केंद्रीय अल्पसंख्याक व्यवहार मंत्री स्मृती इराणी यांनी नुकतीच मदिना शहराला भेट देत, इतिहास रचला. मदिना हे इस्लाममधील सर्वात पवित्र शहरांपैकी एक मानले जाते. सौदी अरेबियातील मदिना शहरात एखादे गैरमुस्लीम शिष्टमंडळ पोहोचण्याची ही पहिलीच वेळ होती. विशेष म्हणजे, हे शिष्टमंडळ भारताचे होते. स्मृती इराणी पारंपरिक पोषाखात अर्थात साडी नेसून याठिकाणी पोहोचल्या. त्यांनी कोणताही दिखावा वा तुष्टीकरण न करता, मदिना शहराचा दौरा केला. त्यांच्यासोबत असलेल्या शिष्टमंडळात एक काश्मिरी हिंदू आयआरएस निरूपमा कोतरू यादेखील पारंपरिक पोषाखात सहभागी झाल्या होत्या. स्मृती इराणी यांच्यासोबत परराष्ट्र राज्यमंत्री व्ही. मुरलीधरनही होते. भारतीय हज यात्रेकरूंसाठी पुरविण्यात येणार्या सुविधांचा आढावा त्यांनी यावेळी घेतला. भारतीय मुत्सद्देगिरीचा हा मोठा विजय मानला जात आहे.
यापूर्वी स्मृती इराणी यांनी सौदी अरेबियासोबत हज-2024 संदर्भात द्विपक्षीय करार केला होता. या अंतर्गत, भारतीय हज यात्रेकरूंचा एकूण कोटा आता 1 लाख, 75 हजार, 25 वर पोहोचला आहे. याशिवाय उमराहसाठी सौदी अरेबियात गेलेल्या भारतीयांची स्मृती इराणी यांनी भेट घेत, हजारो भारतीय हज यात्रेकरूंना चांगल्या सुविधा देण्याबाबत वचनबद्धता व्यक्त केली. याशिवाय स्मृती इराणी ’युनेस्को’च्या जागतिक वारसा यादीत समाविष्ट असलेल्या अल बलद जेद्दाह येथे गेल्या होत्या. पैगंबर मशीद अल मस्जिद अल नबावी, उहुद पर्वत आणि इस्लामिक मशीद कुबा यांनाही इराणी आणि शिष्टमंडळाने भेट दिली. कुबा ही इस्लाममध्ये पहिली मशीद मानली जाते.
सौदी अरेबियातील बहुतांश महिला हिजाबशिवाय घराबाहेर पडत नाहीत, तर मदिना आणि मक्का येथे गैरमुस्लिमांसाठी जाण्यासाठी वेगवेगळे नियम आहेत. अशा परिस्थितीत स्मृती इराणी डोके न झाकता, मदिना येथे पोहोचल्याने कट्टरपंथियांनी थयथयाट सुरू केला. स्मृती इराणी यांनी आपल्या पारंपरिक पोषाखात मदिना शहराचा दौरा केल्याने, अनेकांनी सौदी सरकारविरोधात मोर्चा उघडला आहे. दोन भारतीय महिला मदिना शहरात काय पोहोचल्या, तर कट्ट्ररपंथियांचा जळफाळाट सुरू झाला. गैरमुस्लीम महिलेला मदिना यात्रा करण्याची परवानगी द्यायला नको होती, असे सांगत कट्टरपंथी सौदी सरकारला लक्ष्य करत आहेत. सौदी अरेबियाचे क्राऊन प्रिन्स मोहम्मद बिन सलमान यांच्याविरोधात कट्टरपंथी संताप व्यक्त करत आहे.
दरम्यान, इकडे कट्टरपंथी रडत असताना, संयुक्त अरब अमिरातचे राष्ट्रपती मोहम्मद बिन जायद पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत गुजरातमध्ये रोड शो करत होते. जगभरात पंतप्रधान नरेंद्र मोदींना गुजरातवरून मुस्लीमविरोधी ठरविण्याचा अजेंडा राबविण्याचा प्रयत्न केला गेला. मात्र, आता जगातील शक्तिशाली मुस्लीम राष्ट्र भारतासाठी आपल्या परंपरा तोडत आहे, हीच आजची नव्या भारताची ताकद आहे.कट्टरपंथियांना जितके रडायचे असेल, तितके रडू द्यावे, त्याने तसाही काही फरक पडणार नाही. ते जितके रडतील, तितके त्यांचे पितळ उघडे पडेल. भारतीय मुस्लिमांना हज यात्रेदरम्यान चांगल्या आणि उत्तम सुविधा मिळाव्या, या हेतूने स्मृती इराणी शिष्टमंडळासह सौदी अरेबियाला पोहोचल्या होत्या. मात्र, तरीही कट्टरपंथियांना त्यांचा हा दौरा पचनी पडत नसेल, तर त्यावर काहीही करता येऊ शकत नाही.
इराणी नेमक्या कोणत्या हेतूने मदिना शहरात गेल्या, हे दुर्लक्षित करून कट्टरपंथियांना त्या साडी, टिकलीसह पारंपरिक भारतीय पोषाखात पोहोचल्या, याची जास्त जळजळ झाल्याचे दिसून येत आहे. सौदी अरेबियाला या दौर्यावर कोणताही आक्षेप नव्हता, उलट त्यांनी या शिष्टमंडळाचे मदिना शहरात जोरदार स्वागत केले. मात्र, जगभरातील कट्टरपंथियांना हेच स्वागत खुपले. म्हणून सोशल मीडियावर कट्टरपंथियांनी आपला फुकाचा थयथयाट सुरू केला आहे. या दौर्याने तिकडे पाकिस्तानला मिर्ची लागली नाही तर नवल. एका पाकिस्तानी वृत्तपत्राने या शिष्टमंडळाचा हिंदू शिष्टमंडळ म्हणून उल्लेख करत, इराणी यांच्या साडीवर, टिकलीवर आणि केंद्रीय राज्यमंत्री व्हि. मुरलीधरन यांच्या पांढरे धोतर आणि भगव्या कुर्त्यावर आक्षेप घेत टीका केली. तसेच क्राऊन प्रिन्सलाही लक्ष्य करत, त्यांना फक्त पैशांशी देणेघेणे असल्याचे म्हटले. कट्टरपंथियांचे रडगाणे हाच भारतीय परंपरेचा आणि नव्या भारताचा विजय आहे, हे नक्की...