विक्रमगडचे मधुकर चिंतू मालकरी हे देव-देश-धर्मासाठी कार्य करतात. त्यांनी धरतरी मातेचे प्रतीक म्हणून मूर्ती बनवली. आणि जनजागृती निर्माण केली. त्यांच्या कार्याचा घेतलेला मागोवा...
आपण आदिवासी आहोत. मूर्तिपूजा मानत नाही. धरतरी मातेचे मंदिर बनवले म्हणजे आदिवासी लोकांचा अपमान केला म्हणत, धमकीसदृश सूचना मधुकर मालकरी यांना केल्या गेल्या. मात्र, मधुकर यांनी या सगळ्यांना सांगितले की, आपण वारली आहोत. आपल्या बापजाद्यांनी वाघ्यादेव, सूर्यादेव लाकडावर कोरून ठेवलेत ना? ते तसे कोरण्याची काय गरज होती, हिरव्या देवाच्या नावाने सलदीमध्ये पूजा करतो ना? का? धरतरी म्हणजे जमीन. ती आपली माता आहे. पण, तिच्या कधी तरी आपण पाया पडतो का? त्यामुळे धरतरी माताचे प्रतीक म्हणून मूर्ती बनवली. येता-जाता हात जोडून, तिचे स्मरण केले, तर बिघडते का? मधुकर यांचे म्हणणे सगळ्यांना पटले. जय रावण म्हणणार्या विरोधकांना बोलायला मुद्दाच उरला नाही. आदिवासी हे हिंदू नाहीतच, असे म्हणत आदिवासी बांधवाना समाजाच्या मूळ प्रवाहापासून तोडू पाहणारे काही लोक आहेत. अशा वेळी मधुकर यांनी देव-देश-धर्म संवर्धनासाठी काम करत आहेत. ‘धरतरी ग्रामोन्नती सेवा संस्थे’चे ते संस्थापक आहेत. संस्थेच्या माध्यमातून ते समाजबांधवाच्या स्वयंरोजगार प्रशिक्षणाचे कार्य करतात.
एकदा मधुकर यांनी रा. स्व. संघाचे सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत यांचे देव-देश-धर्मासाठीच्या मंगल कार्यासंदर्भातले बौद्धिक ऐकले. त्याचा परिणाम असा आहे की, आज मधुकर यांनी देव-देश-धर्म उत्कर्षासाठी समाजबांधवासाठी काम करण्याचे व्रत स्वीकारले. विक्रमगडच्या मालकरी पाड्यातली चिंतू आणि विमलबाई मालकरी यांचे सुपुत्र मधुकर. मालकरी दाम्पत्य काही महिने भातशेती करायचे आणि चार महिने मनोर येथे लेकराबाळांसह वीटभट्टीचे काम करायला जायचे. पहाटे ३ वाजता उठून पूर्ण कुटुंब दर दिवशी दीड हजार विटा बनवायचे. तेव्हा दोन वेळचे पोटापुरते जेवायला मिळे. एकवर्षी मधुकर यांनी ठरवले की, वीटभट्टी कामासाठी जायचे नाही, गावातले दुसरी मुलं जशी शाळा शिकतात, तसे आपणही शिकायचे. ते त्यांच्या मानलेल्या आजीसोबत गावात राहिले. शाळेतल्या टिळक शिक्षकांशी त्यांचे ऋणानुबंध जुळले. टिळक शिक्षक आणि त्यांचा मुलगा तुषार रा. स्व. संघाचे स्वयंसेवक. तुषार यांनी पाड्यात संघाची शाखा लावायला सुरुवात केली. मधुकरही शाखेत जाऊ लागले. ते जरी बाल स्वयंसेवक असले, तरीसुद्धा त्यांच्या कुटुंबातले सगळेच कम्युनिस्ट पक्षाचे सदस्य. इतकेच काय विक्रमगड तालुक्यातले लाल बावट्याचे मुख्य केंद्र ही मधुकर यांच्या वडिलोपार्जित जागेतच होते. त्यामुळे जेव्हा मधुकर यांनी पाड्यात ‘श्रीराम’ नावाची संघशाखा लावायला सुरुवात केली. तेव्हा कम्युनिस्ट पक्षाचे पदाधिकारी हादरले. ते मधुकर यांना सांगू लागले की, ”रा. स्व. संघ आपला नाही.” पण, मधुकर म्हणाले की, ”संघ आपला कसा नाही? शाखेत तर आम्हाला सांगतात, सगळा समाज आपला आहे. आपण सगळ्या समाजासाठी काम करायचे आहे.“
