२०२३ नंतर २०२४ हे वर्षदेखील युद्ध आणि संघर्षाच्या छायेतच सरण्याची शक्यता बळावताना दिसते. रशिया-युक्रेन युद्ध, हमास-इस्रायल संघर्षानंतर आता लाल समुद्रात हौतींचा मालवाहू जहाजांवरील हैदोस. धुमसत्या मध्य-पूर्वेतील ही अशांतता कमी म्हणून की काय, त्यात इराण-पाकिस्तान हल्ला-प्रतिहल्ल्याची ठिणगी पडली. बुधवारी इराणने पाकिस्तानवर मिसाईल हल्ले करून दहशतवादी तळ उद्ध्वस्त केल्यानंतर, गुरुवारी पाकिस्ताननेही प्रतिहल्ला करीत, तोच कित्ता गिरवला. त्यामुळे हा संघर्ष केवळ एवढ्यावर थांबतो की, या ठिणगीचे रुपांतर युद्धज्वरात होते, हे पाहणे महत्त्वाचे.
इराणने बुधवारी पाकिस्तानमधील ‘जैश-अल-अदल’ या दहशतवादी संघटनेच्या तळाला लक्ष्य केले. या हल्ल्यात काही दहशतवादी ठार झाल्याचा दावाही इराणने केला. इराणचा हा पाकिस्तानच्या सार्वभौमत्वावरील हल्ला म्हणून मग गुरुवारी पाकिस्ताननेही इराणमधील बलुच बंडखोरांच्या अड्ड्यांना मिसाईलने बेचिराख केले. या दोन्ही देशांमधील संघर्ष यानिमित्ताने उफाळून आला असला, तरी तो नवीन नाहीच! यापूर्वीही इराण-पाकिस्तान सीमेवर अधूनमधून गोळीबाराच्या वगैरे घटना घडत होत्या. पण, यंदा पहिल्यांदाच थेट एकमेकांच्या हद्दीत मिसाईल डागल्यामुळे, या संघर्षाची तीव्रता वाढलेली दिसते. त्यामुळे या संघर्षामागची नेमकी कारणे समजून घ्यायला हवी.
इराण-पाकिस्तानची सीमा जवळपास ९०६ किमींची. दोन्ही देश इस्लामिक. सुन्नीबहुल पाक आणि इराणमध्ये शिया बहुसंख्याक. सुन्नी-शिया संघर्षाची किनार लाभली असली, तरी दोन्ही देशांचे संबंध कधीही युद्धस्थितीपर्यंत पराकोटीचे ताणले गेले नाहीत. पण, या दोन्ही देशांनी एकमेकांविरोधातील अतिरेकी गटांचे पालनपोषण केले. या गटांना केवळ सहानुभूतीच नव्हे, तर अर्थसाहाय्यापासून ते शस्त्रास्त्रांचा पुरवठाही केला. म्हणजे दोन्ही देश आमनेसामने उभे ठाकले नसले, तरी अशाप्रकारे अतिरेक्यांची ढाल पुढे करत ’प्रॉक्सी वॉर’ सुरूच होते. पाकिस्तानने प्रारंभीपासून हीच नीती केवळ भारताविरोधात नाही, तर इराण, अफगाणिस्तान या शेजार्यांविरोधातही खुबीने वापरली. पण, मग इराणने पाकिस्तानविरोधात हल्ल्याचा नेमका हाच मुहूर्त का निवडला असावा, असा प्रश्न पडणे साहजिकच. त्याचे प्रमुख कारण म्हणजे पाकिस्तानमध्ये सध्या लोकनिर्वाचित सरकार नसून काळजीवाहू सरकार आहे. या सरकारला फार मोठे निर्णय घेणे शक्य नाही. म्हणून दावोसमध्ये इराणचे परराष्ट्र मंत्री आणि पाकिस्तानचे काळजीवाहू पंतप्रधानांची भेट झाल्यानंतर लगोलग हा हल्ला करण्याची हिंमत इराणने दाखवली.
त्यातच पाकिस्तानचे लष्करप्रमुख नुकतेच अमेरिकी दौर्यावरून परतले. त्यामुळे पाकिस्तानची आपल्या कट्टर शत्रू असलेल्या अमेरिकेशी जवळीकही इराणला रुचणारी नाहीच. त्यातच पाकिस्तानने भविष्यात त्यांच्या भूमीचा अथवा सैन्याचा वापर अमेरिकेला इराणविरोधी कारवायांसाठी करायला देऊ नये, असा सज्जड इशारादेखील यानिमित्ताने इराणने पाकला दिलेला दिसतो. आमच्या देशाविरोधात कारवाया करणार्या अतिरेक्यांना तुम्ही संपविणार नसाल, तर आम्हीच त्यांचा खात्मा करू, म्हणूनही इराणने पाकिस्तानला या कारवाईतून दम भरला. त्यातच सध्या अफगाणिस्तानमधील तालिबानी राजवट आणि पाकिस्तानचे संबंधही बिघडलेले. इराण आणि तालिबान हे दोन्ही कट्टर अमेरिकाविरोधक, तर पाकिस्तान हा अमेरिकेच्या ताटाखालचे मांजर. त्यामुळे इराण आणि तालिबानलाही इस्लामिक पाकचा पुळका नाहीच. उलट हा राजकीयदृष्ट्या, आर्थिकदृष्ट्या एक फसलेला देश असून पूर्णपणे हतबल आहे, याची इराण-तालिबानला कल्पना आहेच. त्यात पाकिस्तानात पुढील महिन्यात सार्वत्रिक निवडणुका होऊ घातल्या आहेत.
अशा या पाकमधील अस्थिरतेच्या पार्श्वभूमीवर इराणने हल्ल्याची नामी संधी साधलेली दिसते. या हल्ल्याच्या दोन दिवसांपूर्वी भारताचे परराष्ट्र मंत्री एस. जयशंकरही इराण दौर्यावर होते, हे इथे विशेष उल्लेखनीय! असो. एकीकडे मुस्लीम उम्माच्या एकतेचे गोडवे गायचे आणि दुसरीकडे आपल्याच धर्मबांधवांचे मुडदे पाडायचे, ही इस्लामची पूर्वापार चालत आलेली परंपरा. त्याला शिया-सुन्नी संघर्षही अपवाद नाहीच. त्यामुळे पाकच्या कालच्या इराणवरील प्रतिहल्ल्याने फिट्टंफाट होते की, युद्धसंघर्षाचा नव्याने घाट घातला जातो, ते येणारा काळच ठरवेल!