रसिका शिंदे-पॉल
मुंबई : ऑफ स्क्रिन मैत्री ही ऑन स्क्रिन किती सुंदर दिसते याची अनेक उदाहरणे आजवर मराठी चित्रपटसृष्टीत पाहिली आहेत. यापैकीच एक म्हणजे अभिनेत्री सई ताम्हणकर आणि अभिनेता सिद्धार्थ चांदेकर. ‘क्लासमेट्स’, ‘वजनदार’ या दोन चित्रपटांत एकत्रित काम केल्यानंतर आता हे दोन्ही अवलिया मित्र ‘श्रीदेवी प्रसन्न’ या चित्रपटातून पहिल्यांदाच लीड कपल म्हणून झळकणार आहेत. विशाल मोढवे दिग्दर्शित ‘श्रीदेवी प्रसन्न’ या चित्रपटाच्या टीमने’ महाएमटीबी’शी खास गप्पा मारल्या. यावेळी सिद्धार्थ चांदेकरने त्याच्या लाडक्या मैत्रिणीच्या काही खास गोष्टी आमच्यासोबत शेअर केल्या.
काय म्हणाला सिद्धार्थ?
“सईसोबत जर का तुम्ही आठवड्याभरापुर्वी डिनर, तिच्या घरी जाऊन भेटून काही पार्टी असा प्लॅन केला असेल तर त्या प्लॅनबद्दल तिला रोज आठवण करुन त्या प्लॅनबद्दल अपडेट करुन घेणं फार महत्वाचं असतं. आणि जेव्हा तो दिवस उजाडतो ज्यादिवशी तुम्ही सईसोबत डिनरला जाणार असला त्या दिवशी खासकरुन सकाळी, दुपारी आणि अगदी भेटायच्या अर्ध्यातासाआधी देखील तिला आठवण करणे गरजेचे आहे. कारण, आपण तयार असू तेव्हाही ती विसरुन आपल्याला हे सांगू शकते की मी विसरले आणि मी दुसऱ्या मिटींगला आले”, अशी पोलखोल सिद्धार्थने सईबद्दल केली. यानंतर सईने मात्र प्रामाणिकपणे मी विसरभोळी असल्याचे मान्य केले.
सई ताम्हणकर आणि सिद्धार्थ चांदेकर यांची प्रमुख भूमिका असलेला ‘श्रीदेवी प्रसन्न’ हा चित्रपट २ फेब्रुवारीला प्रदर्शित होणार आहे. प्रेम, लग्न, संसार अशा विषयांवर भाष्य करणारा हा चित्रपट असून प्रेक्षकांना श्रीदेवी व प्रसन्न यांची अरेंजवाली लव्हस्टोरी बघायला मिळणार आहे. टीप्स मराठी प्रस्तुत या चित्रपटाची निर्मिती कुमार तौरानी यांनी केली आहे. या चित्रपटात संजय मोने, शुभांगी गोखले, समीर खांडेकर, रसिका सुनील, वंदना सरदेसाई, पूजा वानखडे, रमाकांत डायमा, सुलभा आर्या, पल्लवी परांजपे, सिद्धार्थ महाशब्दे, सिद्धार्थ बोडके, जियांश पराडे यांच्याही प्रमुख भूमिका आहेत.