नागपूर : राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी प्रभु श्रीरामांबद्दल केलेल्या वादग्रस्त वक्तव्यानंतर आता पुन्हा एक वादग्रस्त वक्तव्य केले आहे. बाबासाहेब आंबेडकरांनी न्यायव्यवस्थेत आरक्षण न देऊन इथल्या ८० टक्के समाजावर अन्याय केला आहे, असे वक्तव्य त्यांनी केले आहे. मंगळवारी नागपूरमध्ये एका कार्यक्रमात ते बोलत होते.
जितेंद्र आव्हाड म्हणाले की, "बाबासाहेब आंबेडकरांनी न्यायपालिकेतही आरक्षण ठेवायला हवं होतं. काहीकाही निर्णय असे येतात ज्यामुळे आपल्याला पटकन कळतं की, यात जातीचा वास येत आहे. न्यायव्यवस्थेकडून हो अपेक्षित नाही. न्यायव्यवस्था ही निपक्षपाती असली पाहिजे, अशी संविधानाची अपेक्षा आहे. पण खरंच असं होतं का? न्यायव्यवस्थेत आरक्षण न देऊन इथल्या ८० टक्के समाजावर बाबासाहेबांनी अन्याय केला," असेही ते म्हणाले आहेत. त्यांच्या या वक्तव्यामुळे ते पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत.