राहुल गांधीना भारत कधी कळला नाही आणि भारतीयांशी कधी त्यांची नाळ जुळलीही नाही आणि जुळणारही नाही. कारण, शेकडो वर्षांच्या संघर्षानंतर हिंदूच्या प्रभू श्रीरामांविषयी आस्थेला न्याय मिळाला असताना, राहुल गांधी देशात अन्याय होत आहे, हो न्याय हवा म्हणत, आता यात्रा काढणार आहेत. हिंदूंच्या धर्मश्रद्धेला न्याय मिळत असताना, राहुल गांधी यांना ’भारत जोडो’च्या नावाने न्याय मागण्यासाठी फिरतो, असे दाखवणे म्हणजे कोट्यवधी हिंदूंच्या आस्था न्यायाचा अपमानच आहे. मणिपूर ते बंगाल व्हाया मुंबई अशी काहीशी 6 हजार, 700 किमींची यात्रा राहुल करणार आहेत. काँग्रेसमधील हिंदू नेत्यांनी पदाधिकार्यांनी आणि कार्यकर्त्यांनीही अयोध्येच्या रामललांच्या भक्तीत मग्न होण्याऐवजी राहुल यांच्या यात्रेत सहभागी व्हावे, यासाठीच जणू या यात्रेचे आयोजन आहे.कारण, पक्षाचा सर्वेसर्वा नेता येणार म्हटल्यावर, त्याच्या तैनातीत पक्षाला उतरावेच लागणार. ईशान्य भारतातून पुढे पूर्व किनारपट्टीच्या राज्यातून मुंबईकडे यात्रा येईल, तेव्हा त्या-त्या ठिकाणचे स्थानिक उरलेसुरले कार्यकर्ते या यात्रेच्या तयारीला लागलेले असतील. त्यामुळे या काँग्रेसी कार्यकर्त्यांना भलेही ते रामप्रेमी असतील, तरीसुद्धा ‘रामनाम’ घेण्याऐवजी सक्तीने ‘राहुलनाम’ घ्यावे लागणार आहे. आपल्या काँग्रेसी कार्यकर्त्यांनी रामनाम न घेता, मंदिरात रामनामाचा गजर न करता, केवळ आपल्या यात्रेत मग्न राहावे, यासाठी तर राहुल आणि काँग्रेसच्या वरिष्ठांचा हा कट नसेल ना? तसेच अयोध्या राम मंदिर प्राणप्रतिष्ठान सोहळा हा दैवदुर्लभ सोहळा आहे. या सोहळ्याला कसलेही गालबोट लागू नये, असे सगळ्यांना वाटते. याच सोहळ्यादरम्यान राहुल यांनी यात्रेच्या दरम्यान न्याय पाहिजेचा आविर्भाव आणत, गर्दी जमवण्याचा अट्टहास करणे, हा काही योगायोग नक्कीच नाही. राम मंदिर समर्थनार्थ निकाल लागताना, काळे कपडे घालून, दुसर्याच कारणासाठी निषेध नोंदवणारे विलाप करणारे, काँग्रेसी जगाने पाहिले आहेत. खरे तर या क्षणी राहुल यांच्या पक्षाच्या नेत्याने कार्ती चिदंबरम याने म्हटले आहे की, राहुलपेक्षा मोदी जास्त लोकप्रिय आहेत. त्याला तामिळनाडू काँग्रेसने याबाबत कारणे दाखवा नोटीस पाठवली आहे. याचाच अर्थ काँग्रेस पक्षात सत्य बोलायचीही चोरी आहे. राहुल गांधी यांनी ’भारत जोडो’ यात्रेआधी कार्ती चिदंबरम यांचा न्याय करावा. मग खुशाल न्याय-अन्याय जोडो यात्रा काढाव्यात!
रामनामाची शपथं
ममता बॅनर्जी किंवा तृणमूलचा कोणीही नेता अयोध्येला जाण्याचा प्रश्नच येत नाही. कारण, आम्ही धर्म आणि राजकारण एकत्र आणत नाही, असे म्हणे तृणमूलच्या एका नेत्याने म्हटले आहे. पण, खरंच का, तृणमूलचे राजकारण इतके निस्पृह आहे. आजपर्यंत चित्र हेच आहे की, ममता ने कायमच अल्पसंख्याकांचे लांगूलचालन करत, हिंदू धर्माच्या द्वेषावर आधारित राजकारण केले आहे. हिंदू धर्माच्या श्रद्धास्थानाचे दर्शन घेतले, तर मुसलमानांची मते मिळणार नाहीत, असे ममतांना वाटते, त्यामुळेच त्या अयोध्येला जाणार नाहीत. तसेही ममता यांना हिंदू सण-उत्सव यांचा तिटकाराच आहे, असे अनेकदा दिसून आले. उदाहरणार्थ, प. बंगालचा सगळ्यात मोठा उत्सव म्हणजे दुर्गापूजन. काही वर्षांपूर्वी रमजान आणि नवरात्री दुर्गा विसर्जन एकाच दिवशी आले. त्यावेळी रमजानची मिरवणूक सुखनैव कोणत्याही अडचणीशिवाय सुरू राहावी, यासाठी ममता यांनी काय केले? तर त्यांनी चक्क दसर्याच्या दिवशी होणारे, दुर्गामातेचे विसर्जन लोकांनी रमजानच्या दिवशी करू नये, असा फतवाच काढला. रामनामाला विरोध करता-करता, ममता आता रामाला माननार्या जनतेच्याही विरोधातच जात आहेत, तर अशा या ममता. त्यांनी सत्तेतली सगळी माया, ममता अल्पसंख्याकांच्या मतांना वाहिली की काय, असेच प. बंगालचे दृश्य. अर्थात प्रौढ भारतीय नागरिकांना स्वातंत्र्य आहे की, त्यांनी त्यांच्या धर्मश्रद्धा कुणाच्याही पायी वाहाव्यात. रामनामाचे वावडे असणार्या, मुख्यमंत्र्यांच्या सत्तेत या हिंदूची श्रद्धा कशी ठेचली जाते, हे तिथे गेल्यावरच कळेल. भाजप आणि रा. स्व. संघ हे हिंदुत्ववादी आहेत, त्यामुळे भाजप रा. स्व. संघ संबधित व्यक्तींना खोट्यानाट्या गुन्ह्यात कसेही अडकावायचे, असा एकहाती कार्यक्रम इथे ममतांचा सत्ताधारी तृणमूल पक्ष करतो. अयोध्या राम मंदिरावरून हिंदू-मुस्लीम विभागले जातील, असे ममता यांना वाटते. याबद्दल त्या म्हणाल्या की, ”ईश्वर, अल्ला शपथ मी हिंदू मुसलमानांची विभागणी होऊ देणार नाही.“ ममता यांनी कितीही ईश्वर अल्लाचा राग आलापत, मुस्लिमांचे लांगूलचालन केले, तरी आता भविष्य एकच आहे. ते म्हणजे सुशासन, धर्मशासनासाठी प. बंगालचे हिंदू ममतांना सत्तेतून पायउतार करण्याची, रामनाम शपथ घेतील, हे नक्की.