ठाकरे गटाच्या आमदारांना अपात्र करा! शिंदे गटाची हायकोर्टात धाव

    17-Jan-2024
Total Views |

Shinde, Narvekar & Thakceray


मुंबई :
राज्यात सध्या शिवसेना आमदार अपात्रतेचा मुद्दा चर्चेत आहे. १० जानेवारी रोजी कोणालाही अपात्र न करता खरी शिवसेना ही शिंदेंचीच असल्याचा निकाल विधानसभा अध्यक्ष राहूल नार्वेकर यांनी निकाल दिला होता. या निर्णयाविरोधात आता शिंदे गटाने न्यायालयात धाव घेतली आहे. उबाठा गटाच्या आमदारांना अपात्र करण्याची मागणी त्यांनी केली आहे.
 
राहूल नार्वेकरांनी दिलेल्या निर्णयाच्या विरोधात शिंदे गटाने उच्च न्यायालयात याचिका दाखल केली असून उबाठा गटातील व्हिप न मानणाऱ्या १४ आमदारांना अपात्र करण्याची मागणी केली आहे. शिंदे गटाचे प्रतोद भरत गोगावले यांनी मुंबई उच्च न्यायालयात ठाकरे गटाच्या आमदारांविरोधात १३ याचिका दाखल केल्या. याप्रकरणी बुधवारी तातडीची सुनावणी पार पडली. तसेच ८ फेब्रुवारी रोजी पुढील सुनावणी होणार असल्याचे सांगण्यात येत आहे.
 
ठाकरे गटाची घटना दुरूस्ती नियमबाह्य असून ते उलटतपासणीस अनुपस्थित राहिल्याने त्यांचे प्रतिज्ञापत्र रद्द करण्यात आले आहे. शिवसेनेच्या घटनेनुसार राष्ट्रीय कार्यकारीणीकडे अंतिम अधिकार आहेत. शिवसेना प्रमुख कोणालाही पदावरुन काढू शकत नाहीत. त्यामुळे उद्धव ठाकरेंनी घेतलेले निर्णय ग्राह्य धरता येणार नाहीत. भरत गोगावले यांची प्रतोद म्हणुन नियुक्ती योग्यच असून त्यांनी काढलेला व्हीपच योग्य आहे आणि शिंदे गट हीच खरी शिवसेना आहे, असा निर्णय विधानसभा अध्यक्षांनी दिला होता. त्यानंतर ठाकरे गटाने विधानसभा अध्यक्षांच्या निर्णयाविरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली. तसेच दुसरीकडे, ठाकरे गटाच्या आमदारांना अपात्र करण्याबाबत शिंदे गटाने उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे.