सांगा कोणता राम खरा आणि वाल्मिकी रामायणच का खरे? मी विचारतोय मी. चालू गेमाडे! काय म्हणता, मी कोण? माझ्या बोलण्याला कुत्राही भीक घालणार नाही? हे बघा असं करू नका, माझ्या मिशांकडे तरी बघा. चारचौघात उठून दिसाव्यात, म्हणून त्या मी ठेवल्यात. त्याचा तरी मान राखा. पुरोगामित्वाचा बुरखा पांघरून बरोबर मी जातीयतेच्या कळपात शिरतो. जाणता राजा, साहेब साहेब म्हणत त्यांची हांजी हांजी करत हजेरी लावतो. तेवढाच पुरस्काराचा रतीब सुरू राहतो. हं! आता काही लोक म्हणतात की, हिंदू धर्म काही ‘समृद्ध अडगळ’ नाही, तर मी आणि माझे अविचारच अडगळ आहेत. पण, काय करणार, त्या अविचारासाठीच तर मला ते लोक जवळ ठेवतात ना? हा पण एक धंदा आहे. गंदा हैं पर धंदा हैं ना! तर ‘इंडिया’चे लोक रामनामात किती गुंग झालेत. पुरोगामित्व निधर्मीपणा सगळे सगळे विसरले. त्यामुळे आता आम्हाला ऑर्डर आली आहे की, रामयणावर आणि रामावरच प्रश्न विचारायचा. हा बघा मी असा पुढे सरसावलोय. वाल्मिकी रामायणच खरे रामायण का समजायचे? वाल्मिकीचा रामच कशामुळे खरा समजायचा? काय म्हणता, आम्ही का इतके तडफडतोय? मग तडफडणारच ना? इतकी वर्षं आम्ही साहित्याच्या नावाखाली असं काही लिहिले की, लोकांना हिंदू असल्याची चुटूपूट वाटावी. सगळे सुखनैव सुरू होते. पण, त्या मोदींच्या राज्यात अयोध्येचा निकाल लागला आणि आम्ही इतके वर्षं दडपून ठेवलेले सगळे बाहेर आले. हिंदुत्व आणि त्या रामनामात कोटी कोटी ‘इंडियन’ गुंग झाले. जनतेला भ्रमित करायलाच हवे. त्यामुळे मी विचारतोय सांगा, वाल्मिकीचा रामच का खरा? तुम्ही लोकांनी मला उत्तर दिले नाही, तर मालकांना वाटेल की, चालू गेमाडेच्या बोलण्याला कुणीच गंभीरतेने घेत नाही. मग आम्हाला ते सोबत ठेवणार नाहीत. ते पुरस्कार, ते सगळीकडचे अध्यक्षस्थान ती ठरवून दिलेली प्रसिद्धी ही सगळे त्यांचेच तर देणं आहे. सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे, पापी पेट का सवाल हैं! त्यामुळे हा चालू गेमाडे तुम्हाला प्रश्न विचारतोय, सांगा वाल्मिकीचे रामायणच खरे का मानायचे? उत्तर द्या, वाद घाला, मला चर्चेत ठेवा. लोकांना भ्रमित होऊ द्या, चालू गेमाडेच्या कधीच नसलेल्या अस्तित्वाचा प्रश्न आहे हा...
समझनेवालो को इशारा...
दावोस येथे ‘विश्व आर्थिक मंच’ (डब्ल्यूईएफ) परिषद सुरू आहे. यामध्ये तेलंगणचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांनी अदानी समूहासोबत करार केला. त्यानुसार अदानी समूह ३६ हजार, ५०० कोटींपेक्षा अधिक गुंतवणूक तेलंगणमध्ये करणार आहे. रेवंत ज्या पक्षाचे मुख्यमंत्री आहेत, त्या काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा राहुल गांधी. पण, त्यांच्या मते तर अदानी समूह चोर आहे, भ्रष्टाचारी आहे. तसेच काँग्रेस सरकार सत्तेत आल्यास, अदानी समूहाची चौकशीसुद्धा करणार आहे. पक्षाचे सर्वेसर्वा अदानीबद्दल असे म्हणत असताना, त्याच पक्षाच्या एका राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी त्याच अदानीसोबत हा करार का करावा? कारण एकच की, राज्याचा विकास व्हायचा असेल, तर भौतिक विकास, दळणवळण, वीज मागणीची पूर्ती, कौशल्य विकास केंद्र आणि स्वयंरोजगार उद्योगधंदे उभे राहायला हवेत. हा चोर, तो अमूक, तो ढमूक असे बोलून तोंडाच्या वाफा दवडून काही होत नाही. राज्याच्या विकासासाठी राज्यात गुंतवणूक करून, राज्याची आर्थिकता उभारणारे उद्योजक हवेत. कर्नाटक असू दे की तेलंगण, या दोन्ही राज्यांत राहुल गांधींचा पक्ष सत्तेत आहे. मात्र, तरीही या दोन्ही राज्यांत गुंतवणूक करावी म्हणून काँग्रेसी नेत्यांनीच अदानींना पायघड्या घातल्या आहेत. त्यांनी या कृतीद्वारे जाहीर केले की, राहुल गांधी यांना काय कळते? तर काही लोक म्हणतात की, अदानी सध्या उद्योग क्षेत्रात तेजीत आहेत. त्यामुळे त्यांचे नाव घेऊन, मोदींविरोधात बोलले की, काहीतरी अर्थपूर्ण वाटाघाटी होऊ शकतील, या आमिषापोटीही राहुल कदाचित अदानींना लक्ष्य करत असतील का? काहीही होऊ शकते? आपल्याकडे नाही का, अंबानींच्या घरासमोर बॉम्ब ठेवला होता. गल्लीबोळात काही समाजकंटक असतात. कुणी गरिबानेही पडलेली भिंत, कोसळलेले छप्पर बांधले की, हे लोक १००-२०० रूपये मागायला हजर होतात. आठवडी बाजारात दहा दहा रूपये वसूल करतात. त्याचे महा महा स्वरूप म्हणजे हे लोक आहेत का? जे देशातल्या मोठ्या उद्योगपतींविरोधात कायमच बोलतात. मात्र, त्याचवेळी त्यांचे हस्तक या उद्योगपतींकडून आपले काम साधून घेत असतात. समझनेवालो को इशारा काफी हैं...
९५९४९६९६३८