सोलापुरात राज्यातील पहिलेच माळढोक प्रजनन केंद्र

    08-Sep-2023   
Total Views | 107
Maldhok


मुंबई (प्रतिनिधी):
राज्यात नामशेष होण्याच्या मार्गावर असलेल्या माळढोकांची संख्या वाढवण्यासाठी सोलापुरात माळढोक प्रजनन केंद्र सुरू करण्याची वनविभागाची तयारी सुरू आहे. बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटी अर्थात बीएनएचएस ही संस्था या कामात वनविभागाला मदत करणार आहे.

सोलापुरातील नान्नज हे महाराष्ट्रातील आकाराने सर्वांत मोठे असलेले अभयारण्य असुन त्यामध्ये माळढोकांसाठी संरक्षित अरण्य स्थापन केले गेले आहे. असं असुनही यंदा झालेल्या पक्षी गणनेमध्ये दोनच माळढोकांची नोंद झाली आहे. त्यापैकी केवळ एक मादी माळढोक शिल्लक असुन त्यांच्या संवर्धनासाठी पावले उचलली जात आहेत. नर माळढोक महाराष्ट्रात नसल्यामुळे त्यांचे प्रजनन होऊ शकत नाही. राजस्थानचा राज्यपक्षी असलेल्या माळढोकांचे राजस्थानमध्ये बंद अधिवासात प्रजनन केले गेले आहे. या प्रयोगाची यशस्वीता तपासुन महाराष्ट्रातही माळढोकांचे प्रजनन केले जाणार आहे.

राजस्थानमध्ये हा प्रजनन प्रकल्प पर्यावरण, वन आमि हवामान बदल मंत्रालय, भारतीय वन्यजीव संस्था आणि राजस्थान वनविभाग यांच्या समन्वयातुन हा प्रकल्प राबविण्यात आला होता. यामध्ये नेसर्गिक अधिवासातील अंडी आणुन बंद अधिवासात या पिल्लांचा जन्म झाला. यामधुन सोर्स पॉप्युलेशन तयार केले गेले असुन यातुन निर्माण होणारी पिढी ही बंद अधिवासात जन्मलेली पहिली पिढी असणार आहे. राजस्थानकडुन महाराष्ट्रासह गुजरात आणि कर्नाटक राज्यांना पिल्ले दिली जाणार असल्याची प्राथमिक माहिती आहे. अधिवासातील सुधारणा आणि बंद अधिवासातील यशस्वी प्रजनन करण्यासाठी हे अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहे.

माळढोक पक्ष्यांची पिल्ले चार वर्षांच्या कालावधीनंतर प्रजननासाठी सक्षम होतात. त्यामुळे सर्व प्रक्रिया पाहता हे प्रजनन केंद्र सुरू होण्यासाठी पाच वर्षांपेक्षा जास्त कालावधी लागणार आहे. नष्ट होण्याच्या उंबरठ्यावर असलेला माळढोक या दुर्मिळ पक्ष्याला संवर्धनाची असलेली गरज पहाता वनविभागाने यासाठी बीएनएचएसकडुन मदत मागितली असली तरी त्यावर अद्याप त्यावर शिक्कामोर्तब झालेले नाही.

समृद्धी ढमाले

लेखिका रुईया महाविद्यालयातून पत्रकारितेच्या पदवीधर आहेत. सध्या दै. 'मुंबई तरुण भारत'मध्ये पर्यावरण प्रतिनिधी म्हणून कार्यरत. यापूर्वी विविध 'ह्यूमन इंटरेस्ट स्टोरीज', मुलाखती आणि इतर वार्तांकनासाठी काम. आवाज आणि सूत्रसंचालन या क्षेत्रांमध्ये काम आणि विशेष आवड. 
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121