात अपयश आले, त्यांनाच पत्रकार परिषदेच्या नावाखाली माध्यमांना हाताशी धरत, जनतेची दिशाभूल करण्यासाठी बोलते करण्यात आले. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी लगेचच कायदेशीर बाजू स्पष्ट करत, उद्धव ठाकरे यांना सणसणीत चपराक लगावली, हा भाग वेगळा.
महाराष्ट्रात भाजप-शिवसेना-राष्ट्रवादी असे महायुती सरकार सत्तेत आहे. केंद्र सरकार म्हणूनच महाराष्ट्रातील प्रकल्प मार्गी लावत आहे. मुख्यमंत्री स्वतः दावोस येथे जात विदेशातून विक्रमी गुंतवणूक महाराष्ट्रात यावी, यासाठी प्रयत्न करताहेत. मात्र, त्यालाही उद्धव ठाकरे आणि मंडळींचा आक्षेप. त्या विरोधातही त्यांनी बेताल बडबड सुरू ठेवली. पंतप्रधान मोदी म्हणूनच प्रकल्पांचे उद्घाटन करण्यासाठी तसेच भूमिपूजन करण्यासाठी राज्यात येत आहेत. पंतप्रधान मोदी यांनी उद्धव ठाकरेंचा धसका घेतला आहे, असे हास्यास्पद विधान राऊत यांनी केले, तर त्यात आश्चर्य वाटत नाही. सोमवारी श्रीराम मंदिराचे लोकार्पण होत आहे. येत्या दोन दिवसांत आचरटपणाचा असाच कळस गाठणारी आणखी काही विधाने केली जातील. मात्र, देशातील जनता हे सर्व काही बघत आहे. निवडणुका लांब नाहीत. श्रीरामांचा अवमान करणार्यांचे काय होते, हे जनतेने यापूर्वी वेळोवेळी दाखवून दिले आहेच. भारतीय मतदार मतपेटीतून आपली भावना व्यक्त करतात. श्रीरामांविरोधात जात सनातन धर्माचा अवमान करणार्यांना देशातील मतदार योग्य तो धडा शिकवतील, हे निश्चित!