"राम काय खात होते हे बाजूला ठेवा पण, तुम्ही नक्की शेण खात आहात!"
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा घणाघात
15-Jan-2024
Total Views |
मुंबई : राम काय खात होते? हे सर्व बाजूला ठेवा पण, तुम्ही नक्की शेण खाता, हे आता आमच्या लक्षात आले आहे, असा घणाघात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड यांच्यावर नाव न घेता केला आहे. जितेंद्र आव्हाडांनी प्रभु श्रीरामांबद्दल केलेल्या वादग्रस्त वक्तव्याला प्रत्युत्तर देताना उपमुख्यमंत्री फडणवीसांनी त्यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला. रविवारी ठाणे येथे आयोजित राम जन्मभुमी आंदोलनात सहभागी कारसेवकांच्या सन्मानाच्या कार्यक्रमात ते बोलत होते.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, "ठाणे जरी धर्मनगरी असली तरी राम काय खात होते हे सांगणारे इथे काही महाभाग राहतात. राम काय खात होते हे बाजूला ठेवा पण तुम्ही नक्की शेण खात आहात हे आमच्या लक्षात आलं आहे. त्यामुळे अशा शेण खाणाऱ्यांना बाजूला ठेवा आणि राम उत्सव साजरा करा," असेही ते म्हणाले आहेत.
ठाण्यातील घोडबंदर रोडवरील आनंदनगर, स्वस्तिक पार्क समोरील ठाणे मनपा मैदानात श्रीरामजन्मभूमी आंदोलनात सहभागी कारसेवकांचा सन्मान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आला. याठिकाणी रामकथेचा कार्यक्रम भाजपच्या श्वेता शालीनी आणि पवन शर्मा यांनी आयोजित केला होता. यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांच्यासह राम मंदिर विरोधकांवर जोरजार हल्लाबोल केला. या कार्यक्रमाला जगतगुरू दिनेश आचार्य महाराज, प.पु. शशिकांत महाराज, केंद्रीय मंत्री कपील पाटील उपस्थित होते.