कथित दारू घोटाळ्यावरून ‘ईडी’च्या दणक्यानंतर, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची शांतता म्हणे भंग पावली. मग शांततेचा शोध घेण्यासाठी, त्यांनी दि. २० डिसेंबरला थेट पंजाबमधील आनंदगढ गाव गाठले. ’ईडी’ने समन्सवर समन्स पाठवले; पण महाशयांनी त्याकडे सपशेल पाठ फिरवत, समन्सला थेट विपश्यनेचे उत्तर दिले. दहा दिवस विपश्यना केल्यानंतर, नुकतेच ते दिल्लीला परतले. दि. ३ जानेवारी रोजी त्यांना पुन्हा ’ईडी’ने चौकशीसाठी बोलावले आहे. आता यावेळी दांडी मारण्यासाठी, ते नेमकी कोणती यात्रा काढतात, हे पाहावे लागेल. विपश्यनेहून परतल्यानंतर त्यांनी ‘मला ऊर्जा मिळाली असून, आता मी दिल्लीतील लोकांची सेवा करण्यास तयार आहे. विपश्यना ध्यानानंतर दहा दिवसांनी परतलो. ही साधना अपार शांती देते. आजपासून पुन्हा नव्या ऊर्जेने जनतेची सेवा सुरू करू,’ अशा आशयाचे ट्विट केले. दिल्लीची सेवा करायला तयार आहे, असे सांगणारे केजरीवाल मग इतकी वर्षं काय करत होते? दिल्लीच्या मद्य धोरणाच्या कथित घोटाळ्यात ’ईडी’ने अरविंद केजरीवाल यांना चौथ्यांदा समन्स बजावत, दि. ३ जानेवारीला चौकशीसाठी बोलावले आहे. याआधी दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया आणि ‘आप’चे खासदार संजय सिंह यांना चौकशीदरम्यान अटक करण्यात आली होती. त्यामुळेच केजरीवाल अटकेच्या शक्यतेने भयभीत झालेले दिसतात. यापूर्वी ’ईडी’ने दि. २ नोव्हेंबरला पहिले समन्स पाठवले होते. त्यावर मध्य प्रदेशात निवडणूक प्रचारात व्यस्त असल्याचे कारण पुढे केले. त्यानंतर दि. १८ डिसेंबर आणि २१ डिसेंबर रोजी चौकशीला हजर राहण्यास सांगितल्यानंतरही नेहमीप्रमाणे चौकशीला दांडी मारली. दिल्लीकर प्रदूषणाने त्रस्त असताना, केजरीवाल शांतता शोधत बसले होते. मग दिल्लीकरांनी काय करायचं? जनतेच्या भल्यासाठी आपण जो मार्ग निवडला आहे, त्यावर चालत राहिलो, तर आपल्याला तुरुंगात तर जावंच लागेल, असंही केजरीवाल म्हणाले. त्यामुळे शांतता शोधून परतलेले, केजरीवाल लवकरच तुरुंगातील शांतताही अनुभवतील, असे सध्या दिसत आहे. दरम्यान, तिसर्यांदा समन्स पाठवूनही, एखादी व्यक्ती तपासात सहकार्य करण्यासाठी आली नाही, तर ’ईडी’ कायदेशीर कारवाई करू शकते. अजामीनपात्र वॉरेंट जारी करण्यासाठी, न्यायालयात अर्ज करू शकते. त्यामुळे केजरीवालांनी कितीही पळण्याचा प्रयत्न केला तरी उपयोग शून्यच!
...तर प्रायश्चित्ताची संधी!
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अयोध्येत महर्षी वाल्मिकी आंतरराष्ट्रीय विमानतळ, अयोध्या धाम रेल्वे जंक्शनसह हजारो कोटींच्या विकासकामांचे लोकार्पण केले. मोदींच्या विकासकामांच्या धडाक्याने अयोध्यानगरी आध्यात्मिकतेबरोबरच आता ‘विकासनगरी’च्या दिशेने वाटचाल करत आहे. त्यामुळे आगामी राजकीय भविष्य अंधकाराने व्यापून जाते की काय, असा प्रश्न उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांना पडला. उत्तर प्रदेशातील सर्वच्या सर्व जागा जिंकण्याचा दावा करून, अखिलेश ठीकठिकाणी सभा घेत आहेत. नुकतेच एटा येथील सभेत त्यांनी आपले अगाध ज्ञान मांडण्याची हौस पुरवून घेतली. २०२४ मध्ये भाजप सत्तेत आल्यानंतर, लोकांना मतदान करू दिले देणार नाही, असा अजब दावा त्यांनी केला. ही लोकसभा निवडणूक संविधान वाचविण्यासाठी लढणार असल्याचे त्यांनी सांगितले. मात्र, संविधानाला धोका कुणी व कसा पोहोचवला, हे मात्र स्पष्ट केले नाही. मुळात उत्तर प्रदेशातील सर्वच्या सर्व जागा जिंकणार असा दावा करणे, राजकीय गरज म्हणून योग्यही असेल. परंतु, बोलताना आधी गणित तरी करायचं होतं. उत्तर प्रदेशात लोकसभेच्या ८० जागा असून, सप हा ’इंडी’ आघाडीचा सदस्य. त्यामुळे सगळ्या जागा जिंकू असे सांगून, त्यांनी काँग्रेसला व राष्ट्रीय लोक दलाला आपल्या गणितातच बसवले नाही. जिथे अखिलेश यांची सभा झाली, तिथे उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री कल्याण सिंह यांचा मुलगा राजवीर सिंग सध्या एटा लोकसभा मतदारसंघातून भाजपचे खासदार आहेत. अखिलेशच्या गृहजिल्ह्यातील मैनपुरी प्रभावक्षेत्र असूनही २००४ पासून सपला ही जागा जिंकता आलेली नाही. २०१९ साली अखिलेश यांनी मायावतींच्या बसपसोबत महागठबंधन केले; मात्र त्याचा फारसा फायदा झाला नाही. दि. २२ जानेवारीच्या अयोध्येतील प्राणप्रतिष्ठा सोहळ्यावरही अखिलेश यांनी ज्याला निमंत्रण येईल, तो जाईल असे गुळमुळीत उत्तर दिले. अखिलेश यांच्या वडिलांनी सत्तेत असताना, अयोध्येत कारसेवकांवर केलेला अत्याचार आणि दडपशाही अजूनही लोकं विसरलेली नाहीत. त्यामुळे अखिलेश यांना निमंत्रण मिळाले, तर ती त्यांच्यासाठी भाग्याची गोष्ट होईल! कारण, प्रभू श्रीरामाच्या दरबारात जाऊन, पिताश्रींनी दुखावलेली कोट्यवधी रामभक्तांची त्यांना माफी मागण्याची संधी तरी मिळेल.