मधुकर यांचे संघकार्यातले सातत्य, देव-धर्म-देशाबद्दलीची निष्ठा कौतुकास्पद होती. मधुकर यांना भेटण्यासाठी एक दिवशी शाळेचे मुख्याध्यापक नाना चंपानेरकर आणि त्यांच्या पत्नी आल्या. विमलबाईंनी साखरेचे पातेलं चुलीवर ठेवलं. साखर जळू लागली. काळ्या पडलेल्या साखरेमध्ये पाणी टाकलं आणि तो चहा उपलब्ध असलेल्या फुटक्या कपातून चंपानेरकर दाम्पत्यांना दिला. मधुकर यांना वाटले, नाना काय म्हणतील. पण, आईशी छान गप्पा मारत, नाना चंपानेरकर आणि त्यांच्या पत्नींनी तो चहा इतक्या आनंदाने प्यायले की, जसे काही अमृत पित आहेत. मुख्याध्यापक चंपोनरकर शिक्षक टिळक यांचे संस्कार मधुकर यांच्यावर होत होते. आठवी ते बारावी मधुकर आणि पाड्यातले इतर मुलं टिळक शिक्षकांच्या घरीच राहायला होते. बारावीनंतर टिळक शिक्षकांनी मधुकर यांचे नाव पाबळ येथील शिक्षण संस्थेत घातले. तिथे मधुकर यांनी ’डिप्लोमा इन बेसिक रूरल टेक्नोलॉजी’ हा अभ्यासक्रम शिकले. तेव्हा आनंद गोसावी नावाच्या शिक्षकांनी मधुकर यांना खूपच धीर दिला. याचदरम्यान गणेश पिंगळे यांच्या माध्यमातून त्यांची चिंचवड येथील ’गुरुकुलम् शिक्षण संस्थे’शी संपर्क आला. वारली समाजामध्ये समस्या नाहीत असे नव्हते; पण गुरुकुलम्च्या माध्यमातून पारधी समाजाची स्थिती पाहून, मधुकर हादरून गेले.
त्यांनी आपल्या शिक्षणाचा उपयोग गुरुकुलम्मधील पारधी विद्यार्थ्यांच्या प्रगतीसाठी करायचा ठरवले. याच काळात त्यांची आई त्यांना तिथे भेटायला आली. आईच्या गळ्यात क्रॉस होता. आईच्या सोबत घरातले सगळेच येशूच्या भजनी लागले होते. हे ऐकून मधुकर पुन्हा पाड्यात परतले.पाड्यातले बहुसंख्य लोक दर रविवारी ५० रूपये खर्चून त्या चर्चमध्ये जायचे. तिथे ५० रूपये दानही करायचे. एकाच घरात एक भाऊ हिंदू आणि दुसरा धर्मांतरित ख्रिस्ती झालेला. दोघांमधे वाद विकोपाला गेलेला, एकी तुटलेली. असे का झाले याचा मधुकर यांनी अभ्यास केला. त्यांना कळले की, समाजाचा धर्म-देव-संस्कृतीवरचा विश्वास ढासळवून, लोकांना धर्मांतरित करण्याचा डाव रचला गेला आहे. मधुकर यांनी गावात तरुणांचे संघटन केले. त्यांना स्वतःच्या पायावर उभे राहण्याचे बळ दिले. धर्मसंस्कार जागृती केली. या सर्व कामांत पत्नी रेखा यांचे सहकार्य होतेच. आज पाड्यात पुन्हा हिरवा देव विराजमान झाला आहे. वाघ्या देवाची पूजा होते. पाडा गुण्यागोविंदाने देव-देश-धर्माचे अधिष्ठान राखत प्रगती करत आहे. देव-देश-धर्मासाठी आयुष्यभर काम करण्याच्या, मधुकर यांच्या संकल्पाला निसर्ग देव नक्कीच भरभरून आशीर्वाद देईल.
योगिता साळवी
९५९४९६९६३८