दिल्ली घोषणापत्राला सर्वच देशांची मंजुरी; चीनचे मनसुबे उधळले
09-Sep-2023
Total Views |
नवी दिल्ली : दिल्लीतील भारत मंडपम येथे सुरु असलेल्या जी-२० शिखर परिषदेतून भारतासाठी आनंदाची बातमी आली आहे. परिषदेच्या पहिल्याच दिवशी जी-२० चे संयुक्त घोषणापत्र मंजूर करण्यात आले आहे. शिखर परिषदेच्या दुसऱ्या सत्रात याची घोषणा करताना पंतप्रधान मोदींनी जी-२० शेर्पा, मंत्री आणि सर्व अधिकाऱ्यांचे आभार मानले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, "एक आनंदाची बातमी मिळाली आहे की आमच्या टीमच्या कठोर परिश्रमामुळे आणि तुमच्या सर्वांच्या सहकार्यामुळे, जी-२० लीडर्स समिटच्या घोषणापत्रावर सहमती बनली आहे. यादरम्यान पंतप्रधान मोदींनी ग्लोबल बायोफ्यूल अलायन्सची घोषणाही केली.
पंतप्रधान मोदी जी-२० शिखर परिषदेच्या दुसऱ्या सत्रात बोलताना म्हणाले की, "आम्ही जागतिक जैवइंधन युती तयार करत आहोत आणि भारत तुम्हा सर्वांना या उपक्रमात सामील होण्यासाठी आमंत्रित करतो. पेट्रोलमध्ये इथेनॉलचे मिश्रण २० टक्क्यांपर्यंत नेण्यासाठी भारताने जागतिक पुढाकार प्रस्तावित केला आहे."
पुढे बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, "भारताने 'पर्यावरण आणि हवामान निरीक्षणासाठी जी-२० उपग्रह मिशन' लाँच करण्याचा प्रस्ताव ठेवला आहे. मी प्रस्तावित करतो की जी-२० देशांनी 'ग्रीन क्रेडिट इनिशिएटिव्ह' वर काम सुरू करावे. विकसित देश यामध्ये खूप महत्त्वाची भूमिका बजावू शकतात."
दिल्ली घोषणापत्राला चीन आणि रशिया विरोध करतील, असा अंदाज वर्तवण्यात आला होता. पण सर्वच देशांनी जी-२० शिखर परिषदेच्या दिल्ली घोषणापत्राला आपली सहमती दिली आहे. हा भारतासाठी मोठा कूटनितीक विजय आहे.